पानिपतचे युद्ध लढणार्‍या मराठ्यांची थोरवी !

१. ‘पानिपत १७६१’ या त्र्यं. शं. शेजवलकर यांनी लिहिलेल्या ‘राजहंस प्रकाशन’च्या अभिजात साहित्यकृतीतील काही अंश


१ अ. पानिपतमध्ये मराठ्यांचा पराजय नाहीच ! : ‘क्लाइव्हप्रमाणे खोटे कागद करून किंवा राजपूत- मुसलमानांप्रमाणे मारेकरी घालून त्यांनी आपला हेतू साध्य केला नाही. युद्धानंतर शस्त्रे काढून घेतलेल्या कैद्यांची कत्तल त्यांनी केल्याचे ठाऊक नाही किंवा शत्रूची शिरे अकारण कापून त्यांच्या राशी घालण्याचा वा ती भाल्यावर मिरविण्याचा रानटीपणाही त्यांनी कधी आचरिला नाही. नादिर किंवा अब्दाली यांच्याप्रमाणे नागरिकांचे अनन्वित हाल करून त्यांनी पैसा उकळला नाही. आणि एवढे सर्व असूनही वरील सर्व गोष्टी करणारांविरुद्ध त्यांस अपयश आले, यावरून अशा गोष्टी न केल्यामुळेच त्यांचा पराजय झाला, असे म्हणावयाचे काय ?


१ आ. अपमानाच्या भरपाईसाठीच ते शस्त्रधारण करणारे मराठे ! : पानिपताबद्दल बोलावयाचे तर असे कबूल करणे भाग आहे की, भौतिकदृष्ट्या मराठ्यांचा उणेपणा या लढाईने उघडा पडला; पण नीतीदृष्ट्या पहाता त्यांचे वर्तन आक्षेप न घेण्यासारखे अगदी स्वच्छ आहे. हॉब्ज या इंग्रज राजनीतिशास्त्रकाराच्या विवेचनाकडे पाहिले तर युद्धे भौतिक लाभ, भीती आणि कीर्ती या तीन गोष्टींसाठी होत असतात. अर्थात हे वर्गीकरण मागासलेल्या जगाला शोभण्यासारखे आहे. अब्दालीशी लढण्याचा निश्चय करण्यात मराठ्यांचा आर्थिक फायदा नव्हता, अफगाणांचे भयही त्यांना बाधत नव्हते, तसेच केवळ कीर्तीसाठी युद्ध करण्यास ते कधीच सिद्ध झाले नसते. तीन प्राथमिक कारणांसाठी लढण्यास उद्युक्त झालेला नसून, एका उच्च आणि त्याच्या दृष्टीने न्याय्य कर्तव्यासाठी तो हिंदुस्थानात हाल सोसून राहिला होता. मुख्यत: धर्माच्या रक्षणासाठी आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी मराठ्यांनी क्षत्रियकार्य अंगीकारिले होते. चिनी प्रवासी युआनच्वांग याने मराठ्यांचे वैशिष्ट्य सांगतांना, ‘अपमानाच्या भरपाईसाठीच ते शस्त्रधारण करतात’, असे त्याने म्हटले आहे.’ (दैनिक लोकसत्ता, ९ जानेवारी २०११)


२. ‘पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते. काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानवर एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता. त्यामुळे नंतर ब्रिटिशांना भारत विजय अशक्य झाला असता.’ – अर्नोल्ड फ्लेचर (लोकमत, १४.१.२०११)


३. ‘पानिपत युद्धात लढणारा मराठ्यांमधील दत्ताजी शिंदेंसारख्या मोठ्या योद्ध्याला गंगा आणि यमुना नद्यांवर पूल कसे बांधायचे, याची कला अवगत होती.’


४. ‘भारतात एवढी राज्ये आहेत; पण राष्ट्राच्या संरक्षणासाठी वाहतुकीच्या कोणतीही साधने नसतांना महाराष्ट्रातून लाख-दीड लाख माणसे बाराशे-चौदाशे कि.मी. अंतरावरील पानिपतावर गेली. म्हणूनच महाराष्ट्र हा राष्ट्राच्या संरक्षणासाठी बाहेर पडलेला एकमेव प्रांत आहे.’


५. ‘मुळात पानिपतावर लढलेली मराठ्यांची सेना ही कायमस्वरूपी सेना नव्हती. पावसाळ्यामध्ये धनधान्य पिकवायचे, दसर्‍याला तलवार साणेवर घासायची आणि मोहिमेला बाहेर पडायचे, असे तिचे स्वरूप होते.’


– ‘पानिपत’कार विश्वास पाटील (लोकमत, १४.१.२०११)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात