संत जनाबाई


संत जनाबाईने आपल्या अभंगांची नावे ‘दासी जनी’, ‘नामयाची दासी’ आणि ‘जनी नामयाची’ अशी ठेवली आहेत. ती मुळात नामदेवाच्या घरी दासी म्हणून कशी आली? याबद्दलची माहिती अगदी दहाबाराओळीतच सांगण्यासारखी आहे. पण या दासीपणाची, स्वत:च्या शूद जातीची आणि इतकेच नव्हे, तर स्वत:च्या ‘स्त्री’पणाचीही जाणीव व्यक्त करणारे अनेक अभंग तिच्या मनातून तिच्या शब्दांत उमटले आहेत आणि विठ्ठलाला मायबाप आणि प्रसंगी सखा, जिवाचा मैतर समजणाऱ्या जनीने विठ्ठलाशी त्याबद्दल संवाद साधलेला तिच्या अनेक हृद्य अभंगांतून दिसतो.

गंगाखेड नावाच्या गावात राहणाऱ्या, ‘दमा’ नावाच्या एका शूद जातीच्या भक्ताची, जनाबाई ही मुलगी. या तिच्या जातीबद्दलचा उल्लेख तिच्या अनेक अभंगांतून तिने स्वत: केलेला आहे. जनाबाई पाच वर्षांची असतानाच तिची आई स्वर्गवासी झाली. दमाला स्वप्नात दृष्टान्त झाला आणि त्या दृष्टान्तानुसार, विठ्ठलभक्त असणार्‍या, पंढरपुरात वास्तव्य करणार्‍या, शिंपी जातीच्या दामाशेट्टींकडे आपल्या चिमुरड्या जनीला सोडून दमा निघून गेला. दामाशेट्टींचं सगळंच कुटुंब भगवद्भक्त होतं. पंढरपूरच्या केशिराजाची पूजा त्यांच्याकडे चालत असे. त्यांचा मुलगा नामदेव हा तर इतका विठ्ठलवेडा होता की तो विठ्ठलाला आपला मित्रसखाच मानत असे.

अशा नामदेवाच्या कुटुंबात जनाबाई आश्रित म्हणून राहिली. जनीची आई आधीच देवाघरी गेलेली आणि आता सख्खा बापही देवदेव करीत निघून गेलेला. या अनाथतेची जाणीवही जनाबाईच्या अभंगांत ठायी-ठायी व्यक्त झाली आहे. ”आई मेली बाप मेला। मज सांभाळी विठ्ठला॥ हरि रे मज कोणी नाही। माझी खात (खाजत) असे डोई॥ विठ्ठल म्हणे रुक्मिणी। माझे जनीला नाही कोणी॥ हाती घेऊनी तेलफणी। केस विंचरुनी घाली वेणी॥” असा कल्पनेतला संवाद जनी विठ्ठलाशी करते. सर्वांचा सखा असणार्‍या नियंत्यापाशी मायेचा आधार शोधण्याची मानसिकता या अभंगात आहे.

तेव्हा आश्रित म्हणून असली तरी, जनाबाई दामाशेट्टीच्या कुटुंबापैकीच एक झाली होती. तिच्यावर जेव्हा विठ्ठलाचा हार चोरण्याचा आळ आला, तेव्हा पंढरपूरच्या देवळातले बडवेदेखील तिला म्हणतात, ”अगे शिंपियाचे जनी। नेले पदक दे आणोनी॥”

नामदेवाच्या घरात वावरताना त्या दासीचे जग ते केव्हढे असणार? अंगण, परसू, माजघर, कोठार एव्हढ्याच सीमेत ती वावरत असणार. पण शरीराने इतक्या सीमित जागेत वावरणारी जनी मनानं मात्र असीम अशा परमात्म्याला पहात होती. त्याचं स्वरूप जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होती. तुळशीवृंदावन, अंगण, रांजण, जातं, शेणी वेचायला जाण्याचं रान अशा स्थळांचे तिच्या अभंगांत उल्लेख आहेत आणि त्या सर्व जागांवर देव तिचा सांगाती आहे. तो कोठीखोलीत तिला दळू लागतो, रानात शेण्या वेचू लागतो, अंगणात सडा घालू लागतो. अशा घराच्या सीमेतच तो अनंत, असीम परमेश्वर ती बघते. घरातल्या घरात कष्टाची, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने ही आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.

गेल्या जन्मीचे संचित, दामाशेट्टींकडचे भक्तीचे वातावरण आणि नामदेवादिक संतांचे आध्यात्मिक संस्कार या सर्वांमुळे भक्त असणार्‍या दासीजनीची ‘संत जनाबाई’ झाली.

ती एका अभंगात म्हणते,

माझें नाठवे मीपण । तेथें वैंâचें दुजेपण ।।
सर्वांठायीं पूर्ण कळा । दासी जनी पाहे डोळां ।।

असा सर्वत्र परमेश्वर दिसेल इतके तिचे मन:चक्षू विशाल झाले आहेत. परमात्म्याची ‘पूर्णकळा’ तिनं जाणलेली आहे. अभंगात पूर्णकळा हा शब्द वापरून सगळ्या उपनिषदांचं तत्त्वज्ञान तिनं एका शब्दात सांगितलेआहे.