श्री संत चोखामेळा

संत चोखामेळा हे श्रीमंत ज्ञानेश्वर महाराज यांचे समकालीन होते. त्यांची बायको सोयराबाई, बहीण निर्मलाबाई व मुलगा कर्ममेळा असे सर्व कुटूंब विठठल भक्त होते. त्यांनी पुष्कळ अभंग लिहीले असून ते प्रसिध्द आहेत. त्यांनी विवेक दिप म्हणून एक ग्रंथ लिहीला आहे. मंगळवेढे येथे किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असता ते एकाएकी कोसळले व त्याखाली श्री चोखोबाराया आणि अनेक मजूर मयत झाले ही घटना शके १२६० म्हणजे इ.स. १३३८ मध्ये वैशाख वद्य पंचमीस झाली. पुढे श्री संत नामदेव महाराज हे मंगळवेढ्यास आले व ज्या अस्थिमधून विठ्ठ्ल विठ्ठ्ल असा आवाज होता त्या अस्थि श्री चोखोबारायांच्या आहेत असे ओळखून त्यांनी त्या पंढरपूरी विठठल मंदिरापुढे सध्या नामदेव पायरी म्हणून जी पायरी दाखविली जाते त्या पायरीसमोर वद्य त्रयादशी रोजी नेऊन ठेविल्या. मंगळवेढे येथे त्यांची पुण्यतिथी वद्य पंचमीस होते व पंढरपूरी वद्य त्रयोदशीस होते. त्या समाधी स्थानावर श्री राजे निंबाळकर फलटण यांनी चांगली घुमटी बांधली आहे. मंगळवेढे येथे त्यांच्या निधनाच्या जागे वर एक शोभिवंत घुमटी बांधावी अशी सुचना ना. बाळासाहेब खेर यांनी मंगळवेढयास आल्यावेळी केली होती. त्याप्रमाणे श्री. संत चोखामेळा स्मारक समिती म्हणून एक समिती स्थापन होऊन त्या समितीने निम्मी वर्गणी जमविली व सरकारांतून निम्मी वर्गणी मिळाली. व एक चांगले सुशोभित स्मारक त्याठिकाणी झाले आहे. या घुमटीचे उदघाटन श्रीमंत राजेसाहेब सांगली यांनी ता १४/०३/१९६० रोजी केले आहे.

श्रीसंत चोखोबाच्या अस्थि घेऊन जातान श्रीसंत नामदेव महाराज यांनी मंगळवेढ्यापासून दोन मैलावर व १० मैलावर विसावा घेतला त्या ठिकाणी लोकांनी पादुका स्थापन केल्या असून पंढरपूरास चालत जाताना त्या विसाव्यापाशी थांबून पादुकांचे दर्शन घेण्याचे वारकरी व इतर वारकरी व इतर मंडळीची पध्दत आहे. श्रीसंत चोखोबा महाराज यांचे चरित्र लिहिलेल अभंग गाथा प्रसिध्द आहे.

ऊस डॊंगापरी । रस नोहे डोंगा ।
काय भुललासी । वरलीया रंगा ।
चोखा डोंगापरी । भाव नाही डोंगा ।
काय भुललासी । वरलीया सॊंगा ।

चोखामेळा नेहमी म्हणत :

कृष्ण निंदा केली होती ॥ म्हणून महार जन्मास येती ॥

अशा अभंगातून त्यांनी स्वत:च्या जातीबद्दल वर्णन केले आहे. चोखामेळा हे मुळचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहुण या गावंचे रहिवाशी. ते उदरनिर्वाहासाठी पंढरपूरी शके १२०० साली आले. पंढरपूरी आल्यानंतर त्यांना विठठल भक्तीत दंग झाले. ते सदैव पांडुरंगाचे नामस्मरणात व भजनात रंगून जायचे. त्यावेळी मंगळवेढे नगरी भरभराटीस आली होती. शके १२६० ला मंगळवेढ्यातील वेशीच्या पुर्वेकडील तटाची भिंत कोसळली होती. व तिचे बांधकाम करण्यासाठी पंढरपूरचे मजूर आणण्यासाठी दूत पंढरपूरी आला. आणि त्या मजुरासोबत चोखामेळा तटाच्या भिंतीचे बांधकाम करण्यासाठी सहकुटुंब मंगळवेढ्यास आला. याचा पुरावा अभंगातून चोखोबांनी व्यक्त केला आहे.

मंगळवेढ्याभॊवती कुसू बांधावया । महाराशी बोलावण्या दूत आले ।
महारा समागमे चोखामेळा आला । काम ही लागला करावया ॥

असा पुरावा चोखॊबाच्या अभंगगाथ्यात आहे. सदैव विठ्ठल नामात ते दंग असायचे. चोखोबांना नेहमी हीन कामे करावी लागायची. एखादे अवघड काम चोखोबांना होईना त्यावेळी स्वत: पांडूरंग ते काम आवडीने करायचे.