संत बहिणाबाई (शके १५५१)

बहिणाबाईंचा जन्म वेरुळच्या पश्चिमेकडे, वैजापूर तालुक्यातील देवगाव येथे झाला. त्यांच्या आईचे नाव जानकी व पित्याचे नाव आऊजी कुलकर्णी. बहिणाबाई या वारकरी संप्रदायाच्या शेवटच्या संत कवयित्री. त्यांचे लग्न वयाच्या तिसऱ्या वर्षीच झाले. त्यांचा नवरा बिजवर होता. त्याचे वय तीस वर्षाचे होते. त्यामुळे बहिणाबाई यांच्या वाट्याला जास्तच दुःख आले.

एकदा संत तुकारामांचा अभंग त्यांच्या वाचनात आला. बहिणाबाईंनी सात दिवस तुकाराम महाराजांचा ध्यास घेतला. सातव्या दिवशी त्यांना तुकाराम महाराजांचा स्वप्न-साक्षात्कार झाला.

तुकारामरूपे घेउनी प्रत्यक्ष l
म्हणे पूर्वसक्ष साम्भाहीजे l
ठेविनिया कर मस्तकी बोलिला l
मंत्र सांगितला कर्णरंध्री ll
तुषितांची जैसे आवड जीवन l
तैसा पिंड प्राणविण त्या l
बहिणी म्हणे हेतू तुकोबाचे ठायी l
ऐकोनिया देही पदे त्यांची ll

यामुळे बहिणाबाईंचा लौकिक लोकांपर्यंत पसरला. लोक बहिणाबाईंच्या दर्शनाला येऊ लागले. नवऱ्याच्या मनात मत्सराने घर केले. लोक आपल्या पत्नीला नमस्कार करतात व आपणाला तृणवत लेखतात, असे त्याला वाटू लागले. तुकारामांच्या स्वप्नाने आपल्या बायकोची अशी स्थिती झाली हे पाहून तो अधिकच संतापला. लोक तिची धन्यता वाखाणतात, तिला नमस्कार करतात आणि आम्ही जन्मतः ब्राह्मण असूनही आम्ही लोकांच्या दृष्टीने वाया गेलो, हे असं का? अशा विमनस्क मनःस्थितीत पतीने बहिणाबाईंचा त्याग करण्याचे ठरविले. ते ऐकून बहिणाबाईला अत्यंत दुःख झाले. बहिणाबाईंची आपल्या पतीबद्दलची प्रखर प्रबळ प्रतिक्रिया प्रकट झाली.

भ्रताराची सेवा तोचि आम्हां देव l

भ्रतार स्वयमेव परब्रम्ह l

भ्रतार तो रवी मी प्रभा तयासी l

वियोग हा त्यासी कैवि घडे l

भ्रतार दर्शनाविण जाय दिस l

तरी तेची राशी पातकाच्या ll

बहिणाबाईंचा हा अभंग संतसाहित्यात सुप्रसिद्ध आहे

संतकृपा झाली l इमारत फळा आली l

ज्ञानदेव रचिला पाया l उभारिले देवालया l

नामा त्याचा किंकर l तेणे रचिले ते आवार l

जनार्दन एकनाथ खांब दिल्हा l

भागवत तुका झालासे कळस l

भजन करा सावकाश ll