पुराणांतील कथा

वंदितासि सुरेंद्रेण, ब्रह्मणा शंकरेण च ।
अतस्त्वं पाहि नो देवि, भूते भूतिप्रदा भव ।।

अर्थ : इंद्र, ब्रह्मदेव, शंकर यांनी तुला वंदन केले आहे. अशा हे देवी, तू आमचे रक्षण करून आम्हाला ऐश्वर्य दे. होळी पेटल्यावर त्या होळीला प्रदक्षिणा करायची आणि पालथ्या हाताने शंखध्वनी करायचा, म्हणजे बोंब मारायची. मनातील दुष्ट प्रवृत्ती शांत होण्याकरता हा विधी आहे. दुसर्‍या दिवशी पहाटे होळीच्या राखेला वंदन करायचे. ती राख अंगाला लावायची आणि स्नान करायचे, म्हणजे आधी-व्याध यांची पीडा होत नाही. (आधी म्हणजे मानसिक व्यथा, चिंता व व्याधी म्हणजे रोग !)

पुराणांतील कथा

१. ढुण्ढा राक्षसी गावात शिरून लहान मुलांना पीडा द्यायची. रोग व व्याधी निर्माण करायची. तिला गावाबाहेर हाकलून देण्याकरता लोकांनी खूप प्रयत्‍न केले; पण ती जाईना. अखेरीला तिला बीभत्स शिव्या आणि शाप दिले. ती प्रसन्न झाली आणि गावाबाहेर पळून गेली. (भविष्य पुराण)

२. उत्तरेमध्ये ढुण्ढा राक्षसीऐवजी पुतनेला होळीच्या रात्री पेटवतात. होळीच्या आधी तीन दिवस अर्भक कृष्णाला पाळण्यात निजवतात व त्याचा उत्सव साजरा करतात. फाल्गुन पौर्णिमेला पुतनेचे दहन करतात.

३. दक्षिणेतील लोक कामदेवाप्रीत्यर्थ हा उत्सव करतात. भगवान शंकर तपाचरणात गढले होते. ते समाधीत होते. त्या वेळी मदनाने त्यांच्या अंत:करणात प्रवेश केला. आपल्याला कोण चंचल करतो आहे, म्हणून शंकरांनी डोळे उघडले आणि मदनाला पहाताक्षणीच जाळून टाकले. त्या मदनाचे दहन होळी पौर्णिमेला दक्षिणेत करतात. होळी म्हणजे मदनाचे दहन आहे. या मदनाला जिंकण्याची क्षमता होळीत आहे; म्हणून होळीचा उत्सव आहे.