Due to a software update, our website may be briefly unavailable on Saturday, 18th Jan 2020, from 10.00 AM IST to 11.30 PM IST

मुलांनो, सुराज्य स्थापनेचा निश्चय करून स्वातंत्र्यदिन साजरा करा !

१. प्रस्तावना

         ‘विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने भारतमातेला स्वातंत्र्य मिळण्यासाठी कोणी कोणी त्याग केला, हे पाहूया.

१ अ. मुलांनो, क्रांतीकारकांनी केलेल्या त्यागाची जाणीव आहे का ? : स्वातंत्र्यविरांच्या त्यागामुळे आज आपण स्वतंत्र भारतात रहातो; पण क्रांतीकारकांनी या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. ऐन तारुण्यात कित्येकांना फासावर जावे लागले, तर कित्येकांना काळ्या पाण्याची शिक्षा भोगावी लागली, तसेच इंग्रजांनी अनेकांना तोफेच्या तोंडी दिले. कित्येकांना अन्न पाण्याविना ठेवून अन् तडफडून मारले, तर काहींना बैलांसारखे घाण्याला बांधून चाबकाचे फटके देत त्यांच्याकडून तेल काढून घेतले. मित्रांनो, खरंच आज आपल्याला याची जाणीव आहे का ? एवढा अमानुष छळ सोसून ज्यांनी स्वातंत्र्य मिळवले, त्यांच्याविषयी आम्हाला खरंच कृतज्ञता वाटते का ? मित्रांनो, हा चिंतन करण्याचा विषय असून चिंतेचेही सूत्र आहे; कारण २६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट या दिवशी केवळ आठवण करणे अन् त्यांची गाणी लावणे आणि वर्षभर त्यांना विसरणे, अशी स्थिती आपल्याला सर्वत्र दिसत आहे.

१ आ. समाजाची संकुचित मानसिकता : सध्या आपल्या राष्ट्राला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पूर्वी विश्वात आदर्श असणारा आपला देश आज सर्व विषयांमध्ये मागे आहे. याचे कारण आहे स्वार्थ ! आज प्रत्येकाची मानसिकता पाहिली, तर ‘मी आणि माझे’, या पलीकडे कोणीच विचार करत नाही.

१ इ. भ्रष्ट आणि स्वार्थी राज्यकर्त्यांमुळे पारतंत्र्याचे जीवन जगणे : आपण विचार करा की, जर क्रांतीकारकांनी असा विचार केला असता आपण आज स्वतंत्र झालो असतो का ? नाही ना ? आज भ्रष्ट आणि स्वार्थी राज्यकर्ते राज्य करत असल्याने आपण पारतंत्र्याचे जीवन जगत आहोत. यासाठी आपण क्रांतीकारकांचा आदर्श समोर ठेवून आपल्यातील देशाभिमान जागृत करूया.

२. क्रांतीकारकांनी केलेला त्याग

२ अ. झाशीची राणी !

२ अ १. ‘मेरी झांसी नही दूंगी ।’ असे म्हणून इंग्रजांशी युद्ध करणे : झाशीच्या राणीचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ या दिवशी झाला. इंग्रज सर्व संस्थाने खालसा करून स्वतःच्या नियंत्रणात घेत होते. राणीने घेतलेला वारस नामंजूर करून ते राज्य खालसा झाल्याचे इंग्रजांनी घोषित केले; पण राणीने सांगितले, ‘मेरी झासी नही दूंगी ।’ असे म्हणून इंग्रजांशी युद्ध केले.

२ अ २. ६० सहस्र रुपयांचे निवृत्ती वेतन नाकारणे : अपमानित अन् लाचारीने जीवन जगणे मान्य नसल्याने तिने इंग्रज देत असलेले ६० सहस्र रुपयांचे निवृत्ती वेतन नाकारले.

२ अ ३. निर्भयतेने लढणे : झाशीची राणी ही खिस्ताब्द १८५७ च्या लढ्यातील प्रमुख आधार होती. ती शेवटपर्यंत लढली. स्वतःचा उजवा डोळा लोंबत असतांनाही ती लढत होती. यावरून आपल्याला तिच्यातील निर्भयता आणि राष्ट्रप्रेम दिसून येते.

२ अ ४. शूर आणि सर्वोत्तम सेनानी स्त्री : इंग्रज अधिकार्‍याने तिच्याविषयी लिहिले आहे की, शूर आणि सर्वोत्तम सेनानी स्त्री म्हणजे झाशीची राणी ! आपणही तिचा आदर्श समोर ठेवून राष्ट्रासाठी त्याग करायला हवा.

२ आ. वासुदेव बळवंत फडके

२ आ १. इंग्रजांमुळे आईच्या अंत्यसमयी तिचे दर्शन घेता न येणे : फडके यांची आई आजारी असतांना इंग्रज अधिकार्‍यांनी त्यांना मुद्दाम सुटी दिली नाही. परिणामी त्यांना आईचे शेवटचे दर्शन घेता आले नाही.

२ आ २. स्वतःची स्थिती चांगली असूनही इंग्रज भारतियांवर करत असलेल्या अत्याचारांमुळे मनात चीड निर्माण होणे : चांगली शासकीय नोकरी आणि चांगला संसार असतांना फडके यांना इंग्रज देशबांधवांवर करत असलेले अत्याचार पाहून प्रचंड चीड येत होती. माणसे भुकेच्या विचारानेच फिरत होती; पण इंग्रज काहीच करत नव्हते, याची चीड त्यांच्या मनात निर्माण झाली.

२ आ ३. वासुदेव बळवंत फडके यांनी तरुणांची फौज सिद्ध करून इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारणे : दीनदुबळ्यांचे कल्याण, हे व्रत आणि पांढर्‍या पायाच्या इंग्रजांना देशाबाहेर हाकलणे, हेच त्यांचे ध्येय होते. यासाठी त्यांनी तरुणांची फौज (सेना) सिद्ध केली आणि इंग्रजांची नोकरी सोडून इंग्रजांविरुद्ध युद्ध (बंड) पुकारले.

२ आ ४. एडन तुरुंगात पुष्कळ छळ होऊन त्यांचा मृत्यू होणे : मेजर डॅनियलने फंदफितुरी करून त्यांना पकडले आणि एडनच्या तुरुंगात त्यांचा अतोनात छळ करण्यात आला. ते तुरुंग फोडून तिथून पळाले. शेवटी त्यांना पुन्हा पकडण्यात येऊन छळ वाढवला गेला. त्यातच १७ फेब्रुवारी १८८३ या दिवशी त्यांचा अंत झाला.

२ इ. चापेकर बंधू

२ इ १. प्लेगच्या साथीच्या काळात इंग्रजांनी सामान्य लोकांवर पुष्कळ अत्याचार करणे : इंग्रजांच्या काळात प्लेगची साथ आली होती. या रोगाने लोक मृत्यू पावत होते; पण इंग्रज साहाय्य करण्यापेक्षा लोकांचा छळ करायचे. या रोगामुळे काख आणि जांघा येथे गाठी येऊन तापही यायचा.त्यांची तपासणी करायला येणारे इंग्रज स्त्रियांना वाईट वागणूक देत, तसेच पुरुषांना कपडे काढून भर रस्त्यात नग्न करणे आणि देवघरातील देव रस्त्यावर फेकून देणे, अशी कृत्ये करायचे.

२ इ २. चापेकर बंधूंनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारून इंग्रज अधिकारी रँड याची हत्या करण्याचे ठरवणे : आपल्या बांधवांचा इतक्या प्रमाणात अतोनात छळ करण्यात आला. हे सहन न झाल्याने एकाच घरातील सख्ख्या तीन भावांनी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारले. दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव अशी त्या तिघांची नावे होती. ‘देशातील प्रत्येक नागरिक हा माझा बंधू असून प्रत्येक माता ही माझीसुद्धा माता आहे’, अशा व्यापक विचाराने त्यांनी ‘त्या काळचा अत्याचारी इंग्रज अधिकारी रँड याची हत्या करायची’, असे ठरवले.

२ इ ३. रँडचा वध केल्यावर चापेकर बंधूंना फाशी देण्यात येणे : २२.६.१८९७ या दिवशी या बंधूंनी अन्यायी रँडचा वध केला आणि त्या तिघा भावांना फाशी देण्यात आली. मित्रांनो, सुराज्यासाठी आज आपल्याला अशाच त्यागी बंधूंची आवश्यकता आहे. आपल्या देशात सुराज्य आणण्यासाठी तुम्ही चापेकर बंधूंसारखे सिद्ध आहात का ? 

२ ई. मदनलाल धिंग्रा (जन्म १८८४ आणि फाशी १७ ऑगस्ट १९०९)

२ ई १. देशासाठी सर्वस्वाचा त्याग : लहान मुलगा आणि बायको यांना न सांगता देशासाठी घर सोडून गेले.

२ ई २. इंग्लंडच्या राजधानीत, लंडनमध्ये अतिमहत्त्वाच्या आणि क्रूर अशा कर्झन वायलीचा वध करणारा पहिला क्रांतीकारक ! : धिंग्रा यांनी भारतातील अत्याचाराचा प्रतिशोध घेण्याचा निश्चय केला आणि इंग्लंडमध्ये जाऊन कर्झन वायलीचा वध केला. त्यांच्या धैर्याने विश्वभरातील स्वातंत्र्यवादी आणि क्रांतीकारक प्रभावित झाले. आयर्लंडमध्ये त्यांची भित्तीपत्रके (पोस्टर्स) लावून सन्मान केला. जे इंग्रज आपल्यावर राज्य करत होते, त्यांच्याच राजधानीत जाऊन त्यांचा वध केला. त्यामुळे इंग्लंडमध्ये खळबळ माजली. यातून आपल्याला त्यांच्यात असणारे भारतमातेविषयीचे प्रेम दिसते. ‘सुराज्या’साठी आपल्यातून मदनलाल धिंग्रा तयार होईल, तेव्हाच भारतात ‘सुराज्य’ येईल.

२ उ. नेताजी सुभाषचंद्र बोस

२ उ १. देशवासियांचा छळ करणार्‍या इंग्रजांची नोकरी न करण्याचे ठरवणे : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म कटक येथे २३.१.१८९७ या दिवशी बंगाली कुटुंबात झाला. ते इंग्लंडमध्ये आय्.सी.एस्. परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांनी आय्.सी.एस्. या पदवीचा त्याग केला, तसेच ‘जे इंग्रज आपल्याच देशवासियांचा छळ करतात, त्यांची नोकरी कधीच करायची नाही’, असे त्यांनी ठरवले.

२ उ २. ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना करणे : इंग्रजांकडून होणारी भारतियांची छळवणूक आणि पिळवणूक पाहून त्यांना अस्वस्थ वाटले. त्यांनी २१ ऑक्टोबर १९४३ या दिवशी ‘आझाद हिंद सेने’ची स्थापना केली आणि त्यांनी तरुणांना ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूँगा ।’ असे आवाहन केले. त्यांच्या सेनेने अंदमान बेट स्वतंत्र केले.

२ उ ३. देशबांधवांना जर्मन नभोवाणीवरून स्वातंत्र्यासाठी आव्हान करणे : त्यानंतर नेताजी पुष्कळ लोकप्रिय झाले. ते देशबांधवाना जर्मन नभोवाणीवरून स्वातंत्र्यासाठी आव्हान करू लागले. शेकडो  भारतीय सैनिकांमध्ये राष्ट्रभक्ती जागृत करून त्यांना बंड करण्यास सांगितले.

२ उ ४. देशासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे नेताजी सुभाषचंद्र बोस हेच आपले स्फूर्तीस्थान आहेत.

२ ऊ. स्वातंत्र्यवीर सावरकर

२ ऊ १. भारतियांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागृत करणे : नाशिक जिल्ह्यातील ‘भगूर’ या गावी २८.५.१८८३ या दिवशी जन्म झाला. त्यांनी भारतियांच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत जागृत केली.

२ ऊ २. अंदमानच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा देण्यात येणे आणि तेथे अनेक हालअपेष्टा सोसाव्या लागणे : त्यांना अंदमानच्या तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. त्यांना कारागृहात अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. त्यांना बैलासारखे घाण्याला बांधून तेल काढायला लावले. ते करतांना त्यांना ताप भरला. तेव्हा तेथील अधिकारी त्यांना चाबकाचे फटके देऊन घाण्याला फिरायला लावायचे. कधी कधी तर भर पावसात उभे राहून जेवावे लागायचे. जेवणात घोण आणि साप यांचे तुकडे मिळायचे.

         क्रांतीकारकांनी स्वातंत्र्यासाठी अनेक हाल सहन केले, याची आपल्याला जाणीव आहे का ? आज स्वातंत्र्यदिनी आपण या क्रांतीकारकांच्या त्यागाची आठवण करून आपल्यातील राष्ट्रप्रेमाची ज्वाला तेवत ठेवायला हवी. या भ्रष्टाचारी राज्यकत्र्यांपासून भारतमातेची सुटका करून ‘सुराज्य’ आणण्याचा निश्चय करणे, हाच खरा स्वातंत्र्यदिन साजरा करणे होय. मग तुम्हीही तसे कराल ना ?

३. मानसिक दास्यत्व

         मित्रांनो, आता आपण पाहिले की, इंग्रजांनी त्या वेळी आपल्या बांधवांवर किती अत्याचार केले आणि ज्या क्रांतीकारकांनी या अन्यायकारी इंग्रज राजवटीच्या विरुद्ध बंड पुकारले, त्यांना फासावर चढवले किंवा तुरुंगात हाल करून मारले, तर काहींना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. मित्रांनो, आपल्या मनात याची चीड सतत असायला हवी; पण आज आपल्याला स्वतंत्र भारतात इंग्रजांसारखे वागणे आणि बोलणेच आवडते. आज आपण त्यांच्या मानसिक दास्यत्वातच वावरत आहोत, हीच आपली शोकांतिका आहे. मित्रांनो, आपण याचा निषेध करायचा ना ? आज आपण इंग्रजांचे मानसिक दास्यत्व पत्करून क्रांतीकारकांनी केलेल्या त्यागाचा अपमान करत आहोत. मित्रांनो, हे योग्य आहे का ?

४. मानसिक दास्यत्वाची उदाहरणे

४ अ. वाढदिवस इंग्रजी दिनांकाप्रमाणे आणि केक कापून साजरा करणे : आज मुले इंग्रजी दिनांकाप्रमाणे वाढदिवस साजरा करतात. मित्रांनो, असे करणे म्हणजे क्रांतीकारकांनी केलेल्या त्यागाची चेष्टाच आहे. मित्रांनो, आपण निश्चय करायला हवा की, मी माझा वाढदिवस तिथीप्रमाणे आणि तुपाचा दिवा लावून भारतीय संस्कृतीप्रमाणे करीन. असे केल्यासच मला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा हक्क आहे.

४ आ. एकमेकांना भेटल्यावर ‘हॅलो’ म्हणणे : भारतीय संस्कृतीप्रमाणे आपण एकमेकांना भेटल्यावर हात जोडून वाकून ‘नमस्कार’ करतो. जर आपण दुसर्‍याच्या हातात हात मिळवून ‘हॅलो’ म्हणत असू, तर हे इंग्रजांचे दास्यत्व नाही का ?

४ इ. इंग्रजीत स्वाक्षरी करणे : इंग्रजीत स्वाक्षरी करणे म्हणजे इंग्रजी भाषेविषयीचा अभिमान व्यक्त करणे होय. मित्रांनो, आपली मातृभाषा मराठी आहे, तर आपण आपल्या भाषेतच स्वाक्षरी करायला हवी.

४ ई. अर्थहीन दिवस (डेज्) साजरे करणे : फ्रेंडशिप डे, व्हॅलेंटाईन डे आणि रोज डे हे इंग्रजांचे दिवस आहेत.हे दिवस साजरे करून ‘आम्ही आजही इंग्रजांचे दास्यत्वच पत्करले आहे’, असे आपण विश्वाला सांगत आहोत का ? मग स्वातंत्र्यदिन तरी का साजरा करावा ? आपण अशा दिवसांचा (डेज्चा) निषेध करणे, हाच खरा स्वातंत्र्यदिन आहे. हे दिवस साजरे करण्याचा विचार मनात आल्यावर प्रथम आपल्याला क्रांतीकारकांचा त्याग आठवायला हवा, तरच ‘त्यांच्यासाठी आपल्या मनात कृतज्ञता आहे’, असे म्हणता येईल.

४ उ. इंग्रजांप्रमाणे ‘नववर्ष’ ३१ डिसेंबरला साजरे करणे : भारतीय संस्कतीनुसार आपण नववर्ष ‘गुढीपाढव्या’ला साजरे करतो. मग इंग्रज गेले, तरी त्यांच्याप्रमाणे ३१ डिसेंबरला आम्ही नववर्ष साजरे का करावे ? हीच आहे इंग्रजांची मानसिक गुलामी ! या मानसिक दास्यत्वातून आज आपल्या बांधवाना मुक्त करण्याची प्रतिज्ञा करायला हवी.

५. मानसिक दास्यत्वातून मुक्त होण्यासाठी पुढील संकल्प करा !

अ. नववर्ष ३१ डिसेंबरपेक्षा गुढीपाडव्याला साजरे करा !

आ. ‘रक्षाबंधन’ साजरे करा ! ‘फ्रेंडशिप डे’चा निषेध करा ! निषेध करा !

इ. आपली ‘स्वाक्षरी’ मराठीतच करा !

ई. एकमेकांना भेटल्यावर ‘हॅलो’पेक्षा ‘नमस्कार’ म्हणा !

उ. इंग्रजांचे ‘डे’ साजरे करून क्रांतीकारकांचा अपमान करू नका ! करू नका !

ऊ. संस्कृतीचे रक्षण म्हणजे राष्ट्ररक्षण होय !

ए. भारतीय संस्कृतीप्रमाणे आचरण करणे हेच खरे स्वातंत्र होय !

ऐ. आमचे क्रांतीकारक आमच्या जीवनाचा आदर्श !

ओ. क्रांतीकारकांनी केलेल्या त्यागाचा अपमान करू नका ! करू नका !

औ. झेंड्याचा अपमान रोखा !’

राष्ट्राभिमान जागृत करणारी प्रश्नमंजुषा  सोडविण्यासाठी येथे क्लिक करा !

– श्री. राजेंद्र पावसकर, पनवेल

देश स्वतंत्र झाला तो दिवस होता ‘श्रावण कृष्ण चतुर्दशी’ या तिथीचा ! इंग्रजाळलेल्या मानसिकतेमुळे हा दिवस खिस्ती कालगणनेनुसार ‘१५ ऑगस्ट’ असल्याचे म्हटले जाते. १४ ऑगस्ट १९४७ च्या रात्री १२ वाजता भारत स्वतंत्र झाला म्हणून भारतात काही जण त्या वेळी स्वातंत्र्यदिन साजरा करतात. स्वातंत्र्यदिन तिथीनुसार साजरा करण्यास शक्य नसेल, तर असा पाश्चात्त्य संस्कृतीनुसार साजरा करण्याऐवजी हिंदु संस्कृतीनुसार सकाळी साजरा करायला हवा. हिंदू कोणतीही गोष्ट शुभ मुहूर्तावर करतात. हिंदु धर्मशास्त्रानुसार शुभ मुहूर्त सकाळी असतो आणि रात्री १२ नंतरची वेळ ही अशुभ असते.