छत्रपती शिवाजी महाराजांची गुरुभक्ती !

१. छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त असल्याने समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत असणे आणि इतर शिष्यांना ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात’,असे वाटल्याने समर्थांनी त्यांचा संशय दूर करण्याचे ठरवणे

छत्रपती शिवाजी महाराज गुरु समर्थ रामदास स्वामींचे एकनिष्ठ भक्त होते. समर्थसुद्धा इतर शिष्यांपेक्षा त्यांच्यावर अधिक प्रेम करत होते. हे पाहून इतर शिष्यांना वाटले, ‘शिवाजी राजा असल्यामुळे समर्थ त्यांच्यावर अधिक प्रेम करतात.’ समर्थांनी त्यांचा संशय तात्काळ दूर करण्याचे ठरवले. ते शिष्यांसमवेत रानात गेले. तेथे गेल्यावर सर्वजण मार्ग चुकले आणि समर्थ एका गुहेत पोट दुखण्याचे ढोंग करून झोपले. शिष्य आल्यावर त्यांनी पाहिले की, गुरुजी वेदनेमुळे कण्हत आहेत. त्यांनी वेदना दूर करण्याचा उपाय विचारला. समर्थांनी उपाय सांगितल्यावर सर्व शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. दुर्बळ मनाचे लोक आणि ढोंगी भक्तांची जशी हालचाल असते, तसे वातावरण बनले.

२. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आल्याने शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारणे आणि त्यांनी भयंकर पोट दुखतअसल्याचे सांगून यावर वाघिणीचे ताजे दूध हेच औषध असल्याचे सांगणे

इकडे छत्रपती शिवाजी महाराज समर्थांच्या दर्शनासाठी निघाले. त्यांना समजले की, समर्थ याच रानात कुठेतरी आहेत. शोध घेत घेत ते एका गुहेजवळ आले. गुहेत वेदनेमुळे कण्हण्याचा आवाज ऐकू आला. आत जाऊन बघितले, तर साक्षात् गुरुदेवच कासावीस होऊन कूस पालटत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी हात जोडून समर्थांना वेदनेचे कारण विचारले.

समर्थ : शिवा, भयंकर पोट दुखत आहे.

शिवाजी महाराज : गुरुदेव, यावर औषध ?

समर्थ : शिवा, यावर काहीही औषध नाही. असाध्य रोग आहे. एकच औषध काम करू शकते; पण जाऊ दे.

शिवाजी महाराज : गुरुदेव, निःसंकोच सांगा. गुरुदेवांना स्वस्थ केल्याविना शिवा शांत बसू शकत नाही.

समर्थ : वाघिणीचे दूध आणि तेसुद्धा ताजे काढलेले; पण शिवा, ते मिळणे अशक्य आहे.

३. शिवाजी महाराज वाघिणीच्या शोधार्थ निघणे, एके ठिकाणी वाघाचे दोन छावे दिसणे, पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून वाघीण गुरगुरणे आणि शिवाजी महाराजांनी वाघिणीला नम्रपणे प्रार्थना करून पाठीवरून हात फिरवणे

शिवाजी महाराजांनी जवळ असलेले कमंडलू उचलले आणि समर्थांना नमस्कार करून ते लगेच वाघिणीच्या शोधात निघाले. थोडेसे दूर गेल्यावर एके ठिकाणी दोन वाघाचे छावे दिसले. महाराजांनी विचार केला, ‘निश्चित येथे यांची आई येईल.’ योगायोगाने तीही आली. आपल्या पिलांजवळ अनोळखी मनुष्याला पाहून ती महाराजांवर गुरगुरु लागली. महाराज तर वाघिणीशी लढण्यास समर्थ होते; परंतु येथे लढायचे नव्हते, तर वाघिणीचे दूध काढायचे होते. त्यांनी धैर्य धारण केले आणि हात जोडून ते वाघिणीला विनंती करू लागले, ‘माते, मी येथे तुला मारायला किंवा तुझ्या पिलांना न्यायला आलेलो नाही. गुरुदेवांना स्वस्थ करण्यासाठी तुझे दूध पाहिजे. ते काढू दे. गुरुदेवांना देऊन येतो, मग भले तू मला खा.’ शिवाजी महाराजांनी प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला.

४. वाघिणीचा क्रोध शांत होऊन ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागणे, महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढून कमंडलू भरणे आणि तिला नमस्कार करून गुहेत पोहोचल्यावर समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकणे

मुके प्राणीसुद्धा प्रेमाला वश होतात. वाघिणीचा क्रोध शांत झाला आणि ती त्यांना मांजरीप्रमाणे चाटू लागली. संधी पाहून महाराजांनी तिच्या स्तनांतून दूध काढले आणि कमंडलू भरून घेतले. तिला नमस्कार करून ते अतिशय आनंदाने तेथून निघाले. गुहेत पोहोचल्यावर गुरुदेवांपुढे दुधाने भरलेले कमंडलू ठेवत महाराजांनी गुरुदेवांना नमस्कार केला. ‘‘शेवटी तू वाघिणीचे दूध घेऊन आलास ! धन्य आहे शिवा ! तुझ्यासारखे एकनिष्ठ शिष्य असतांना गुरूंची वेदना काय राहू शकते ?’’ समर्थांनी शिवाजी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवून इतर शिष्यांवर दृष्टी टाकली.

आता शिष्यांना कळून चुकले की, ब्रह्मवेत्ता गुरु जर एखाद्या शिष्यावर प्रेम करत असतील, तर त्याची विशेष योग्यता असते. तो विशेष कृपेचा अधिकारी असतो. ईर्षा केल्याने आपली दुर्बलता आणि दुर्गुण वाढतात; म्हणून अशा विशेष कृपेचे अधिकारी असणार्‍या गुरुबंधूंना पाहून ईर्षा करण्यापेक्षा आपली दुर्बळता अन् दुर्गुण दूर करण्यात तत्पर राहिले पाहिजे.’

संदर्भ: मासिक ‘ऋषीप्रसाद’, जुलै २००२

Leave a Comment