संत सावता माळी

संत सावता माळी हे ज्ञानदेवांच्या काळातील एक प्रसिद्ध संत होते. त्यांचा जन्म इ. स. १२५० चा आहे आणि त्यांनी इ. स. १२९५ मधे देह ठेवला. अरण-भेंड हे सावतोबांचे गाव होय. सावता माळी यांच्या आजोबांचे नाव देवु माळी होते, ते पंढरीचे वारकरी होते. त्यांचे वडिल पूरसोबा आणि आई हे धार्मिक वळणाचे होते, पूरसोबा शेतीचा व्यवसाय सांभाळून भजन-पूजन करीत असत. पंढरीची वारी करीत असत.

कर्म करीत रहाणे हीच खरी ईश्वर सेवा आहे अशी शिकवण सावता माळी यांनी दिली. वारकरी संप्रदायातील एक जेष्ठ संत म्हणुन त्यांचा लौकिक आहे. ते विठ्ठलाचे परम भक्त होते. ते कधीही पंढरपुरला गेले नाहीत. असे म्हटले जाते की खुद्द्द विठ्ठलच त्यांना भेटायला त्यांच्या घरी जात असे. ते कधीही पंढरपूरला गेले नाहीत. प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांना भेटावयास आले. ते कर्ममार्गी संत होते.

त्यांनी अध्यात्म आणि भक्ती, आत्मबोध आणि लोकसंग्रह, कर्तव्य आणि सदाचार याची बेमालूम सांगड घातली. ईश्वराला प्रसन्न करून घ्यावयाचे असेल तर जप, तप यांची आवश्यकता नाही तसेच कुठे दूर तिर्थयात्रेला जाण्याचीही गरज नाही; केवळ ईश्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन केल्यास आणि श्रद्धा असल्यास ईश्वर प्रसन्न होतो आणि दर्शन देतो असा विचार त्यांनी मांडला.

सावता माळी यांनी ईश्वराच्या नामजपावर जास्त भर दिला. ईश्वरप्राप्तिसाठी संन्यास घेण्याची किंवा सर्वसंगपरित्याग करण्याची गरज नाही. प्रपंच करतानाच ईश्वर प्राप्ति होऊ शकते असे म्हणणार्‍या सावता महाराजांनी त्यांच्या मळ्यातच ईश्वर पाहिला.

”कांदा मुळा भाजी l अवघी विठाबाई माझी ll

लसूण मिरची कोथिंबिरी l अवघा झाला माझा हरी ll ”

सावता महाराजांनी पांडुरंगाला लपवण्यासाठी खुरप्याने आपली छाती फाडून बालमूर्ती ईश्वराला हृदयात दडवून ठेवून वर उपरणे बांधून ते भजन करीत राहिले. पुढे संत ज्ञानेश्वर, नामदेव पांडुरंगाच्या शोधात सावता महाराजांकडे आले, तेव्हा त्यांच्या प्रार्थनेमुळे पांडुरंग सावतोबांच्या छातीतून निघाले. ज्ञानेश्वर, नामदेव पांडुरंगाच्या दर्शनाने धन्य झाले. सावता महाराज म्हणतात – भक्तीमध्येच खरे सुख नि आनंद आहे. तीच विश्रांती आहे.

सांवता म्हणे ऐसा भक्तिमार्ग धरा l

जेणे मुक्ती द्वारा ओळंगती ll

Leave a Comment