चारित्र्यबल आणि सिंहासारखे साहस निर्माण करू शकते, ते खरे शिक्षण ! – स्वामी विवेकानंद

‘कुणी काही परीक्षा दिल्या वा व्याख्यानांची आतषबाजी केली की झाला तो तुमच्या दृष्टीने शिक्षित! जे शिक्षण लाभल्याने सामान्य जनता जीवनसंग्रामाला लायक होऊ शकत नाही, जे शिक्षण चारित्र्यबल, परसेवा तत्परता आणि सिंहासारखे साहस निर्माण करू शकत नाही, त्याला काय शिक्षण म्हणायचे ? ज्या शिक्षणाने माणूस जीवनात स्वतःच्या पायांवर उभा राहू शकतो, तेच खरे शिक्षण. जे शिक्षण तुम्ही आज शाळा-महाविद्यालयांतून घेता, त्यामुळे तुमची एक अजीर्णाचय रोग्यांची जातच जणू तयार होत आहे.

चावी दिलेल्या एखाद्या यंत्रासारखे तुम्ही राबता, ‘जन्माला आले आणि मरून गेले’ या विधानाचे तुम्ही जणू मूर्तीमंत उदाहरणच आहात. शेतकरी, चांभार, भंगी यांचीदेखील कर्मप्रवणता आणि आत्मनिष्ठा तुमच्यातील अनेकांपेक्षा अधिक श्रेष्ठ मानावी लागेल. अनादीकालापासून ते अगदी चूपचाप काम करीत आले आहेत, देशासाठी तेच धनधान्यांची पैदास करताहेत. पुन्हा कुठे तक्रार नाही कि काही नाही. हेच लोक तुम्हाला मागे टाकतील. पैसा, भांडवल त्यांच्या हाती जात आहे आणि गरजांच्या भाराखाली ते काही तुमच्यासारखे दबलेले नाहीत. सध्याच्या शिक्षणाने तुमची फक्त बाह्य रहाणीच बदलली; पण कल्पकता आणि शोधक प्रतिभा यांच्याअभावी तुम्हाला अर्थोत्पादनाचे अन्य उपाय काही गवसत नाहीत.

– स्वामी विवेकानंद (संदर्भ : दैनिक लोकसत्ता, ‘आजच्या प्रश्नांना उत्तरे’, १२.०१.१२)

स्वामी विवेकानंद यांच्या विषयी अधिक माहिती करीतायेथे क्लिक करा !