श्री संत चैतन्य महाप्रभू (इ.स. १४८६ ते १५३३)

बंगालमध्ये गंगा तीरावर नवद्विप गावी निंब वृक्षाच्या पर्णकुटीत इ.स. १४८६ फाल्गुन शुद्ध पौर्णिमा या दिवशी जगन्नाथ व शुचीदेवी यांना पुत्र झाला. त्याचे नाव विश्वंभर ठेवण्यात आले. त्याची आई त्याला निमाई म्हणून हाक मारीत असे. तेच चैतन्यप्रभू.

पंडित गंगारामकडे त्यांनी संस्कृत आणि न्यायशास्त्राचे अध्ययन केले. नंतर त्यांनी स्वतः पाठशाला काढली. त्यांची गणना श्रेष्ठ पंडितात होऊ लागली. निमाई बृह्स्पतीसारखा अलौकिक तेजस्वी महापुरुष होता. विद्यासागर ही त्याला पदवी मिळाली होती. पंडित वल्लभाचार्य यांची सुविध कन्या लक्ष्मी हिच्याशी निमाईचा विवाह झाला. ज्येष्ठ पंडितांबरोबर पूर्व बंगालला ते गेले असता त्यांची पत्नी लक्ष्मी सर्पदंशाने मृत्युमुखी पडली. पुढे आईच्या आग्रहास्तव विष्णुप्रिया या राजपंडिताच्या कन्येबरोबर त्यांनी दुसरा विवाह केला. त्याच वेळी निमाईने केशव पंडिताचा न्यायशास्त्रात पराभव करून ‘आचार्य’ ही पदवी संपादन केली. व्याकरणावर मोठा ग्रंथ लिहिला. न्यायशास्त्रावरही ग्रंथलेखन केले.

निमाईची श्रीकृष्णावर पूर्ण श्रद्धा होती. श्रीकृष्णाचे भजन गात नृत्य करीत भक्तीचिंतनात ते एकाग्र होत. भक्तीसाधनेत त्यांचे वैराग्य वाढत गेले. संन्यास घ्यायची इच्छा प्रबळ झाली. घरसंसार सोडून कटवा गावी गेल्यावर त्यांना गुरु केशव भारती भेटले. त्यांनी निमाईला संन्यासदीक्षा दिली. त्यांचे नाव श्रीकृष्ण चैतन्य ठेवले. पुढे ‘चैतन्य महाप्रभू’ हे नाव रूढ झाले. चैतन्य महाप्रभू सर्व लोकांना सांगत की, ”श्रीकृष्णाचे नामस्मरण करा. कृष्णभक्ती हाच खरा परमार्थ आहे. श्रीकृष्णाचे नामच सर्व शास्त्रांचे सार आहे. ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे’ हेच नामसंकीर्तन लोकप्रिय झाले. सर्व धर्माचे लोक त्यांचे भक्त होते. त्यांनी कृष्णभक्तीचा प्रसार करून सामान्य लोकांना जीवनमुक्तीचा मार्ग उपलब्ध करून दिला.

चैतन्य महाप्रभू दक्षिण भारत यात्रेला गेले. कन्याकुमारीपर्यंत यात्रा झाल्यावर ते जगन्नाथपुरीला आले. इ.स. १५३३ मध्ये श्रीकृष्ण भक्तीचिंतनात भक्तांसह नृत्य करीत समुद्रकिनाऱ्याने जात असता त्यांना दृष्टांत झाला की श्रीकृष्ण जलविहार करीत आहेत. त्यांना भेटण्यासाठी ‘हे प्रभू… हे कृष्ण…’ करीत हात उंचावत श्रीकृष्णाचे नामजल्लोशात देह समुद्रात झोकून दिला. मोठी लाट आली आणि त्यात ते अदृश्य झाले. पुन्हा दिसलेच नाहीत. पुढे त्यांच्या शिष्यांनी चैतन्यभक्ती संप्रदायाचा प्रसार केला. श्रीकृष्णभक्ती हीच चैतन्य संप्रदायाची उपासना.

Leave a Comment