श्री माणिक प्रभू

श्री माणिक प्रभू यांचा जन्म निजामशाहीतील बसव कल्याण नजीकच्या लाडवंती या लहानशा खेड्यात झाला. त्यांचे बालपण बसव कल्याण येथे गेले. त्यांचे सबंध आयुष्य विलक्षण चमत्कारांनी भरलेले आढळून येते.

बालपणी ते एकटेच भयंकर घनघोर अरण्यात फिरत. वृक्षलतांच्या सान्निध्यात, हिस्त्र पशूंच्या संगतीत दिवस घालवीत. देवस्थानांना, तीर्थक्षेत्रांना ते भेटी देत फिरत. ते शाळेत गेले नाहीत; परंतु ते बालपणी मोठमोठ्या पंडितांशी गहन विषयांवर चर्चा करीत, त्यामुळे ते विद्वान थक्क होऊन जात. हिंदी, मराठी, कानडी, तेलंगी, उर्दू, फारसी या भाषांवर त्यांचे लहानपणापासूनच प्रभुत्व होते. या भाषेत त्यांनी रचलेली पदे हृदयस्पर्शी आहेत. योगसामर्थ्य व ज्ञानसंपदा मिळविण्यासाठी त्यांच्याकडे अनेक थोर माणसे येत होती. वयाच्या विसाव्या वर्षापासून माणिक प्रभू हे सर्व भारतभर फिरले. शेवटी हुमणाबाद नजीकच्या गहन अरण्यातील एका बेलाच्या झाडाखाली ते निवास करून राहिले.

श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, माणिक प्रभू, स्वामी समर्थ, साईबाबा, गजानन महाराज हे सर्व दत्तावतारी मानले जातात.

अक्कलकोटला बाबा सबनीस हे गृहस्थ राहात होते. त्यांचे कुटुंब निवर्तल्याने ते उद्विग्न होते. मनःशांती लाभावी म्हणून ते हुमणाबादला माणिक प्रभूंच्या दर्शनाला गेले. तिथे गेल्यावर सबनीसांना माणिक प्रभूजवळ तीन मूर्ती बसलेल्या दिसल्या. माणिक प्रभूंनी सबनीसांना त्या तीन मूर्तींचे दर्शन घेण्यास सांगितले. त्या तिघांपैकी एका यतिराजाकडे बोट दाखवीत माणिक प्रभू म्हणाले, ''हेच यापुढे तुझे गुरु.

सबनीस त्यांचे दर्शन घेऊ लागले तोच ज्यांच्याकडे माणिक प्रभूंनी बोट दाखविले ते यतिराज सबनीसांना म्हणाले, ''तुम कसाई हो ! अक्कलकोट जाव, हम भी आयेंगे!'' आपण अक्कलकोटचे आहोत हे यांना कसे समजले? सबनीस यांना त्याचे नवल वाटले. तसेच वृध्द मातोश्री आपल्याला जाऊ नको म्हणत असता, त्यांची इच्छा मोडून आलो म्हणून यतिराज आपल्याला कसाई म्हणाले हे सबनिसांच्या लक्षात आले.

सबनीस अक्कलकोटला आल्यावर श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला गेले असता माणिक प्रभूंनी ज्या यतिराजांना 'तुमचे गुरु' म्हणून उल्लेख केला तेच स्वामी समर्थ आहेत हे पाहताच सबनीस गहिवरले व त्यांनी समर्थांचे चरण धरले. स्वामी समर्थांनी सबनीस यांना आनंद व समाधान दिले.

माणिक प्रभू हे जगद्गुरू होते. विश्वोद्धाराचे महान कार्य त्यांनी केले. अनेक साक्षात्कारी संत त्यांच्याकडे भक्तिमार्गाने आत्मसाक्षात्काराचे उद्दिष्ट गाठता यावे यासाठी, थोर सत्पुरुष मार्गदर्शनासाठी जात. ते साक्षात परमेश्वरच होते. कोणत्याही धर्माने व संप्रदायाने दुसऱ्यास हलके समजू नये, त्यातील चांगल्या गोष्टींचा सत्वांश ग्रहण करण्याचा उदार दृष्टीकोन जगासमोर ठेवून सकलमत सांप्रदायाची त्यांनी उभारणी केली. अंगीकृत कार्य नेमाने चालावे याची व्यवस्था केली. सहा महिने अगोदर माणिक प्रभू यांनी आपला समाधी दिवस म्हणजे एकादशीचा पुण्य दिवस निश्चित केला होता. हजारो भाविकांना ते दत्तावतार ईश्वर असल्याचा त्यांच्या समाधी स्थानी प्रत्यय येतो.