महाभारताला ‘धर्मयुद्ध’ का म्हणतात ?

१. दुर्योधनाचे अनेक कौरवबंधू आणि शूर योद्धे पांडवांकडून मारले गेल्याने
त्याने संतापून भीष्माचार्यांना त्याचा जाब विचारणे

‘महाभारताच्या पहिल्या ३ दिवसांत दुर्योधनाचे बरेच कौरवबंधू आणि कौरवांच्या बाजूने लढणारे इतर शूर योद्धे पांडवांकडून मारले गेले. पांचही पांडवांच्या आणि त्यांच्या बाजूच्या प्रमुख योद्ध्यांपैकी कोणीही मारला गेला नव्हता; म्हणून दुर्योधन संतापला आणि त्याने कौरवांचे सेनापती भीष्माचार्य यांना याविषयी जाब विचारला. तेव्हा भीष्माचार्य म्हणाले, ‘‘उद्या मी ५ बाणांनी ५ ही पांडवांना मारीन.’’ दुर्योधन म्हणाला, ‘‘तसे नाही, कुठल्या ५ बाणांनी ५ पांडवांना मारणार आहात, ते बाण मंत्रून माझ्या कह्यात द्या. ते बाण मी उद्या सकाळी युद्धावर जाण्याच्या आधी तुम्हाला आणून देईन.’’ भीष्माचार्यांनी ५ बाण मंत्रून दुर्योधनाला दिले. दुर्योधन ते बाण घेऊन आपल्या शिबिरात आला.

२. श्रीकृष्णाने अर्जुनाला दुर्योधनाकडे जाऊन पाच बाण मागण्यास सांगणे आणि
अर्जुनाला वर दिलेला असल्याने दुर्योधनाला नाईलाजाने बाण द्यावे लागणे

श्रीकृष्णाला ही गोष्ट समजली. त्यावर त्याला उपायही सुचला. पांडव वनवासात होते, त्या वेळी दुर्योधन रानात गेला असतांना अर्जुनाने एकदा त्याचे प्राण वाचवले होते; म्हणून दुर्योधनाने अर्जुनाला कोणताही वर मागण्यास सांगितले होते. तेव्हा अर्जुनाने त्याला सांगितले होते, ‘‘आता नको, आवश्यकता भासेल, त्या वेळी मी तुझ्याकडे वर मागेन. त्या वेळी मागेन ते दे.’’

श्रीकृष्ण अर्जुनाच्या शिबिरात गेला. अर्जुनाला लगेच दुर्योधनाकडे जाऊन ते पाच बाण मागण्यास सांगितले. अर्जुन दुर्योधनाकडे गेला आणि भीष्माचार्यांनी मंत्रून दिलेले ५ बाण मागितले. अर्जुनाला वर दिलेला असल्याने दुर्योधनाला नाईलाजाने ते बाण द्यावे लागले.

श्रीकृष्णाने पांडवांचे प्राण वाचवले. दुर्योधनानेही आपल्या शब्दाला जागून ते ५ बाण अर्जुनाला दिले; म्हणूनच महाभारताला ‘धर्मयुद्ध’ असे म्हणतात.’

संदर्भ : इस्कॉन वाङ्मय

Leave a Comment