श्लोक अर्थासहित


गुरुरादिरनादिश्च गुरुः परमदैवतम् ।
गुरोः परतरं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : गुरु आदी म्हणजे प्रथमपासून आहे, सर्वांचे मूळ उगमस्थान आहे. पण गुरूंना स्वतःला दुसरे उगमस्थान नाही. गुरुतत्त्व स्वयंभू आहे. गुरुच परम दैवत आहे. गुरुंहून दुसरे श्रेष्ठ काही नाही. अशा श्रीगुरुंना माझा नमस्कार असो.

धूम्रनेत्रवधे देवि धर्मकामार्थदायिनि ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥
अर्थ : धूम्रनेत्र नावाच्या दैत्याचा वध करणार्‍या, धर्म, अर्थ आणि काम हे पुरुषार्थ प्राप्त करून देणार्‍या हे दुर्गे देवी तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर.

नमोऽस्तु गणनाथाय सिद्धिबुद्धियुताय च ।
सर्वप्रदाय देवाय पुत्रबुद्धिप्रदाय च ।।
अर्थ : सिद्धीबुद्धीसहित असणार्‍या, पुत्र आणि बुद्धी देणार्‍या, सर्व इष्ट कामनांची पूर्ती करणार्‍या गणनाथाला नमस्कार असो.

तमोघ्नाय हिमघ्नाय शत्रुघ्नायामितात्मने ।
कृतघ्नघ्नाय देवाय ज्योतिषां पतये नम: ।।
अर्थ : अंधाराचा नाश करणार्‍या, बर्फाला वितळवून टाकणार्‍या, शत्रू, कृतघ्न माणसे यांचे निर्दालन करणार्‍या, अमितात्मा, नक्षत्रांच्या स्वाम्याला, श्रीसूर्यनारायणाला माझा नमस्कार असो.

मूलायाग्राय मध्याय मूलमध्याग्रमूर्तये ।
क्षीणाग्रमूलमध्याय नम: पूर्णाय शम्भवे ।।
अर्थ : सृष्टीरूपी वृक्षाचे मूळ, मध्य आणि शेंडा म्हणजेच सर्वकाही असलेल्या, आदी, मध्य आणि अंतस्वरूप असूनही स्वतःला आदी, मध्य आणि अंत नसलेल्या परिपूर्ण भगवान शंकराला माझा नमस्कार असो.

या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
अर्थ : जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये मातृरूपाने स्थित आहे त्या श्रीदुर्गादेवीला मी त्रिवार नमस्कार करतो.

नमस्ते कूर्मरूपाय विष्णवे परमात्मने ।
नारायणाय विश्वाय वासुदेवाय ते नम: ।।
अर्थ : समुद्रमंथनाच्या वेळी कासवाचे रूप धारण केलेल्या, परमात्मा, नारायण, विश्व, वासुदेव अशी नावे असलेल्या श्रीविष्णूला मी नमस्कार करतो.

चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरंजनम् ।
नादबिंदुकलातीतं तस्मै श्रीगुरवे नम: ।।
अर्थ : जो चैतन्यस्वरूप, शाश्वत, शांत, आकाशादिपेक्षा सूक्ष्म, निरंजन, नादातीत, बिंदुतीत, कलातीत आहे अशा श्रीगुरुला नमस्कार असो.

सर्वस्य बुद्धिरूपेण जनस्य हृदि संस्थिते ।
स्वर्गापवर्गदे देवि नारायणि नमोऽस्तु ते ।।
अर्थ : समस्त जनांच्या हृदयात बुद्धीरूपाने वास्तव्य करणार्‍या, स्वर्ग आणि मोक्ष प्रदान करणार्‍या हे देवी नारायणी तुला माझा नमस्कार असो.

नमो वानरवीराय सुग्रीवसख्यकारिणे ।
लङ्काविदाहनार्थाय हेलासागरतारिणे ।।
अर्थ : वानरवीर, सुग्रीव आणि राम यांची मैत्री घडवून आणणार्‍या, लंकादहनास कारण ठरलेल्या, सहजरीतीने सागर पार करून जाणार्‍या हनुमंताला माझा नमस्कार असो.

रथस्थं चिन्तयेद्भानुं द्विभुजं रक्तवाससे ।
दाडिमीपुष्पसंकाशं पद्मादिभिरलंकृतम् ।।
अर्थ : द्विभुज, रक्तवस्त्रे परिधान केलेल्या, डाळिंबाच्या फुलाप्रमाणे दिसणार्‍या, कमळ इत्यादींनी सुशोभित असणार्‍या, रथामध्ये बसलेल्या श्रीसूर्यनारायणाचे मी ध्यान करतो.

यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबन्धनात् ।
विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे ।।
अर्थ : ज्याच्या केवळ स्मरणानेच जन्ममरणाच्या फेर्‍यातून, संसारबंधनातून सुटका होते त्या शक्तिशाली भगवान श्रीविष्णूला मी नमस्कार करतो.

कलाकाष्ठादिरूपेण परिणामप्रदायिनी ।
विश्वस्योपरतौ शक्ते नारायणि नमोऽस्तु ते ।।
अर्थ : कला, काष्ठा इत्यादी कालपरिमाणांनी चराचरामध्ये पालट घडवून आणणार्‍या, विश्वाचा विनाश करण्याची शक्ती असलेल्या देवी नारायणीला नमस्कार असो.

नमो भगवते तुभ्यं वासुदेवाय विष्णवे ।
पुरुषायादिबीजाय पूर्णबोधाय ते नम: ।।
अर्थ : वासुदेव, पुरुष, आदिबीज, पूर्णबोध इत्यादी नावे असलेल्या भगवान श्रीविष्णूला नमस्कार असो.

ज्ञानशक्तिसमारूढतत्त्वमालाविभूषणे ।
भुक्तिमुक्तिप्रदात्रे च तस्मै श्रीगुरवे नम: ।।
अर्थ : आत्मज्ञानाच्या शक्तीवर आरूढ झालेल्या, तत्त्वज्ञानसमुदायाने अलंकृत असलेल्या, भुक्ति आणि मुक्ति, भोग आणि मोक्ष देणार्‍या श्रीगुरुंना माझा नमस्कार असो.

सृष्टिस्थितिविनाशानां शक्तिभूते सनातनी ।
गुणाश्रये गुणमये नारायणि नमोऽस्तु ते ।।
अर्थ : हे देवी नारायणी, तुझ्यामध्ये विश्वाच्या उत्पत्तीची, त्याचा सांभाळ करण्याची आणि त्याच्या लयाची शक्ती आहे. तू त्रिगुणांना आश्रय देणारी आहेस. तू स्वतःच गुणमयी आहेस. तुला माझा नमस्कार असो.

सीताशोकविनाशाय राममुद्राधराय च ।
रावणान्तकुलच्छेदकारिणे ते नमो नम: ।।
अर्थ : सीतेचा शोक नष्ट करणार्‍या, श्रीरामाची मुद्रा धारण करणार्‍या, रावणाच्या वंशाचा नायनाट करणार्‍या हे मारुतीराया तुला माझा नमस्कार असो.

अग्रतश्चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु: ।
इदं ब्राह्ममिदं क्षात्रं शापादपि शरादपि ।।
अर्थ : आपल्या समोर चार वेद आणि पाठीवर धनुष्य-बाण ठेवणारा, ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांनी युक्त भगवान परशुराम आपल्या शत्रूंना शाप (ज्ञानाची शक्ति) आणि शर (शक्तीचे ज्ञान) यांनी पराजित करण्याची क्षमता बाळगतो.

प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् ।
भक्तावासं स्मरेन्नित्यं आयु:कामार्थसिद्धये ।।
अर्थ : आपले आरोग्य आणि मनोकामना यांच्या सिद्धीसाठी नेहमी गौरीपुत्र, भक्तांना आश्रयभूत अशा विनायकाला सविनय वंदन करून त्याचे स्मरण करावे.

श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयम् ।
नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरम् ।।
अर्थ : श्रुति, स्मृति आणि पुराण यांना आश्रयस्थान असलेल्या, अखिल मानवजातीचे कल्याण करणार्‍या, दयाघन भगवत्पाद शंकराचार्यांना मी वंदन करतो.

हृदि संकल्प्य यद्रूपं ध्यायन्ति यतय: सदा ।
ज्योतीरूपमनौपम्यं नरसिंहं नमाम्यहम् ।।
अर्थ : जे ज्योतीस्वरूप, अनुपम असे रूप हृदयात ठेवून साधुपुरुष ज्याचे ध्यान करतात त्या नरसिंहाला मी नमन करतो.

नमामि गंगे तवपादपंकजम् सुरासुरैवन्दितदिव्यरूपाम् ।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यं भावानुसारेण सदा नराणाम् ।।
अर्थ : देवांसोबत राक्षसांनाही जी पूज्य आहे, जिचे रूप अतिशय दिव्य आहे, जी मनुष्याच्या भावाप्रमाणे भुक्ती (कामनापूर्ती) आणि मुक्ती (मोक्ष) देते त्या देवी गंगेच्या चरणकमलांना मी नमस्कार करतो.


नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नम: ।
नम: प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम् ।।
अर्थ : आम्ही जिची नित्य उपासना करत आलो आहोत अशा कल्याणकारी, महादेवी, प्रकृती, मंगलमयी श्रीदुर्गादेवीला नमस्कार असो.

प्रसमाहितमत्यन्तं प्रथिमामिततेजसम् ।
वशीकृतपरानन्दं वसिष्ठं गुरुमाश्रये ।।
अर्थ : अमित, दिव्य तेजाने युक्त, परमानंदाला वश केलेल्या, अत्यंत शांत अशा वसिष्ठ ऋषींना मी शरण आलो आहे.

विश्वदीप नमस्तुभ्यं नमस्ते जगदात्मने ।
पद्मासन: पद्मकर: पद्मगर्भसमद्युति: ।।
अर्थ : पद्मासनामध्ये बसलेल्या, हाती कमळे घेतलेल्या, कमलरेणूंप्रमाणे कांती असलेल्या, जगताचा आत्मा असलेल्या हे विश्वदीप सूर्या मी तुला नमस्कार करतो.

नम: समस्तभूतानाम् आदिभूताय भूभृते ।
अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभविष्णवे ।।
अर्थ : सर्व प्राणिमात्रांच्या पुर्वीही अस्तित्वात असलेल्या, पृथ्वीला आधारभूत, अनेक रूपांमध्ये व्यक्त होणार्‍या, शक्तिशाली भगवान श्रीविष्णूला माझा नमस्कार असो.

या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता ।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम: ।।
अर्थ : जी देवी सर्व प्राणिमात्रांमध्ये विष्णुमाया या नावाने प्रसिद्ध आहे त्या श्रीदुर्गादेवीला मी त्रिवार नमस्कार करतो.

नमस्ते नरसिंहाय दैत्यवक्षःप्रदारिणे ।
नमस्ते सकलेशाय निर्गुणाय गुणात्मने ।।
अर्थ : हिरण्यकश्यप दैत्याचा कोथळा काढणार्‍या, निर्गुण, गुणात्मा, समस्त जगताचा स्वामी असलेल्या नरसिंहाला मी नमस्कार करतो.

सत्यानन्दस्वरूपाय बोधैकसुखकारिणे ।
नमो वेदान्तवेद्याय गुरवे बुद्धिसाक्षिणे ।।
अर्थ : जे सत्यानंदस्वरूप आहेत, ज्यांच्या केवळ उपदेशानेच आनंदप्राप्ती होते, जे स्वतः वेदान्तशास्त्राचे ज्ञेय आहेत त्या विश्वबुद्धीला पहाणार्‍या श्रीगुरूंना मी नमन करतो.

अरति: क्रोधचापल्ये भयं नैतानि यस्य च ।
अदीर्घसूत्रं तं धीरं नारदं प्रणमाम्यहम् ।।
अर्थ : उतावळेपणा, क्रोध, चंचलता, भीती यांचा लवलेश नसणार्‍या, तत्पर, धीर अशा नारदमुनींना मी वंदन करतो.

नमो हनुमते तुभ्यं नमो मारुतसूनवे ।
नम: श्रीरामभक्ताय श्यामास्याय च ते नम: ।।
अर्थ : हे पवनपुत्रा, श्रीरामभक्ता, श्यामवदना, हनुमंता मी तुला नमस्कार करतो.

नमो धर्मविपाकाय नम: सुकृतसाक्षिणे ।
नम: प्रत्यक्षदेवाय भास्कराय नमो नम: ।।
अर्थ : धर्मापासून उत्पन्न झालेल्या, चांगल्या कृत्यांचा साक्षी असलेल्या, प्रत्यक्ष दिसणार्‍या श्रीभास्कराला माझा नमस्कार असो.

ज्ञानार्थवाचको गश्च णश्च निर्वाणवाचक: ।
तयोरीशतरं ब्रह्म गणेशं प्रणमाम्यहम् ।।
अर्थ : ’ग’ हा ज्ञानार्थवाचक असून ’ण’ निर्वाणवाचक आहे. त्या दोघांपेक्षाही वरचढ, ब्रह्मस्वरूप अशा गणेशाला मी वंदन करतो.

Leave a Comment