विद्यार्थी मित्रांनो, आपण खरंच स्वतंत्र आहोत का ?

१. इंग्रजांचे वंशज असणारे भारतीय !

‘१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी आपण (भारत देश) स्वतंत्र झाला; पण ‘आपण खरंच स्वतंत्र आहोत का’, हा प्रश्न पडतो. याचे कारण म्हणजे आज आपली प्रत्येक कृती इंग्रजांप्रमाणे आहे. इंग्रजांनी आपल्यावर अनेक अत्याचार केले. जालीयनवालाबाग हत्याकांड, तसेच सावरकरांना बैलाप्रमाणे घाण्याला बांधून चाबकाचे फटके दिले. स्वातंत्र्यासाठी अनेकांनी स्वत:च्या संसाराची राखरांगोळी केली. अनेकजण फासावर गेले. असे असतांना आपल्याला त्याची चीड न येता आपण त्यांचे मानसिक गुलाम होऊन रहात आहोत. प्रगती आणि विज्ञान यांच्या नावाखाली आपली संस्कृती, देव, देश अन् राष्ट्रप्रेम यांचा आपल्याला विसर पडल्यासारखेच आपण वावरत आहोत. खरेतर आपण आपल्या कृतीतून ‘आम्ही जणू इंग्रजांचेच वंशज आहोत’, असे दाखवतो.

२. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेले स्वराज्य

लोकमान्य टिळक म्हणाले होते, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.’ त्यांना अपेक्षित असणारे स्वराज्य म्हणजे स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वसंस्कृती, स्वभाषा यांविषयी तीव्र अभिमान असलेल्या लोकांचे राष्ट्र. आज स्वातंत्र्यानंतर आपल्याला उलट चित्र दिसत आहे. हे सर्व पाहिल्यावर आपल्याला वाटते, ‘खरंच आपण स्वतंत्र आहोत का ?’

३. असे होते इंग्रजांचे अनुकरण !

३ अ. इंग्रजांचीच वेशभूषा करणे : आज आपण स्वतंत्र भारतात इंग्रजांचीच वेशभूषा करून वावरतो. मुले टाय, शर्ट, पँट, तर मुली इंग्लंडच्या मुली असल्याप्रमाणे जीन्स आणि टी शर्ट घालून फिरतात. तसे करणे आपल्याला भूषणावह वाटते. आज मुलांना विचारले, ‘तुमच्याकडे सदरा आणि पायजमा आहे का ?’ ते ‘नाही’ म्हणून सांगतात. आपण निश्चय करायला हवा. मी स्वतंत्र भारतात वावरतो. माझा वेश किमान सणांच्या वेळी भारतीय असेल, तर ‘मी स्वतंत्र भारतात रहातो’, असे आपण म्हणू शकतो.

 ३ आ. शिक्षकांना ‘सर’ म्हणणे : आज आपण जर स्वतंत्र आहोत, तर शिक्षकांना ‘गुरुजी’ म्हणायला हवे. त्यांना ‘हॅलो’ न म्हणता आदराने प्रतिदिन नमस्कार करायला हवा. ‘सर’ इंग्रजांना म्हटले जायचे. मग आपणही तसे बोलणार का ?

३ इ. मातृभाषेतील नव्हे, इंग्रजीत शिक्षण घेणे अभिमानास्पद वाटणे : ज्या इंग्रजांनी आमच्यावर १५० वर्षे अत्याचार केले, त्यांच्या भाषेत शिक्षण घेणे आम्हाला अभिमानाचे वाटते. याचा अर्थ आम्ही आजही इंग्रजांचे मानसिक गुलामच आहोत. आपण आपल्यातील स्वभाषेचा अभिमान जागृत करून मातृभाषेत शिक्षण घेतले पाहिजे.

३ ई. क्रांतीकारकांपेक्षा चित्रपटातील अभिनेते आदर्श असणे : भगतसिंग, राजगुरु, सुखदेव आणि सावरकर हेच आपले आदर्श हवेत. त्यांनी सर्वस्वाचा त्याग केला. क्रांतीकारक ऐन तारुण्यात फासावर चढले, याची आपल्याला सतत आठवण यायला हवी. त्यांच्या त्यागातून आपण सतत आदर्श घेतला पाहिजे. चित्रपटातील अभिनेते हे आपले आदर्श नव्हेत.

३ उ. सर्व गोष्टींचा शोध इंग्रजांनी लावल्याने अभिमान वाटणे; मात्र प्रत्यक्षात मूळ संशोधकाविषयी जाणून न घेणे : आज आपल्याला सांगितले जाते, ‘सर्व शोध इंग्रजांनी लावले. त्यामुळे आपल्याला त्यांचा अभिमान वाटतो.’ खरेतर इंग्रज येण्यापूर्वीच आपल्या ऋषीमुनींनी सर्व शोध लावले होते.

१. विमानाचा शोध – भारद्वाज ऋषी 

२. खगोलशास्त्र – आर्यभट्ट 

३. रसायनशास्त्र – नागार्जुन  

४. वनस्पतीशास्त्र – जीवक 

३ ऊ. पाश्चात्त्य पद्धतीने वाढदिवस साजरा करणे : हल्ली मुले केक कापून आणि मेणबत्ती फुंकून वाढदिवस साजरा करतात. मग आपण स्वतंत्र आहोत का ? औक्षण करून वाढदिवस साजरा केल्यासच ‘आपण स्वतंत्र आहोत’, असे म्हणू शकतो.

३ ए. इंग्रजांप्रमाणे आहार करणे : पाव, बटर, बर्गर, पिझ्झा यांपेक्षा खरेतर आपला आहार म्हणजे आमटी, भात, भाकरी आणि पोळी हा आहे. जसा आहार, तसे विचार होतात. आहार इंग्रजांचा असल्यास विचारही तसे होतील.

३ ऐ. आई-बाबांना ‘मम्मी आणि पप्पा’ म्हणायला आवडणे : आई-बाबांना आपल्याला ‘पप्पा आणि मम्मी म्हणायला आवडते. हे इंग्रजांचे गुलाम असल्याचे प्रतीक आहे. आजपासून आपण ‘आई-बाबा’च म्हणायला हवे, तरच आपण स्वातंत्रदिन साजरा केला, असे होईल.

३ ओ. प्रतिज्ञा, राष्ट्रगीत आणि वन्दे मातरम् यांच्या वेळी घडणार्‍या अयोग्य कृतींमुळे होणारा राष्ट्राचाच अपमान : हल्ली मुले प्रतिज्ञा म्हणतांना चेष्टा करणे, अनावश्यक बोलणे, लिखाण करणे अशा कृती करतात. असे करणे म्हणजे आपल्या प्रतिज्ञेचा अपमान करण्यासारखे आहे. पर्यायाने तो राष्ट्राचाच अपमान आहे. आपण ‘वन्दे मातरम्’ची दोनच कडवी म्हणतो. हा आपल्या राष्ट्रगीताचा अपमान आहे. प्रत्यक्षात ते सहा कडव्यांचे आहे. आजच्या दिनी आपण संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा निश्चय करायला हवा.

३ औ. स्वातंत्रदिनाच्या दिवशी ध्वजाचा अवमान करणे : काही मुले ध्वजाचा खेळण्यासाठी वापर करतात. सायकलला लावून फिरतात. काही जण खिशाला लावतात. सायंकाळी ध्वज कुठेतरी पडतो. प्लास्टिकच्या ध्वजाची विक्री करणे आणि तिरंग्याच्या रंगाचा टी-शर्ट वापरणे हे सर्व करणे म्हणजे आपल्या राष्ट्राच्या प्रतिकाचा अवमान करणेच आहे. आपण आज प्रतिज्ञा घ्यायला हवी, ‘मी राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ देणार नाही.’

४. पारतंत्र्यातील स्थिती पालटून स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी निश्चय करा ! : आपण जरी स्वतंत्र असलो, तरी इंग्रजांच्या मानसिक गुलामगिरीत वावरत आहोत. थोडक्यात आपण स्वतंत्र नसून पारतंत्र्यातच वावरत आहोत. ही स्थिती पालटण्याचा निश्चय करणे, हाच खरा स्वातंत्र्यदिन साजरा करणे होय.’

राष्ट्राभिमान जागृत करणारी प्रश्नमंजुषा  सोडविण्यासाठी येथे क्लिक करा !

– श्री. राजेंद्र पावसकरगुरुजी, पनवेल

Leave a Comment