होळीला गुलाल खेळण्यापूर्वी हा विचार करा !

आजकाल गुलाल पारंपरिक पद्धतीने बनवलेला नसल्याने तो घातकी असतो !

सुरंजीच्या (सॅन्डर्स वुड) झाडाची लाकडे पाण्यात टाकल्यावर पाण्याला लालचुटुक रंग येतो. बाजरी किंवा तांदूळ यांचे अगदी बारीक पीठ करून त्या पाण्यात बाजरीच्या पिठाची भुकटी टाकली की ती चांगली लाल होते. नंतर बाहेर काढून तिला सुकवून त्याचा गुलाल तयार होतो. तांदूळ, शिरगोळा, शाडू वगैरे पर्यायाने स्वस्त पदार्थ यासाठी वापरले जातात. शिरगोळा म्हणजे रांगोळीचा दगड. अलीकडच्या काळात आर्सेनिकसारखी रासायनिक द्रव्ये आणि शिसे, तांबे, पितळ यासारखे जड धातूही वापरले जातात.

रासायनिक गुलालाचे दुष्परिणाम !

अ. रासायनिक द्रव्य किंवा कोणत्याही जड धातूचा अगदी लहानसा कणही गुलालात असला, तर अ‍ॅलर्जी होऊन अंगावर पुरळ येते.

आ. गुलाल कानांच्या मागे राहिल्यास बुरशी येऊन कानांच्या मागे पुरळ येते.

इ. केसात गुलाल राहिल्यास बुरशी येऊन केसांमध्ये कोंडा होतो आणि केस गळण्यास प्रारंभ होतो. कोंडा होणे, हा एकप्रकारचा त्वचारोगच आहे.

ई. नाकात गुलाल गेल्यास नाकातून सतत पाणी वहाणे चालू होते.

उ. गुलाल खेळण्यात लहान मुलांचे प्रमाण जास्त असते. ही मुले स्वच्छ आंघोळ करीत नाहीत आणि गुलाल अंगावर सूक्ष्मप्रमाणात चिकटून राहतो. विशेषत: केसात. परिणामी बुरशी निर्माण होते.– डॉ. रेखा लांजेवार, त्वचारोगतज्ञ

ऊ. गुलाल डोळ्यांमध्ये गेल्यास बुब्बुळावर चरे अथवा पांढरे डाग पडून, डोळ्यांना अपाय होतो.

ए. गुलालात रांगोळी आणि बर्‍याचदा चकाकी येण्यासाठी काचेच्या तुकड्यांचा वापर केला जातो. याचा डोळ्यांना त्रास होतो.– डॉ. योगेश शहा, नेत्ररोगतज्ञ

ऐ. गुलाल पोटात गेल्यास उलट्या आणि जुलाब होण्याची शक्यता असते.

ओ. गुलाल फुफ्फुसात गेल्यास कालांतराने श्वसनविकाराचा त्रास होतो.– डॉ. किरण आंबेकर

डोळ्यात गुलाल गेल्यास करावयाचे उपाय


अ. डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत. हे पाणी शक्यतो निर्जंतुक (उकळून थंड केलेले) असावे.

आ. कोणत्याही परिस्थितीत डोळा चोळू नये. त्वरित डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जावे.

रासायनिक गुलाल आपल्या मुलांसाठी खरेदी करावयाचा का ? याचा जागरूक ग्राहक म्हणून तुम्हीच विचार करावयाचा आहे.’– सौ. मालती आठवले, मुंबई ग्राहक पंचायत, ग्राहक भवन, विलेपार्ले (पश्चिम), मुंबई

संदर्भ : दैनिक लोकसत्ता, १३.३.१९९९