एक तरी ओवी अनुभवावी ।

1395325828_gurukul_35

कौरव आणि पांडव आश्रमात राहून शिक्षण घेत होते. एकदा त्यांच्या गुरूंना काही कामानिमित्त बाहेरगावी जायचे होते. जातांना त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना ते परत येईपर्यंत काही पाठांचा अभ्यास करण्यास सांगितले. पंधरा दिवसांनी गुरु परतले आणि प्रत्येकाने काय काय अभ्यास केला, याविषयी विचारणा करू लागले. प्रत्येक जण आपण कसा जास्तीतजास्त अभ्यास केला, याविषयी सांगू लागला. शेवटी धर्मराजाची पाळी आली. धर्मराज म्हणाला, गुरुजी, मी एका वाक्याचा अभ्यास केला. धर्मराजाच्या तोंडचे उत्तर ऐकताच गुरुजींना खूप राग आला; कारण धर्मराज हा त्यांचा अत्यंत आवडता आणि हुशार विद्यार्थी होता. ते ओरडले, काय रे, या सर्वांपेक्षा तू मोठा आहेस, बुद्धीमान आहेस आणि तरीसुद्धा तू केवळ एकाच वाक्याचा अभ्यास केला म्हणतोस ? तुला लाज वाटली पाहिजे.

धर्मराज शांतपणे म्हणाला, गुुरुजी, माझा नाईलाज आहे; परंतु एवढ्या कमी काळात मी खरंच एक वाक्य शिकलो. गुरुजींचा पारा चढला. ते खवळले आणि म्हणाले, मूर्खा लेका, तू आळशीच नाहीस, तर निर्लज्ज आहेस. तरीही धर्मराज शांतच होता. जराही विचलित न होता तो म्हणाला, गुरुजी, माफ करा; पण मी खरोखरच एवढंच शिकलो. गुरुजींना राग आवरेना. त्यांनी रागाच्या भरात धर्मराजाच्या थोबाडीत मारायला सुरुवात केली, तरीही धर्मराज शांतच होता. त्याच्या तोंडावरचे भाव जरासुद्धा पालटले नव्हते.

आता मात्र गुरुजी वरमले. त्यांना वाटले की, धर्मराजाच्या म्हणण्यात काहीतरी तथ्य असले पाहिजे. ते म्हणाले, बाळ, तू कोणते वाक्य शिकलास, ते तरी सांग. धर्मराजाने आपली वही आणून दाखवली. तिथे लिहिले होते, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला राग येऊ देऊ नये. या एका वाक्यासरशी गुरुजी आणि बाकी विद्यार्थी काय समजायचे, ते समजले. विनाकारण शिक्षा केल्याविषयी गुरुजींनी धर्मराजाची क्षमा मागितली.

तात्पर्य : नुसत्या अफाट ज्ञानापेक्षा थोडे शिकले, तरी चालेल; परंतु जे शिकू, ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. संत ज्ञानेश्‍वर महाराजांनी म्हटले आहेच, एक तरी ओवी अनुभवावी ।

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९१)

Leave a Comment