सिद्धमंत्रातील सामर्थ्य

सिद्धमंत्रातील सामर्थ्य

स्वतःच्या मनाप्रमाणे साधना न करता गुरूंकडून मिळालेल्या सिद्धमंत्राची साधना करण्याचे महत्त्व अधिक असणे : महर्षी व्यास यांच्याकडे एक ब्राह्मण आला. त्याला सर्वत्र-गमन सिद्धी पाहिजे होती, यासाठी तो तप करत होता. त्याचे तप आणि नम्रता पाहून महर्षी व्यास संतुष्ट झाले. त्यांनी एका बिल्वपत्रावर श्रीराम असा मंत्र लिहिला आणि त्याची घडी करून ते बिल्वपत्र ब्राह्मणास दिले आणि सांगितले, हे बिल्वपत्र कपड्यात बांधून ठेव, म्हणजे मंत्रप्रभावामुळे तुला कुठेही जाणे शक्य होईल. तो स्वर्ग, वरुण, सूर्य इत्यादी लोकांत जाऊ लागला. एकदा ब्राह्मणाला वाटले, कोणता मंत्र आहे, तो पहावा. त्याने कापड उघडले अन् पाहिले, तर आत श्रीराम हा मंत्र लिहिलेला होता. त्याला वाटले, हा मंत्र मलाही ज्ञात आहे; परंतु या मंत्रात एवढे सामर्थ्य आहे, हे मला माहीत नव्हते. आता हे बिल्वपत्र जीर्ण झाले आहे. मी नवीन बिल्वपत्रावर मंत्र लिहितो आणि ते वापरतो. त्याने तसे केले, तर त्याचा काहीच परिणाम झाला नाही; कारण व्यासांनी दिलेल्या बिल्वपत्रावरील मंत्रात त्यांची शक्ती होती.

गुरुपादुकांचे मूल्य प्राणापेक्षाही अधिक असणे

एका भक्ताला गुरूंचे दर्शन झाले नाही. दुसरा भक्त गुरूंना भेटला, तेव्हा गुरूंनी त्याच्या पुत्राच्या विवाहानिमित्त त्याला पादुका दिल्या. त्याने हे पहिल्या भक्ताला सांगितल्यावर तो म्हणाला, मला गुरूंच्या पादुका दे, मी तुला माझी जीवनभराची मिळकत देतो. दुसर्या् भक्ताने त्याला पादुका दिल्या. पहिल्या भक्ताने पादुका हृदयाला लावल्या आणि तो नाचू लागला. गुरूंना हे समजल्यावर त्यांनी पहिल्या भक्ताला विचारले, ‘पादुका किती मूल्य देऊन घेतल्या ?’ भक्त म्हणाला, ‘जीवनभराची मिळकत दिली’. त्यावर गुरु म्हणाले, ‘व्यवहार (सौदा) स्वस्तात झाला. गुरुपादुका, गुरुकृपा यासाठी प्राण द्यावे लागतात’.

संत झाल्यावरही मूर्तीपूजा करणारे वासुदेवानंद सरस्वती !

एका शिष्याने प.प. टेंब्ये महाराज, म्हणजेच वासुदेवानंद सरस्वती यांना विचारले, महाराज आपण स्वतःच देवस्वरूप असतांना स्वतःजवळ मूर्ती का ठेवता ? आता मूर्तीपूजेची काय आवश्यकता आहे ? महाराज म्हणाले, ज्या मूर्तीच्या योगाने मला ही परम भाग्याची अवस्था प्राप्त झाली, तिला विसरणे शक्य आहे का ?

मायेमुळे स्वस्वरूपाचे ज्ञान न होणे

‘गंगा किनारी एक संत रहात होते. त्यांच्याजवळ एक परीस होता. तो मिळवण्यासाठी एकजण त्या संतांची सेवा करू लागला. संतांनी हे जाणले आणि सांगितले, “स्नान करून येतो आणि तुला परीस देतो.” संत स्नानाला गेल्यानंतर त्या व्यक्तीने ती सर्व झोपडी परीस मिळवण्यासाठी शोधली; पण परीस काही सापडला नाही. स्नान उरकून संत आल्यानंतर संतांच्या लक्षात आले की, आपल्या अनुपस्थितीत याने परीस शोधण्याचा प्रयत्न केला. ते त्याला म्हणाले, “मी परीस डबीतच ठेवला आहे आणि त्यांनी डबी काढून दाखवली. डबी लोखंडाची होती. हे पाहून त्या व्यक्तीने विचारले, “परिसाने डबी सोन्याची का नाही झाली ?” संत म्हणाले, “डबीत परीस आहे; पण तो गोधडीत गुंडाळून ठेवला आहे. ईश्‍वर आणि जीव एकाच हृदयात रहातात. वासनेचा पडदा असल्यामुळे दोघांचेही मीलन होत नाही. जीवात्मा म्हणजे डबी आणि परमात्मा म्हणजे परीस.’

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)

Leave a Comment