श्री गाडगे महाराज (इ.स. १८७६-१९५६)

श्री डेबूजी झिंगराजी उर्फ गाडगे महाराज यांचा जन्म विदर्भातील कोते या खेडेगावी झाला. ते परीट समाजातील होते. गाडगे महाराजांनी वयाच्या आठव्या वर्षापासून आपल्या घरातील विपन्न परिस्थितीचे, आपल्या समाजाच्या मागासलेपणाचे, समाजाच्या अडाणीपणाचे निरीक्षण केले. महाराजांनी आपल्या मामाची शेती स्वतःच्या अपरिमित परिश्रमातून फुलवून अज्ञान, दारिद्र्य, अंधश्रद्धा असलेल्या आपल्या समाजापुढे आपल्या श्रमांचा आदर्श ठेवला.

गाडगे महाराज कठोर परिश्रम करून जीवन जगत होते. एके दिवशी एका जटाधारी तेजस्वी योग्याने शेतात येऊन त्यांना प्रसाद दिला. रात्रभर त्यांना स्मशानात बसवून घेऊन आपली पारमार्थिक साधना त्यांनी गाडगे महाराजांना दिली. गाडगेमहाराजांना त्या जटाधारी योगी सत्पुरुषाने देवीदास म्हणून संबोधिले.

एके दिवशी रात्रीच्या वेळी सर्व झोपी गेले असता सर्वस्वाचा त्याग करून ते निघून गेले. गाडगे महाराजांनी बारा वर्षे अज्ञातवासात काढली. नंतर आपले तन, मन, धन जनसेवेत वेचण्यासाठी, लोककल्याणासाठी त्यांनी कठोर तप आचरिले. या काळात गाडगे महाराजांनी कदान्न सेवन करून, चिंध्या पांघरून, मस्तकी गाडगे धारण करून देहश्रमाची पराकाष्ठा केली. लोक त्यांना गाडगे महाराज म्हणून आदराने हाक मारू लागले.

लोकजीवन तेजाने उजळण्यासाठी हातीच्या खराट्याने गावाचे रस्ते झाडीत ते महाराष्ट्रात सर्वत्र फिरले. विवेकाच्या खराट्याने गावोगावी फिरून त्यांनी लोकांची मने स्वच्छ केली. खेडोपाडी, शहरोशहरी जाऊन कीर्तने केली. शिक्षणाचे महत्व गाडगे महाराजांनी लोकांना पटवून दिले. साक्षरतेचा प्रचार केला. प्रसार केला. गाडगे महाराज म्हणजे लोकजागृती साधणारे एक फिरते विद्यापीठ होते. गाडगेमहाराज जास्त शिकलेले नव्हते; परंतु संतांचे अभंग त्यांना तोंडपाठ होते. ‘गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला’ असा गजर केल्यानंतर लगेच हरिपाठ म्हणत. गाडगे महाराजांचे कीर्तन असले म्हणजे ते ऐकण्यासाठी लोक लांबलांबून येत.

गाडगे महाराजांनी पंढरपूर, देहू, आळंदी, नाशिक, मुंबई येथे धर्मशाळा बांधल्या. जनकल्याणाची अनेक कामे त्यांनी यशस्वीरित्या राबविली. आपले जीवन त्यांनी विरागी व धर्मशील वृत्तीने व्यतीत केले. जाती, धर्म व वर्ण यांतील भेद त्यांच्याजवळ नव्हता. समतेचे ते पुरस्कर्ते होते. त्यांच्या अंतःकरणात लोककल्याणाची जबरदस्त भावना होती. लोकांनी त्यांना संत समजून त्यांच्याविषयी भक्ति बाळगली. सामान्य लोकांसाठी त्यांनी खूप कार्य केले. अखेर अमरावती येथे त्यांनी आपला देह ठेवला.

महाराजांनी जगाच्या कल्याणात आपले जीवन कष्टविले. आपल्या कर्तृत्वाने ते वंदनीय बनले.

Leave a Comment