प्राणार्पण करून ग्रंथरूपी राष्ट्रीय अस्मिता जपणारे भारतीय !


सहाव्या शतकात चिनी प्रवासी हुसेन त्संग धर्मभूमी भारताचे दर्शन घेण्यासाठी गैबीचे वाळवंट पार करून भारतात आला. बौद्ध तीर्थक्षेत्री भ्रमण करत करत बिहारमधील नालंदा विश्वविद्यालयात येऊन त्यांनी भारतीय परंपरा, समाज आणि कला इत्यादींचे अध्ययन काही वर्षे केले.
नालंदा विश्वविद्यालयातून निरोप घेतांना भेट म्हणून त्यांना ४०० दुर्मिळ ग्रंथ आणि १५० नयन मनोहर बुद्ध प्रतिमा मिळाल्या.
स्वदेशी परततांना काही भारतीय विद्यार्थ्यांसह ते निघाले. सिंधू नदी पार करतांना त्यांनी भारतमातेला प्रणाम केला. ज्या नावेत ते आणि विद्यार्थी बसले होते. ती नाव महासागरात आल्यावर दोलायमान होऊ लागली. त्याच वेळी भयंकर वादळ चालू झाले. केव्हा नाव बुडेल, हे सांगणे कठीण झाले. पर्वतप्राय समुद्रलाटा उसळू लागल्या. नावाडी ओरडून सांगू लागले, ‘‘नाव हलकी करावी लागेल. ग्रंथ आणि मूर्ती पाण्यात फेकून द्या.’ नावाडी आता हे अनमोल ग्रंथ आणि मूर्ती सागराच्या लाटात फेकून देणार, असे दिसताच भारतीय संस्कृतीचे उपासक असलेले सर्व विद्यार्थी तत्क्षणी म्हणाले, ‘भारत भूमीची ही दुर्मिळ ज्ञान संपत्ती समुद्रात फेकून देणे, आम्ही कधीही सहन करणार नाही.’’
हुसेन त्संग काही उत्तर देण्यापूर्वीच एका पाठोपाठ एक याप्रमाणे त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या अथांग सागरामध्ये उड्या टाकून जलसमाधी घेतली. हे आत्मसमर्पणाचे दिव्य दृश्य ते विस्फारीत डोळ्याने बघत होते. त्यांच्या डोळ्यांतून वहाणार्‍या अश्रूंनी त्या समाधीस्थ विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहिली. असा होता आमच्या प्राचीन विद्यार्थ्यांचा संस्कृती रक्षणार्थ सर्वस्वाचा त्याग ! वेळ पडल्यास प्राणत्याग करण्याची अशी होती त्यांच्यातील भावना ! अशा अनेक अज्ञात हुताम्यांच्या समर्पणामुळेच आमची भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचा राष्ट्रीय प्रवाह अखंड चालत राहिलेला आहे.’
– (दुधारी वचनामृतवरून)

Leave a Comment