शाकाहाराचे महत्त्व आणि श्रेष्ठत्व

१. ‘शाकाहारात पुरेशी प्रथिने (प्रोटीन्स) असतात.

२. शाकाहारी लोक चपळ, निरोगी आणि दीर्घायुषी असतात. जॉर्ज बर्नार्ड शॉ कडवे शाकाहारी होते. ते ९४ वर्षांपर्यंत निरोगी जीवन जगले.

३. पश्चिमेकडील विख्यात व्यक्ती शाकाहारी आहेत. प्लेटो, सॉक्रेटिस, अ‍ॅरिस्टॉटल, रुसो, गोल्डस्मिथ, मिल्टन, न्यूटन, शेले, वॉल्टेअर, सीझर, वेजनेट, थोरो, टॉलस्टॉय, फिल्ड मार्शल माँटगोमरी, हॅरी व्हीटक्राफ्ट, ब्रिगेडिअर ग्रॉफी, ट्रागी, अँथोनी क्विनीज, माल्कम, मुगेरीस, पीटर इत्यादी. या सर्वांचे सांगणे असे आहे की, माणूस शाकाहारावर पूर्ण जीवन निरामय जगू शकतो.

४. आधुनिक विज्ञानाने शाकाहाराचे श्रेष्ठत्व निरपवाद सिद्ध केले आहे.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

निसर्गनियमानुसार ‘मनुष्याने शाकाहार करणे’, हेच त्याचे धर्मपालन असणे

ईश्वराने सृष्टीची निर्मिती करतांना ‘कोणत्या जिवाने कोणता आहार ग्रहण करावा’, याचे नियम बनवले आहेत. त्यानुसार हिंस्त्र प्राण्यांना दुसर्‍या प्राण्याची हिंसा करून अन्न भक्षण करणे सोपे जावे, यासाठी लांब सुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण दंतपंक्ती अशी रचना त्यांच्या जबड्यात केली आहे. याउलट मानवाच्या तोंडातील समोरचे दात मांस तोडण्यासाठी असमर्थ असतात. मानवाचे दात शाकाहारी अन्न सहज चावून त्याचे चर्वण करू शकतात. मनुष्याच्या दंतपंक्तींची रचना गायीच्या दातांप्रमाणे असते. निसर्गनियमानुसार गाय केवळ शाकाहारच करते. मनुष्यानेही शाकाहार करणे, हे त्याचे धर्मपालन ठरते.

आपल्या घरच्या अन्नाची सात्त्विकता वाढवण्यासाठी स्वयंपाक करतांना रामरक्षा आणि अन्य स्तोत्रे म्हणणे, नामजप करणे, श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना करणे, तसेच नैवेद्याच्या ताटातील अन्नपदार्थ सर्व अन्नात मिसळणे आदी कृती कराव्यात.