श्लोक अर्थासहित

मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे ।
अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नम: ॥
अर्थ : मृत्युंजय (मृत्यूवर ज्याने विजय मिळवलेला आहे असा), रुद्र (असुरांना ज्याची भीती वाटते असा), नीलकण्ठ (ज्याचा कंठ निळा आहे असा), शम्भु (कल्याणकारी), अमृतेश (अमृताचा स्वामी), शर्व (मंगलमय), महादेव (देवांमध्ये श्रेष्ठ) अशी विविध नावे असलेल्या भगवान शंकराला मी वंदन करतो.

अतुलितबलधामं स्वर्णशैलाभदेहं दनुजवनकृशानं ज्ञानिनामग्रगण्यम् ।
सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि ॥
अर्थ : अतुलनीय सामर्थ्ययुक्त, सुवर्णाच्या पर्वताप्रमाणे देह असलेला, राक्षसरूपी अरण्यांना वणव्याप्रमाणे असलेला, सगळ्या ज्ञानीजनांमध्ये अग्रणी, समस्त गुणांनी परिपूर्ण, वानरांमध्ये श्रेष्ठ, रामाचा प्रिय भक्त, पवनपुत्र हनुमान याला मी वंदन करतो.

तडीद्वाससं नीलमेघावभासं रमामंदिरं सुंदरं चित्प्रकाशम्‌ ।
वरं त्विष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्‌ ॥
अर्थ : ज्याची वस्त्रे विद्युल्लतेप्रमाणे पिवळ्या रंगाची आहेत. ज्याची अंगकान्ती निळ्या मेघाप्रमाणे शोभत आहे, जो श्रीलक्ष्मीचे निवासस्थान आहे, जो परमसुंदर चित्प्रकाश आहे, जो सर्वश्रेष्ठ आणि जणू काही भक्तांना दर्शन देण्यासाठीच विटेवर सारखी पाऊलें ठेवून उभा आहे अशा त्या परब्रह्मरूपी पांडुंरंगाला मी नमस्कार करतो.

संसारवृक्षमारूढाः पतन्ति नरकार्णवे ।
यस्तानुद्धरते सर्वान् तस्मै श्रीगुरवे नमः ॥
अर्थ : संसाररूपी झाडावर चढलेले जे नरकरूपी सागरात गटांगळ्या खातात त्या सर्वांचा उद्धार करणार्‍या श्रीगुरूंना माझा नमस्कार असो.

अभीप्सितार्थसिध्यर्थं पूजितो यः सुरासुरैः ।
सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः ॥
अर्थ : आपली इष्टकामना सिद्ध होण्यासाठी देव आणि दानव ज्याची पूजा करतात, त्या सर्व विघ्ने दूर करणार्‍या गणपतीला माझा नमस्कार असो.

नमः शिवाय साम्बाय हरये परमात्मने ।
प्रणतक्लेशनाशाय योगिनां पतये नमः ॥
अर्थ : कल्याणकारी, पापांचे हरण करणारा, परमात्मा, शरण आलेल्यांचे सर्व क्लेश नष्ट करणारा, योगिजनांचा स्वामी अशा भगवान सांबसदाशिवाला (शंकराला) नमस्कार असो.

जपाकुसुमसंकाशं काश्यपेयं महद्युतिम् ।
तमोऽरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ॥
अर्थ : जास्वंदाच्या फुलाप्रमाणे कांती असलेल्या, कश्यपपुत्र, अत्यंत तेजस्वी, अंधकाराचा शत्रू, सर्व पापांचा नाश करणार्‍या सूर्याला मी नमस्कार करतो.

चन्द्राननार्धदेहाय चन्द्रांशुसितमूर्तये ।
चन्द्रार्कानलनेत्राय चन्द्रार्धशिरसे नमः ॥
अर्थ : चंद्रमुखी पार्वती ही ज्याची अर्धांगिनी आहे, जो चंद्रकिरणांप्रमाणे शीतल आहे, ज्याचे तीन नेत्र चंद्र, सूर्य आणि अग्नीप्रमाणे आहेत, ज्याने आपल्या मस्तकावर अर्धचंद्र धारण केलेला आहे अशा भगवान श्रीशंकराला माझा नमस्कार असो.

शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे ।
सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात् ॥
अर्थ : मुखकमलातून निर्माण होणार्‍या, शरद ऋतूतील कमलाप्रमाणे मोहक मुख असलेल्या हे शारदे तू आम्हाला सर्वकाळ सर्वकाही देणारी हो. आमच्या संनिध नेहमी निवास (सन्निधी) कर. आम्हाला चांगले धन (सन्निधी) देणारी हो.
(या श्लोकात एकाच शब्दाचे दोन वा तीन अर्थ आहेत.)

Leave a Comment