संत मुक्ताबाई

जिच्यामुळे मराठी साहित्याचे दालन भावसंपन्न झालेले असून, जिने मायमराठीच्या सारस्वतात भक्तीचा मला फुलविलेला आहे. अशा ज्ञानदेवाच्या भगिनी मुक्ताबाई हिचा जन्म इंद्रायणीतीरी वसलेल्या आळंदीच्या गावाजवळील सिद्धबेटावर अश्विन शुद्ध प्रतिपदा शुक्रवार शके १२०१ म्हणजेच इ. सन. १२७९ मध्ये झाला. त्यांच्या आई-वडिलांचे मूळ गाव औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील आपेगाव हे होय.

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावंडांमध्ये मुक्ताबाई या सर्वात लहान होत्या. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली, पण हे सारे भोग सोसत ह्या चारही बहिण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं तरी सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायःश्चिताचा निर्णय शिरसावंद्य मान्य करून त्रिवेणी संगमात देहविसर्जन केले. मात्यापित्यांच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आलेले होते.

मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला. तिचा आदेश स्वीकारला. मुक्ताबाईचे गुरु म्हणजे तिचेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे होत. मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेश पीडांचा प्रतिसाद नाही. सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे. याबाबतीत संत नामदेवांचा प्रसंग बोलका आहे. संत नामदेवराय हे विठ्ठलाचे परम भक्त, ते एकदा सहज ज्ञानदेवाच्या भावंडांना भेटले असता, निवृत्तीसह दोघाभावांनी नामदेवांना वंदन केले; परंतु नामदेवांनी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही, तर ते ताठ बसून राहिले. मुक्ताबाईंनी मात्र नामदेवांचा हा अहंकार ओळखून त्यांना नमस्कार केला नाही, दर्शन घेतले नाही. उलट अधिकारवाणीने अत्यंत झणझणीत शब्दात तिने नामदेवाची कानउघाडणी केली.

अखंड जयाला देवाचा शेजार l
कारे अहंकार नाही गेला ll
मान अपमान वाढविसी हेवा l
दिवस असता दिवा हाती घेसी l
परब्रह्मासंगे नित्य तुझा खेळ l
आंधळ्याचे डोहाळे का बा झाले l
कल्पतरू तळवटी इच्छिती ते गोष्टी l
अद्यापि नरोटी राहिली का l
घरी कामधेनु ताक मागू जाय l
ऐसा द्वाड आहे जगा माजी l
म्हणे मुक्ताबाई जाई ना दर्शना l
आधी अभिमाना दूर करा ll

मुक्ताबाईंनी केलेल्या या कानउघाडणीनंतर नामदेवरायांचा अहंकार निवला. त्यांनी गुरु माउलीच्या आशीर्वादासाठी विसोबारायांकडे मार्गक्रमणा केली. त्यानंतर नामदेव ज्ञानदेवादी भावंडांच्या सान्निध्यात राहू लागले. त्यांनी गावोगावी 'नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी' अशा ईर्षेने यात्रा केल्या. त्यांच्या अभंगगाथा म्हणजे भावभक्तीचा नम्रमधुर ठेवा आहे. त्यावर मुक्ताबाईंच्या वत्सल स्नेहाचा अवीट ठसा उमटलेला आहे.

यानंतर असेच ज्ञानदेवादी भावंडे त्र्यंबकेश्वरावरून पुनःश्च परतीच्या अलंकापुरीच्या वाटेवर असताना पुण्यस्तंभ पुणताम्ब्याजवळ पोहोचली. त्या ठिकाणी गोदातटावर महातपस्वी चांगदेवाचा निवास होता. गुहेत त्यांची समाधी लागलेली होती. गुहेच्या भोवती काही मृत शरीरे लिंबाच्या पाचोळ्याखाली झाकून ठेवलेली या भावंडांना दिसली. समाधी उतरल्यानंतर चांगदेव महाराज त्या प्रेतांना जिवंत करणार अशा आशेने मंडळी वाट पाहत बसलेली होती. ज्ञानदेवांनी त्या मंडळीची तितिक्षा पाहून कृपावंत होऊन मुक्ताबाईस संजीवनी मंत्र कथन केला. हे सिद्धीसामर्थ्य पाहून चांगदेव ज्ञानदेवांना शरण आले. त्यांनी चांगदेवांना मुक्ताबाईकडे गुरुपदेश मागण्यास सांगितले. मुक्ताबाईंनी शिष्य म्हणून चांगदेवाचा स्वीकार केला.

मुक्ताबाई आयुष्यातील प्रत्येक प्रसंगांना निर्भयपणे खंबीरपणे सामोरी जाते. विवेक तर मुक्ताबाईत दृढपणे विसावलेला. म्हणून जेव्हा जनसमाजाकडून प्रत्येकवेळी होणारी उपेक्षा व अपमान सहन न होऊन, ज्ञानेश्वर जेव्हा उद्विग्न स्थितीवर मात करावी म्हणून पर्णकुटीची ताटी (दार) बंद करून ध्यानस्थ बसले. त्यावेळी केवळ नऊ वर्षांची लाडीवाळ मुक्ताबाई कर्तव्यदक्ष पित्याची कठोर जबाबदारी आत्मविश्वासाने पेलून आपल्या वत्सल अभंगवाणीने ज्ञानदेवांना उद्देशून योग्याची लक्षणे कथन करते. दु:खी अपमानित ज्ञानदेवांचे ताटीच्या अभंगात सांत्वन करते. ताटीच्या अभंगात मुक्ताबाईचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्ताबाईंनी जी संतत्वाची लक्षणे सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.

शुद्ध ज्याचा भाव झाला l दुरी नाही देव त्याला l
अवघी साधन हातवटी l मोले मिळत नाही हाटी l
कोणी कोणा शिकवावे l सारे शोधुनिया घ्यावे ll
लडिवाळ मुक्ताबाई l जीव मुद्यल ठायीचे ठायी l
तुम्ही तरुनी विश्वतारा l ताटी उघडा ज्ञानेश्वरा l

मुक्ताबाईंनी रचलेल्या अभंगाची संख्या जरी मोजकीच असली तरी त्यांच्या अभंगवाणीतूनही त्यांच्या प्रद्नेची, विचाराची भव्यता आणि उत्तुंग कल्पनेची दिव्यता अनुभवायला मिळते. त्यांच्या अभंगाच्या ओळी ओळीतून, शब्दाशब्दातून त्यांचा परिपूर्ण अध्यात्माधिकार, योगसामर्थ्य, प्रौढ प्रगल्भ जाण, अविचल आत्मविश्वास यांचे सुशांत दर्शन घडत राहते. मुक्ताबाईंनी ताटीचे अकरा अभंग लिहिले आहेत. तसेच हरिपाठाचे अभंगही लिहिले आहेत. हरिपाठ म्हणजे मुक्ताबाईचे अनुभवकणच आहेत. आत्मरुपाचा साक्षात्कार शब्दात व्यक्त करण्याचा हा त्यांचा एक अविष्कार आहे.

मुक्तपणे अखंड त्यासी पै फावले l
मुक्तची घडले हरीच्या पाठी l
रामकृष्णे मुक्त जाले पै अनंता l
तरले पतीत युगायुगी l
कृष्णनामे जीव सदा झाले शिव l
वैकुंठ राणिव मुक्त सदा l
मुक्ताई संजीवन मुक्तमुक्ती कोठे l
जाल पै निवाडे हरिरूप l

मुक्ताबाईंनी मराठी अभंगरचनेबरोबरच काही हिंदी पदेही रचली आहेत. वामन दाजी ओंक यांनी मुक्ताबाईचे एक हिंदी पद संकलित केले आहे ते असे –

वाहवा साहेबजी l सद्गुरुलाल गुसाईजी
लाल बीज मो उदीला काला, औठ पिठसो निला l
पीत उन्मनी भ्रमर गुंफा रस झुला बाला l
सहस्त्र दल मो अलख लिखाये, आज लौ परमाना l
जहां तहा साधू, दसवा आप ठिकाना l
सदगुरु चेले दोनो बराबर, येक देशमो भाई l
एकसे ऐसे दरसन पायो महाराज मुक्ताई l

ज्ञानदेवांनी आणि सोपानदेवांनी एका मागोमाग एक अशा शके १२१८ मध्ये समाध्या घेतल्या तेव्हा निवृत्तीनाथ आणि मुक्ताई व्यथा-व्याकूळ झाले, उदासीन झाले. मुक्ताई अबोल व उदासी बनली. दु:खी कष्टी अवस्थेत मुक्ताबाई महाराष्ट्राच्या उत्तर भागात तापी तीरावर मेहून येथे आल्या. वैशाख वद्य दशमी शके १२१९ या दिवशी वीज कडाडली आणि मुक्ताबाई वैकुंठवासी झाल्या. संत नामदेव महाराजांनी समाधीग्रहण प्रसंगाचे हृदय वर्णन केले आहे.

कडाडली वीज निरंजनी जेव्हा l
मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली l
वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l
एक प्रहर झाला प्रकाश त्रिभुवनी l
जेव्हा निरंजनी गुप्त झाली l
गेले निवारुनी आकाश आभुट l
नाम म्हणे कोठे मुक्ताबाई l

ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडांतील बालयोगिनी मुक्ताबाई यांचा आध्यात्मिक अनुभव थोर होता. ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप मुक्ताबाई होय.