श्लोक अर्थासहित

मातेव रक्षति पितेव हिते नियुङ्क्ते
कान्तेव चापि रमयत्यपनीय खेदम् ।
लक्ष्मीं तनोति वितनोति च दिक्षु कीर्तिं
किं किं न साधयति कल्पलतेव विद्या ॥

अर्थ : विद्या आईप्रमाणे रक्षण करते. पित्याप्रमाणे हिताच्या ठिकाणी योजते. पत्नीप्रमाणे खेद दूर करून रमवते. लक्ष्मी वाढवते, कीर्ती सर्वत्र पसरवते. कल्पलतेप्रमाणे विद्या काय बरे साध्य करून देत नाही ?

वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनम् ।
देवकीपरमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥

अर्थ : वसुदेवाचा पुत्र, कंस, चाणूर इत्यादींचा निःपात करणार्‍या, देवकीचा परमानंद, संपूर्ण जगताला गुरुस्थानी असणार्‍या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो.

वन्दे मातरम् । सुजलां सुफलां मलयजशीतलाम् ।

सस्यश्यामलां मातरम् । वन्दे मातरम् ॥

अर्थ : हे भारतमाते मी तुझ्या चरणी नतमस्तक झालो आहे. खळखळ वहाणार्‍या पाण्याने समृद्ध, रसाळ फळांनी संपन्न, मलयगिरीच्या चंदनाप्रमाणे शीतल, धान्यराशींनी जणु काही श्यामल वर्णाच्या दिसणार्‍या हे माते मी तुला वंदन करतो.

सर्वस्वरूपे सर्वेशे सर्वशक्तिसमन्विते ।

भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तु ते ॥

अर्थ : चराचरात वास्तव्य करणार्‍या, सर्व जगताची स्वामिनी, सर्व शक्तींनी परिपूर्ण अशा हे श्री दुर्गामाते माझी भीती दूर कर. तुला नमस्कार असो.

नित्यानन्दैकरसं सच्चिन्मात्रं स्वयंज्योतिः ।

पुरुषोत्तममजमीशं वन्दे श्रीयादवाधीशम् ॥

अर्थ : अखंड आनंदाची अनुभूती देणार्‍या, पूर्ण चैतन्ययुक्त, स्वयंप्रकाशी, नरश्रेष्ठ, अजन्मा, यादवपती भगवान श्रीकृष्णाला मी वंदन करतो.

नमः पूर्वाय गिरये पश्चिमायाद्रये नमः ।

ज्योतिर्गणानां पतये दिनाधिपतये नमः ॥

अर्थ : पूर्व आणि पश्चिमेकडील पर्वतांना, तेजस्वी ग्रहांच्या स्वाम्याला, दिनपती सूर्याला माझा नमस्कार असो.

ॐ नमः परमार्थैकरूपाय परमात्मने ।

स्वेच्छावभासितासत्यभेदभिन्नाय शम्भवे ॥

अर्थ : स्वतःच्या इच्छारूपी प्रकाशाने असत्याचा नाश करणार्‍या, सर्व भेदभाव नष्ट करणार्‍या, मोक्ष हेच ज्याचे रूप आहे अशा परमात्मा भगवान शंकराला नमस्कार असो.

सरस्वतीं च तां नौमि वागधिष्ठातृदेवताम् ।

देवत्वं प्रतिपद्यन्ते यदनुग्रहतो जनाः ॥

अर्थ : वाणीची अधिष्ठात्री देवी सरस्वती हिला मी नमस्कार करतो. हिच्या अनुग्रहामुळे लोकांना देवत्व प्राप्त होते.

वन्दे वृन्दावनचरं वल्लवीजनवल्लभम् ।

जयन्तीसम्भवं धाम वैजयन्तीविभूषणम् ॥

अर्थ : वृंदावनामध्ये विहार करणार्‍या, गोपीजनांना आनंद देणार्‍या, जयन्ती योगावर (म्हणजे श्रावण कृष्ण अष्टमीच्या मध्यरात्री रोहिणी नक्षत्र असतां) जन्मलेल्या, भक्तांचे आश्रयस्थान असलेल्या, वैजयंती माळेने सुशोभित झालेल्या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो.

न गुरोरधिकं तत्त्वं न गुरोरधिकं तपः ।

तत्त्वज्ञानात् परं नास्ति तस्मै श्रीगुरवे नमः ॥

अर्थ : गुरुतत्त्व हे सर्वश्रेष्ठ तत्त्व आहे, गुरूंपेक्षा वरचढ दुसरे काही नाही. गुरुसेवा आणि गुरुभक्ती यांहून श्रेष्ठ असे दुसरे तप नाही. तत्त्वज्ञानापेक्षा दुसरे कोणतेही ज्ञान श्रेष्ठ नाही. अशा श्रेष्ठ सद्गुरूंना नमस्कार असो.

Leave a Comment