Menu Close

नाशिक येथून ‘ओम प्रतिष्ठान’द्वारे ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स प्रारंभ

  • प्रसादातील भेसळ आणि अन्य धर्मीय विक्रेत्यांचे धर्मस्थळांवरील अतिक्रमण रोखण्याचा हेतू !

  • प्रसाद विक्रेत्यांना प्रसादाच्या शुद्धतेचे ‘ओम प्रमाणपत्र’ घ्यावे लागणार !

  • संत-महंत आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्याकडून शुद्ध प्रसादाची संकल्पना अस्तित्वात !

  • भारतभर ही चळवळ राबवण्यात येणार !

त्र्यंबकेश्‍वर (जिल्हा नाशिक, महाराष्ट्र) : सर्व मंदिरांमध्ये भाविकांकडून जो प्रसाद अर्पण केला जातो, त्या प्रसादात अनेकदा वर्ज्य (भेसळयुक्त पदार्थ) असलेले पदार्थ मिसळले जात असल्याचे प्रकार वारंवार समोर येतात. त्यामुळे हिंदु धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गैरप्रकाराच्या विरोधात व्यापक स्वरूपात ‘प्रसाद शुद्धी चळवळ’ राबवण्यात येणार आहे. त्यासाठी आता प्रसाद विक्रेत्यांना ते वितरित करत असलेल्या प्रसादाच्या शुद्धतेचे प्रमाण देऊन ‘ओम प्रमाणपत्र’ घ्यावे लागणार आहे. तशी संकल्पना समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि संत-महंत यांच्या माध्यमातून अस्तित्वात आली आहे. यातून प्रसादातील भेसळ आणि अन्य धर्मीय विक्रेत्यांचे हिंदु धर्मस्थळांवरील वाढते अतिक्रमण थांबेल, अशी माहिती मराठी चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते श्री. शरद पोंक्षे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

त्र्यंबकेश्वर मंदिर येथे १४ जून या दिवशी दुपारी १२ वाजता आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.  श्री. शरद पोंक्षे पुढे म्हणाले, ‘‘‘ओम प्रतिष्ठान’कडून ‘ओम प्रमाणपत्र’ देण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असून या सर्व उपक्रमाला माझा पाठिंबा आहे. हे सर्व प्रसादाचे पावित्र्य राखण्यासाठी आणि शुद्धता राखण्यासाठी केलेला हा उपक्रम आवश्यक असून तो उत्तरोत्तर वाढत जाईल, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.’’

या वेळी अखिल भारतीय संत समिती धर्म समाज, महाराष्ट्र क्षेत्राचे अध्यक्ष महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्यांचे संघटक अन् महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक श्री. सुनील घनवट, सावरकर प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांच्या हस्ते त्र्यंबकेश्वरच्या चरणी पहिले प्रमाणपत्र अर्पण करून लोकार्पण झाले. या वेळी नाशिक मंचर त्र्यंबकेश्वर डोंबिवली, मुंबई, ठाणे आणि पुणे येथील हिंदुत्वनिष्ठ आणि व्यावसायिक, पुरोहित महासंघाचे नाशिक येथील अध्यक्ष श्री. सतीश शुक्ल, पुरोहित महासंघाचे त्र्यंबकेश्वर येथील अध्यक्ष श्री. मनोज थेटे, धर्मसभेचे वेदशास्त्र, यज्ञविद्या वाचस्पती भालचंद्र शौचे यांचीही वंदनीय उपस्थिती होती, तसेच ‘ही चळवळ भारतभर राबवण्यात येईल’, असे ओम प्रतिष्ठानच्या वतीने श्री. रणजित सावरकर यांनी घोषित केले.

प्रसादाच्या साम्रगीची शुद्धता पाहून ‘ओम प्रमाणपत्र’ मिळणार !

प्रसादाचे पावित्र्य टिकवून ठेवण्यासाठी या चळवळीस प्रारंभ करण्यात आला आहे. ‘प्रसादातील साम्रगी पूर्णतः शुद्ध साम्रगी आहे कि नाही ?’, हे ‘ओम प्रमाणपत्र’ देण्यापूर्वी प्रथम पाहिले जाईल. या चळवळीचा भाग म्हणून ‘ओम प्रतिष्ठान’च्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील प्रसाद विक्रेत्यांना ‘ओम प्रमाणपत्रा’चे वाटप करण्यात आले. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरातील प्रसाद विक्रेत्यांनीही या प्रमाणपत्राची नोंदणी करून या ‘प्रसाद शुद्धी’ चळवळीत सहभाग घेतला.

या वेळी सर्वप्रथम ‘ओम प्रमाणपत्रा’चे त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत् पूजन करण्यात आली. त्यानंतर मंदिराच्या गाभार्‍यात सामूहिक आरती करण्यात आली. मंदिरात श्री त्र्यंबकेश्वराचे आशीर्वाद घेतल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात या प्रमाणपत्राचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या समोर अनावरण करण्यात आले. या वेळी उपस्थितांनी जोर जोरात घोषणा दिल्या. या प्रसंगी मंदिराच्या परिसरातील काही निवडक प्रसाद विक्रेत्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ वितरीत करण्यात आले.

सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स पाठिंबा !

समस्त हिंदु संघटना आणि संत-महंत, आखाडा परिषद, अखिल भारतीय संत समिती, पुरोहित महासंघ त्र्यंबकेश्वर, पुरोहित महासंघ नाशिक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु एकता आंदोलन. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, सकल हिंदु समाज या सर्व संघटनांच्या माध्यमातून ‘प्रसाद शुद्धी चळवळी’स पाठिंबा देण्यात आलेला आहे. या वेळी विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. या चळवळीचा प्रारंभ त्र्यंबकेश्वर येथून झाला आहे.

काय आहे ‘ओम प्रमाणपत्र ?

प्रसाद शुद्धी चळवळीअंतर्गत ‘ओम प्रमाणपत्र’ बनवण्यात आले आहे. या प्रमाणपत्रात ‘क्यु आर्. कोड’ देण्यात आला आहे. ‘क्यू आर्. कोड’ स्कॅन केल्यावर संबंधित मिठाई विक्रेत्याची सर्व माहिती समोर येते. त्यामुळे या प्रमाणपत्राचा कुणी दुरूपयोग करू शकणार नाही. आपण प्रसाद कुणाकडून खरेदी करत आहोत याची माहिती या प्रमाणपत्रावरून सहज आपल्याला मिळणार आहे.

हिंदु धर्माला भ्रष्ट करण्यासाठी अशुद्ध प्रसादाचे वाटप करून ‘श्रद्धा जिहाद’ चालू आहे ! – रणजित सावरकर, कार्याध्यक्ष, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

श्री. रणजित सावरकर

(प्रसादामध्ये हेतूपुरस्सर गायीचे मांस आदी वापरून पुकारलेल्या जिहादला ‘श्रद्धा जिहाद’ म्हणतात.)

बाहेरगावाहून आलेल्या भाविकांना शुद्ध प्रसाद कुठे मिळतो, याची माहिती नसते. अनेक ठिकाणी हिंदु धर्माला भ्रष्ट करण्यासाठी प्रसादाचे अशुद्धीकरण करून ‘श्रद्धा जिहाद’ चालू आहे. गायीच्या चरबीपासून पेढे बनवले जातात. ७५ टक्के चरबी, २५ टक्के खवा आणि साखर घालून पेढे बनवले जातात. त्या पेढ्यांची १०० ग्रॅमची छोटी पाकिटे सिद्ध करून बहुतांश त्यांची विक्री देवस्थानाच्या ठिकाणीच होते. हिंदूंच्या देवतांना गोमांसाचा नैवेद्य हिंदूंच्या हातून पाप घडावे, या दृष्टीकोनातून हे जाणीवपूर्वक केले जात आहे. हे लक्षात आल्यानंतर मी पुष्कळ अस्वस्थ झालो. त्यानंतर मी महंत आणि धर्माचार्य यांच्याशी बोललो. यामध्ये अनेक प्रकार आहेत. ‘थूँक जिहाद’ प्रकार आहे. याचे अनेक व्हिडिओ प्रसारित झालेले आहेत. असा अशुद्ध प्रसाद येऊ नये, यासाठी ही चळवळ राबवत आहोत. या उपक्रमात जो कुणी आहे,  तो हिंदु म्हणून सामील झाला आहे. या चळवळीला कोणताही राजकीय पक्ष आणि संघटना यांचे लेबल नाही. यामध्ये कोणतेही पक्षीय राजकारण नाही.’’

हलाल’ला झटका देण्यासाठी ओम प्रमाणपत्र आहे ! – महंत आचार्य पीठाधीश्‍वर डॉ. अनिकेत शास्त्री महाराज, अध्यक्ष, अखिल भारतीय संत समिती धर्म समाज, महाराष्ट्र क्षेत्र

महंत अनिकेतशास्‍त्री महाराज

महंत अनिकेतशास्‍त्री महाराजआज ‘ओम प्रतिष्ठान मुंबई’च्या वतीने महाराष्ट्रात आवाहन केले होते की, हिंदु मंदिरांच्या परिसरातील प्रसादात भेसळ असेल, त्याचसमवेत त्या प्रसादाच्या पूजा साहित्यात अतिशय घातक अशा केमिकलचा वापर केला असेल, मग ते तूप, कुंकू, अष्टगंध किंवा अन्य पूजा साम्रगी असेल, तर ते खरेदी करू नये. अशुद्ध प्रसाद देऊन अधर्मियांकडून ‘श्रद्धा जिहाद’ होत आहे. याला आळा बसून यावर मात व्हावी. यासाठी श्री. रणजित सावकर यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच महाराष्ट्रातील जे धर्म अधिष्ठान आहे, त्यामध्ये पुरोहित संघ, वैदिक सनातन धर्म, अखिल भारतीय संत समिती, श्री स्वामी समर्थ केंद्र, मंदिर महासंघ, अशा अनेक संघटना आणि धर्माचार्य यांनी अशी रूपरेषा ठरवली. मंदिर परिसरातील सव दुकानदार आणि त्यांच्या पूजा साम्रगीचे सर्व्हेशन करूनच अंती त्यांना ‘ओम प्रमाणपत्र’ देण्यात येईल. सर्व हिंदु भाविकांना आवाहन करतो की, ज्या वेळी उपाहारगृहात जाण्याअगोदर आपण लाल आणि हिरवे चिन्ह (शाकाहारी आणि मांसाहार) पाहून जेवणाचा निर्णय घेतो, त्याचप्रमाणे भगवंताला आपण जे काही अर्पण करणार आहोत. त्याचे पुण्यफल आपणाला मिळायला हवे. ते जर चुकीचे गेले, तर आपल्याला त्याचे विपरित परिणाम अनुभवण्यास मिळतील. त्याचे पाप आपल्याला भोगावे लागेल. तसे होऊ नये म्हणून ‘ओम प्रमाणपत्र’ असणार्‍या दुकानांना प्राधान्य देऊन नैवेद्य आणि पूजा साम्रगी तेथूनच खरेदी करून भक्तीभावाने परमेश्वराला अर्पण करावी.’’

अभियानास त्र्यंबकेश्वर पुरोहित महासंघाचा संपूर्ण पाठिंबा ! – श्री. मनोज थेटे, पुरोहित महासंघ, अध्यक्ष, त्रंबकेश्वर

‘ओम प्रतिष्ठान’कडून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पहिले प्रमाणपत्र त्र्यंबकेश्वर राजा चरणी अर्पण करण्यात आले. या अभियानाचा प्रारंभ येथून चालू झाला. हे अभियान केवळ त्र्यंबकेश्वर पुरते मर्यादित न रहाता संपूर्ण देशभरात त्र्यंबकेश्वराच्या आशीर्वादाने पोचेल. या अभियानास त्र्यंबकेश्वर पुरोहित महासंघाचा संपूर्ण पाठिंबा व्यक्त करतो आणि शुभेच्छा देतो.

‘प्रसाद शुद्धी चळवळी’मुळे ‘हलाल’उत्पादित प्रसादाला प्रतिबंध बसेल ! – सुनील घनवट, समन्वयक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

श्री सुनील घनवट

श्री. सुनील घनवट म्हणाले, ‘‘मंदिरांच्या परिसरामध्ये जे प्रसाद विक्रेते आणि दुकानदार असतात, त्या ठिकाणी काही धर्मांधांची दुकाने असतात. त्या ठिकाणी प्रसादाची शुद्धता पाळली जात नाही. त्यामुळे आता ‘हलाल’ला झटका देण्यासाठी आणि हिंदु भाविकांच्या मनातील भावना आणि पवित्रता जपण्यासाठी ‘ओम प्रतिष्ठान’च्या माध्यमातून ‘ओम प्रमाणपत्रा’ची निर्मिती करण्यात आलेली आहे.

या माध्यमातून आता ‘हलाल’ला नक्कीच झटका बसेल, कारण शबरीमालासारख्या प्रसिद्ध देवस्थानामध्येही ‘हलाल’च्या उत्पादनापासून बनवलेला प्रसाद या ठिकाणी दिला जात होता. अनेक मंदिरात असा प्रसाद दिला जातो. या चळवळीमुळे या सर्वांवर आता प्रतिबंध येईल. या सर्व अभियानाला महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करून पाठिंबा दर्शवतो.’’

Related News