महाराष्ट्राच्या जडणघडणीत संतवाङ्मयाचे अमूल्य योगदान !


तेराव्या शतकात मुस्लीम आक्रमणाची पहिली धाड देवगिरीवर कोसळल्यापासून ते सतराव्या शतकातील औरंगजेबाच्या शेवटच्या स्वारीपर्यंत महाष्ट्रावर जी आक्रमणे झाली, त्यातून महाराष्ट्राने आपले स्वतःचे डोके तर वर काढलेच; पण पुढे भगवा झेंडा अटकेवर रोवून सर यदुनाथ सरकार यांनी म्हटल्याप्रमाणे ‘हिंदवी राष्ट्राचा माथा सर्व जगाला उन्नत करून दाखवला.’

हा जो भीमपराक्रम महाराष्ट्राने केला, त्याला संतांनी उत्पन्न केलेला आध्यात्मिक आत्मप्रत्यय बर्‍याच अंशी प्रेरक झाला, हे निःसंशय ! किंबहुना सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवछत्रपतींनी स्वराज्य स्थापनेच्या महान कार्याला जो शुभारंभ केला, त्याची पार्श्वभूमी, श्री तुकाराम महाराजांच्या यथार्थ शब्दांत सांगावयाची म्हणजे, या ‘वैष्णववीरां’नी तयार केल्यामुळेच भरत खंडातील राष्ट्रकात महाराष्ट्राचा इतिहास हा स्वातंत्र्यस्फूर्तीचे निधान होऊन बसला.

अर्थात तेराव्या शतकापासून सतराव्या शतकापर्यंत पारतंत्र्याच्या त्या घनतिमिरात निर्माण झालेल्या नामदेव, ज्ञानदेव, एकनाथ, तुकाराम आणि रामदास स्वामी या संतकवींचे वाङ्मय हे महाराष्ट्राचे अद्भूत अमोल संचितच आहे. अद्भूत या अर्थाने की, लोकस्थिती नासू द्यावयाची नाही आणि लोकसंस्थेचे रक्षण करावयाचे, अशा दुहेरी उद्देशाने उत्पन्न करण्यात आलेले असे एकरस, एकवीर आणि एकसंध वाङ्मय नामदेवरायांच्या शब्दांत सांगावयाचे म्हणजे ‘ब्रह्मरसाचा हा सागरू’ जगातल्या कोणत्याही दुसर्‍या भाषेत आढळणार नाही. त्यादृष्टीने ‘समाधिधन’ असा जो शब्द भावार्थदीपिकेच्या उपसंहारात ज्ञानदेवांनी तिच्यासंबंधी योजलेला आहे, तो या सर्वच वाङ्मयाला लागू पडतो; कारण एका विशिष्ट जीवननिष्ठेच्या ध्यासातून, आत्मप्रत्ययाच्या उन्मनीतून आणि ध्येयाच्या समाधीतून हे वाङ्मय आविर्भूत झाले आहे. ते अमोल या अर्थाने आहे की, तत्त्वचिंतन आणि हृदयसंवाद या दोहोंचाही मनोज्ञ संगम होय. ज्यात पडलेले आपले भव्य प्रतिबिंब पाहून महाराष्ट्राच्या अस्मितेने, आत्मानुभूतीच्या आनंदाने आणि आत्मप्रत्ययाच्या स्फूर्तीने सदैव कर्तव्यरत राहावे. असे हे संचित आपल्याला लाभल्यामुळेच आपण मुस्लीम आणि ब्रिटीश आक्रमणावर मात करून पुन्हा राष्ट्र म्हणून स्वाभिमानाने उभे राहू शकलो.

– ग.त्र्यं. माडखोलकर (संदर्भ : ‘महाराष्ट्राचे विचारधन’, पृष्ठ ५९,६०)