राष्ट्राचे रक्षण करण्याचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करूया !

आपल्या स्वातंत्र्यसैनिकांनी इंग्रजांच्या १५० वर्षांच्या गुलामगिरीतून आपल्या देशाला सोडवले. यामुळेच आपण स्वातंत्र्यदिनाचा हा सोहळा साजरा करू शकत आहोत. इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून आपल्या देशाची मुक्तता झाली, याची आठवण म्हणून दरवर्षी आपण स्वातंत्र्यदिन साजरा करतो.

भारत स्वतंत्र होण्याआधी मुघल, पोर्तुगीज, अदिलशहा, कुतुबशहा व इंग्रज यांसारख्या अनेकांनी भारतावर राज्य केले. या सर्वांनी भारतातील स्वार्थी व फितुर यांना हाताशी धरून स्वातंत्र्यसैनिकांवर जुलूम करून राज्य केले. व्यापार करण्याच्या निमित्ताने इंग्रज भारतात आले. अशा मूठभर इंग्रजांनी लाखोंची संख्या असलेल्या आपल्या देशावर १५० वर्षे राज्य केले. आपल्यात एकी नसल्याने इतक्या कमी संख्येने आलेले परकीय आपल्यावर राज्य करू शकले.

आपल्यावर दुसरे कोणीतरी राज्य करत आहेत; ते जुलमी आहेत, हे लक्षात येऊनही केवळ आपल्यात राष्ट्रप्रेम नसल्याने, एकजूट नसल्याने हे परकीय आपल्यावर राज्य करू शकले. भारतातील लोकांना स्वराज्याबद्दल आदर नाही. राष्ट्रप्रेम, स्वराज्याबद्दल आदर, एकजूट हे गुण आपल्यात नसल्याने किंवा योग्य त्या वेळी या गुणांचा वापर न झाल्याने आपल्याला पारतंत्र्यात रहावे लागले.

भारताचा इतिहास पाहिला, तर तो अत्यंत उज्ज्वल आहे. त्यातून आपण खूप काही शिकू शकतो. यासाठी शिवाजी महाराजांचे उदाहरण सर्वोत्तम आहे. अतिशय लहान वयात त्यांनी हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्या मावळ्यांना हाताशी घेऊन स्वराज्याच्या स्थापनेची शपथ रोहिडेश्‍वराच्या देवालयात घेतली. त्यानंतर एकेक मावळा तयार केला व त्यांच्याकडून भवानीदेवीची उपासना करून घेतली. समर्थ रामदासस्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. या राज्याची स्थापना करतांना त्यांनी ‘श्रींचे राज्य आहे’, हाच विचार मनात ठेवून राज्य स्थापन केले.

दुसरे उदाहरण लोकमान्य टिळकांचे आहे. भारत पारतंत्र्यात असतांना ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, अशी गर्जना करत त्यांनी भारतीय जनतेला जागे केले. स्वातंत्र्यवीर सावरकर, वल्लभभाई पटेल तसेच इतर क्रांतिकारक अन् स्वातंत्र्यसैनिक यांच्यामुळे भारत स्वतंत्र झाला.

सध्या आपण स्वतंत्र भारतात रहातो. आज आपल्याला कोणते चित्र दिसते ? सध्या सगळीकडे दहशतवाद पसरला आहे. भारताच्या काश्मीर, पंजाब, गुजरात, सिक्कीम या राज्यांत सीमेलगतच्या देशांची आक्रमणे होत आहेत. दररोज अतिरेकी मोठ्या प्रमाणावर देशात घुसखोरी करून मोठमोठ्या शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवत आहेत. दहशतवाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे १५ ऑगस्ट, २६ जानेवारी यांसारखे राष्ट्रीय सणही आपल्याला कडेकोट पोलीस बंदोबस्तात साजरे करावे लागतात. म्हणजे आपला भारत देश खर्‍या अर्थाने स्वतंत्र आहे का ? सुरक्षितता आपल्याला लाभते आहे का ? नाही ना ! यासाठीच आपल्याला राष्ट्राभिमान व धर्माभिमान जोपासणे आवश्यक आहे.

यासाठी आपण काय करू शकतो ?

ध्वजाचा मान राखूया

१५ ऑगस्ट अन्  २६ जानेवारी या राष्ट्रीय दिनांच्या दिवशी लहान आकारातील कागदी राष्ट्री ध्वजांची विटंबना मोठ्या प्रमाणावर केली जाते. लहान मुलांसह अनेक व्यक्ती राष्ट्रभक्ती व उत्साह यांच्यापोटी हे ध्वज खरेदी करतात. हे ध्वज कशाही पद्धतीने लावले जातात. काही दिवसांनंतर हेच ध्वज फाडून रस्त्यावर, कचराकुंडीत व इतस्तत: टाकले जातात. हे सर्व करत असतांना आपण राष्ष्ट्रध्वजाचा म्हणजेच राष्ट्राचा अवमान करत असतो. आपणही अशीच अयोग्य कृती करणार का ? आपणच आपल्या ध्वजाचा मान राखूया. इतरांकडून अशा तर्‍हेने ध्वजाचा अवमान होत असेल, तर त्याविषयी आपण त्यांना सांगूया व आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया. २६ जानेवारी नंतर इतरत्र पडलेले ध्वज आपण उचलून ठेवूया. याबाबत आपण आपल्या मित्रांना व शेजारच्यांनाही सांगूया.

राष्ट्रीय सणांच्या दिवशी स्वातंत्र्यवीरांनी राष्ट्रासाठी केलेल्या
प्रयत्नांची आठवण ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करणे

१५ ऑगस्ट या दिवशी सकाळी ध्वजवंदन करण्यासाठी आपण सगळे शाळेत एकत्र जमूयात. या दिवशी ध्वजवंदन होऊन शाळेला सुटी असल्याने बरीच मुले शाळेत न जाता घरी उशिरापर्यंत झोपणे, घरात दूरदर्शनवर कार्यक्रम पहात बसणे, फिरायला जाणे इत्यादी करतात. त्याऐवजी स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्यवीरांची व क्रांतिकारकांची आठवण ठेवून त्यांच्यातील ज्या गुणांमुळे त्यांनी स्वातंत्र्याचा लढा दिला, ते गुण आपल्यात आणून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया.

मन कणखर होण्यासाठी नामस्मरण करणे लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर या देशभक्तांनी स्वत.च्या शरीराबरोबर स्वत:चे मनही कणखर होण्यासाठी प्रयत्न केले. आपले मन कणखर असेल, तर आपण कोणत्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊ शकतो. मन कणखर बनवण्यासाठी आपल्यात आत्मविश्‍वास निर्माण होणे आवश्यक आहे.

त्यासाठी आपण आपल्या आवडत्या देवतेची आठवण सतत ठेवायला हवी. दिवसभरात काही वेळ तरी आपण देवाचे नाव घेतले पाहिजे. शाळा व शिकवणी वर्ग (क्लास) यांमध्ये जातांना-येतांना, जेवतांना, दूरदर्शनवरील कार्यक्रम पहातांना, ज्या वेळेत आपण विशेष महत्त्वाचे काम करत नसू, त्या वेळी मनातल्या मनात आपण नामस्मरण करू शकतो. देवाचे आशीर्वाद असतील, तर कोणतीही गोष्ट करणे अवघड नसते. त्यासाठी प्रत्येक गोष्ट करतांना देवाचे स्मरण करणे, त्याला सांगून प्रत्येक गोष्ट करणे आवश्यक आहे. (कोणत्या देवतेचे नाम व कसे घ्यावे, याविषयी माहिती देणे) याविषयीची अधिक माहिती आपल्याला सनातन संस्थेतर्फे जे विनामुल्य बालसंस्कारवर्ग घेतले जाता त्यातून मिळू शकेल.

शरीर सुदृढ रहाण्यासाठी व्यायाम करणे

सध्याच्या काळात मनाच्या कणखरतेप्रमाणे आपण आपले शरीरही कणखर बनवणे आवश्यक आहे. यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. प्रत्येकाने दररोज सूर्यनमस्कार घालणे आवश्यक आहे.

स्वत.मध्ये नैतिक मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न करणे

प्रत्येक गोष्ट वेळच्या वेळी करणे, प्रामाणिकपणे करणे, सत्य बोलणे, मोठ्यांचा आदर राखणे, त्यांना उलट उत्तरे न देणे यांसारख्या गोष्टी म्हणजेच नैतिक मूल्ये आपण आपल्यात रुजवणे आवश्यक आहे. आपण या गोष्टी करतो ना, याकडे आपले लक्ष हवे. आपण अशा पद्धतीने वागत असू, तरच आपण देवाला अपेक्षित असे वागतो, असे होईल.

तर आजपासून आपण आपल्या देशाचे उत्तम नागरिक होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. आपल्या पुस्तकात दिलेल्या प्रतिज्ञेप्रमाणे राष्ट्राभिमान व राष्ट्रभक्ती जागृत करण्यासाठी आणि संपूर्ण जगामध्ये आपल्या राष्ट्राचे नाव उज्ज्वल करण्यासाठी झटायला हवे. आजच्या या दिवशी भारतमातेला आनंदात ठेवण्याची शपथ आपण घेऊया.

Leave a Comment