महान राष्ट्र महाराष्ट्र !

मराठ्यांनी केलेला साम्राज्याचा विस्तार



महाराष्ट्र हे नाव कसे पडले ?

डॉ. भांडारकरांच्या मते, ‘दुसर्‍या शतकातील भाजे, भेडसे, कार्ले येथील शिलालेखांमध्ये भोजांचा ‘महाभोज’ असा उल्लेख आहे. तद्वतच राष्ट्रिक >रठ्ठ हेही महा हा उपसर्ग मागे लावू लागले. त्यांच्या देशाला महारट्ठ म्हणू लागले. महारट्ठचे संस्कृत रूपांतर म्हणजे महाराष्ट्र !’

व्याप्ती

आज जो महाराष्ट्रप्रदेश आपण पाहतो, तो तसा पूर्वीपासून नाही. बृहदारण्यकोपनिषद, महावंश, बौधायन स्मृति, रामायण आणि महाभारत या प्राचीन ग्रंथांमध्ये ‘महाराष्ट्र’ हे नाव आढळत नाही; मात्र दक्षिणापथ, विदर्भ, अपरान्त, नाशिक्य, कुंतल, सुपारग, पतिठाण इत्यादी महाराष्ट्राअंतर्गत असलेल्या भागांचा उल्लेख आहे.

स्थूलमानाने महाभारतकाळी वर्‍हाडास विदर्भ, खानदेश – अजिंठा डोंगर या भागास अश्मक, नाशिकजवळील भागास दंडकारण्य, दक्षिणेकडील कृष्णाकाठास कुंतल आणि कोकणभूमीस अपरांत म्हटलेले आहे.

महाराष्ट्राविषयीचे प्राचीन उल्लेख

सर्वांत प्राचीन उल्लेख मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरणगावच्या स्तंभामध्ये असणे : महाराष्ट्राचा सर्वांत प्राचीन उल्लेख मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यातील एरणगावच्या स्तंभलेखात असून त्यात खिस्ताब्द ३६५ साली श्रीधरवर्म्याचा आरक्षित आणि सेनापती सत्यनाग याने स्वत:ला ‘महाराष्ट्रीय’ असे संबोधले आहे.

बृहत्संहितेतील उल्लेख : यानंतरचा उल्लेख वराहमिहिराच्या बृहत्संहितेत आढळतो. ६ व्या शतकातील या ग्रंथात ‘भाग्ये रसविकृयिण: पण्यस्त्रीकन्यका महाराष्ट्रा:’ असा महाराष्ट्राचा उल्लेख केलेला आहे.

ऐहोळीच्या रविकीर्तीने केलेला उल्लेख : त्यानंतरचा महत्त्वाचा उल्लेख ऐहोळीच्या रविकीर्तीने लिहिलेल्या शिलालेखात आढळतो. हा शिलालेख खिस्ताब्द ६२४ मध्ये सत्याश्रय पुलकेशीच्या कारकिर्दीत लिहिलेला आहे. विशेष म्हणजे यात त्रि-महाराष्ट्रिकाचा उल्लेख केलेला आहे. शिलालेखात म्हटले आहे, ‘अगमदधिपतित्वं यो महाराष्ट्रकाणां । नवनवती सहस्रग्रामभाजां त्रयाणां ।’ म्हणजे महाराष्ट्राचे तीन भाग असून त्यात ९९ सहस्र गावे आहेत. त्यांचा अधिपती सत्याश्रय पुलकेशी आहे. (संदर्भ : शककर्ते शिवराय – भाग १, लेखक – शिवकथाकार श्री. विजय देशमुख, पृष्ठ ४२, ४३ आणि ४४)

ऋग्वेदातील महाराष्ट्राचा उल्लेख : महाराष्ट्राला ऋग्वेदामध्ये ‘राष्ट्र’ या नावाने संबोधले गेले आहे. अशोकाच्या काळात ‘राष्ट्रिक’ आणि नंतर ‘महा राष्ट्र’ या नावाने ओळखले जाऊ लागले असे ह्युएन-त्सांग आणि इतर प्रवाशांच्या नोंदींवरून दिसून येते. हे नाव प्राकृत भाषेतील ‘महाराष्ट्री’ या शब्दावरून पडले असण्याची शक्यता आहे. काही जण महाराष्ट्र या शब्दाचा अर्थ महार व रट्टा यांच्याशी लावतात परंतु काहींच्या मते हे नाव महाकांतार (महान वने- दंडकारण्य) या शब्दाचा अपभ्रंश आहे. (संदर्भ : महाराष्ट्र विकिपीडिया )

सातवाहनकालात सागरी सत्ताधीश महाराष्ट्राचे वैभव

सातवाहनकालीन महाराष्ट्र सर्वतोपरी समृद्ध जीवन जगत होता. सातवहन काळाचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची सागरावर सत्ता होती. त्यांच्याजवळ सार्वभौम नौकादल होते. सातवाहनांनी परदेशांशी विशेषतः रोमशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. सातवाहनकाळात प्रजा आनंदात जीवन जगत होती. महिलांना भरपूर स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठा होती. सतीची चाल चालू झालेली नव्हती. सातवहन काळातच पुढे आढळणार्‍या बलुतेदारांचे ‘पूर्वज’ निर्माण झालेले दिसतात. धानिक, गंभीर, मणिकार, मालाकार, लोहवाणिज्यक, कम्मार, सुवर्णकार, कासकार, शिलावाणीजक, कुलारिक, ओदयंत्रिक, तीलपीसक असे उल्लेख तत्कालीन शिलालेखांत आढळतात. (संदर्भ : शककर्ते शिवराय – भाग १, लेखक – शिवकथाकार श्री. विजय देशमुख, पृष्ठ ४५ आणि ४६)

थोडक्यात महाराष्ट्राचा इतिहास…

महाराष्ट्रातील विविध स्थळांचा ‘रामायण’, ‘महाभारत’ इत्यादी प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख आढळतो. व्यवस्थित माहितीची उपलब्ध ऐतिहासिक साधने खिस्ताब्दपूर्व तिसर्‍या शतकापासून महाराष्ट्राची माहिती देतात.

महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाचा राजकीय कालखंडानुसार इतिहास वेगळा असला, तरी सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास बराचसा समान आहे. जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट, देवगिरीचे यादव, अल्लाउद्दीन खिलजी, मुहम्मद बिन तुघलक, पोर्तुगीज, विजापूर, मुघल, मराठा, हैदराबादचा निजाम, इंग्रज, इत्यादी राज्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे विविध भाग वेगवेगळ्या कालखंडात व्यापले होते. (संदर्भ : महाराष्ट्र विकिपीडिया )

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Leave a Comment