श्लोक अर्थासहित

मधुकैटभविध्वंसि विधातृवरदे नमः ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥

अर्थ : मधु आणि कैटभ या दैत्यांचा नाश करणार्‍या, ब्रह्मदेवाला वर देणार्‍या हे श्रीदुर्गादेवी तू आम्हाला रूप दे, जय दे, यश दे आणि आमच्या शत्रूंचा निःपात कर.


गोष्पदीकृतवारीशं मशकीकृतराक्षसम् ।
रामायणमहामालारत्नं वन्देऽनिलात्मजम् ॥
अर्थ : ज्याने अथांग सागराला एखाद्या गोठ्याप्रमाणे पार केले, भल्या मोठ्या राक्षसांना माश्यांप्रमाणे चिरडून टाकले त्या रामायणरूपी महामाळेतील रत्नाप्रमाणे असणार्‍या वायुपुत्र हनुमंताला मी प्रणाम करतो.

जयाय जयभद्राय हर्यश्वाय नमो नमः ।
नमो नमः सहस्रांशो आदित्याय नमो नमः ॥
अर्थ : जय, जयभद्र, हर्यश्व (इंद्राचा घोडा) यांना नमस्कार असो. सहस्रांशु आदित्याला नमस्कार असो.

पिनाकफणिबालेन्दुः भस्ममन्दाकिनीयुता ।
पवर्गरचितामूर्तिः अपवर्गप्रदास्तु वः ॥
अर्थ : पिनाक (धनुष्य), फणी (सर्प), बालेंदु (चंद्रकोर), भस्म आणि मंदाकिनी (गंगा) यांनी युक्त अशी ’प’वर्ग (प, फ, ब, भ, म) रचित मूर्ती तुम्हाला अपवर्ग (मोक्ष) प्रदान करो.

पातु नो निकषग्रावा मतिहेम्नः सरस्वती ।
प्राज्ञेतरपरिच्छेदं वचसैव करोति या ॥
अर्थ : बुद्धीरूपी सुवर्णाला कसोटीच्या दगडाप्रमाणे असणारी सरस्वती देवी आमचे रक्षण करो. ती प्राज्ञ आणि मूर्ख यांमधील भेद केवळ बोलण्यावरूनच लक्षात आणून देते.

अगुणाय गुणोद्रेकस्वरूपायादिकारणे ।
विदारितारिसङ्घाय वासुदेवाय ते नमः ॥
अर्थ : जो स्वतः सत्त्व, रज, तम यांनी विरहित आहे, सृष्टीच्या उत्पत्तीच्या वेळी त्रिगुणांचा उद्रेक झालेल्या प्रकृतितत्वाप्रमाणे जो या जगताचे आदिकारण आहे, ज्याने मानवतेच्या शत्रूंचा नायनाट केलेला आहे अशा भगवान वासुदेव श्रीकृष्णाला माझा नमस्कार असो.

मन्नाथः श्रीजगन्नाथः मद्गुरुः श्रीजगद्गुरुः ।
मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : माझे गुरुनाथ सर्व जगाचेच नाथ, स्वामी आहेत. माझे गुरु जगद्गुरु आहेत. ’माझा आत्मा सर्वव्यापी म्हणजेच सर्वांभूती असणारा आत्मा आहे’ अशा प्रकारचा अनुभव आणून देणाऱ्या श्रीगुरुंना माझा नमस्कार असो.

महिषासुरनिर्णाशि भक्तानां सुखदे नमः ।
रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो जहि ॥
अर्थ : महिषासुराचा नाश करून भक्तांना सुख देणार्‍या हे दुर्गे देवी तू मला रूप दे, जय दे, यश दे आणि माझ्या शत्रूंचा नाश कर.

उल्लङ्घ्य सिन्धोः सलिलं सलीलं यः शोकवह्निं जनकात्मजायाः ।
आदाय तेनैव ददाह लङ्कां नमामि तं प्राञ्जलिराञ्जनेयम् ॥
अर्थ : अथांग समुद्राचे सलिल (पाणी) लीलया पार करून, जनकपुत्री सीतेचा शोकाग्नी घेऊन त्या शोकाग्नीने संपूर्ण लंकेला ज्याने जाळून टाकले त्या अंजनीसुत मारुतीरायाला मी साष्टांग प्रणाम करतो.

नम उग्राय वीराय सारङ्गाय नमो नमः ।
नमः पद्मप्रबोधाय मार्तण्डाय नमो नमः ॥
अर्थ : अत्यंत तेजस्वी, वीर, दीप्त, कमळांना फुलवणार्‍या सूर्यनारायणाला माझा नमस्कार असो.

नमः शिवाय निःशेषक्लेशप्रशमशालिने ।
त्रिगुणग्रन्थिदुर्भेदभवबन्धविभेदिने ॥
अर्थ : समस्त दुःखांचे निवारण करण्यास तत्पर अशा; सत्त्व, रज आणि तम या त्रिगुणांच्या ग्रंथींमुळे दुर्भेद्य अशा संसाररूपी बंधनाचा भेद करणार्‍या भगवान शंकराला नमस्कार असो.

लक्ष्मीर्मेधा धरा पुष्टिर्गौरी तुष्टिः प्रभा धृतिः |
एताभिः पाहि तनुभिरष्टभिर्मां सरस्वती ॥
अर्थ : हे सरस्वती देवी, लक्ष्मी, मेधा, धरा, पुष्टी, गौरी, तुष्टी, प्रभा, धृती या आठ अंगांनी माझे रक्षण कर.

उद्यदादित्यसङ्काशं पीतवासं चतुर्भुजम् |
शङ्खचक्रगदापाणिं ध्यायेल्लक्ष्मीपतिं हरिम् |।
अर्थ : उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान, पीतांबरधारी, चतुर्भुज, शंख, चक्र, गदा हाती घेतलेल्या, लक्ष्मीपती श्रीविष्णूचे मी ध्यान करतो.

Leave a Comment