गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी स्वभावदोष-निर्मूलन अनिवार्य असणे

         गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधक अष्टांगमार्गाने प्रयत्न करत असतो. ‘स्वभावदोष-निर्मूलन’ हे अष्टांगसाधनेतील महत्त्वाचे अंग आहे. स्वभावदोष घालवल्याविना साधक गुरुकृपेला पात्र होऊ शकत नाही.

             पुढील कथेवरून साधनेतील स्वभावदोष-निर्मूलनाचे महत्त्व लक्षात येईल.

१. शिष्याने गुरूंना आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवण्यासाठी विनंती करणे आणि गुरूंनी तो मार्ग कठीण असून त्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सांगणे :
शिष्याने एका महान गुरूंना विनंती केली, ‘‘महाराज, आपण मला आत्मसाक्षात्काराचा मार्ग दाखवा.’’ त्यावर ते गुरु म्हणाले, ‘‘वत्सा, आत्मसाक्षात्काराचा मार्ग फार कठीण आहे. त्या मार्गावरून जाणार्‍या साधकाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तुझी जर तेवढी सिद्धता असेल, तर त्या मार्गाविषयी सांगायला मला कोणतीही अडचण नाही.’’ 

२. शिष्याने आत्मसाक्षात्काराच्या मार्गात आलेल्या अडचणींना तोंड देण्याची सिद्धता दाखवल्याने गुरूंनी त्याला एक वर्ष एकांतवासात राहून गायत्रीमंत्राचा जप करण्यास सांगणे :
त्या वेळी तो जिज्ञासू शिष्य म्हणाला, ‘‘गुरुदेव, मी आलेल्या अडचणींशी लढून ध्येयाकडे वाटचाल करीन.’’ त्यावर ते संत म्हणाले, ‘‘एकांतात जाऊन निष्काम भावनेने गायत्रीचा जप कर. एक वर्ष कोणाशीही बोलू नकोस आणि कोणाशी संपर्कही ठेवू नकोस. एक वर्ष पूर्ण झाल्यावर मला येऊन भेट.’’ शिष्याने संतांच्या आज्ञेचे पालन केले.

३. गुरूंनी 
महारणी साधना पूर्ण करून आश्रमात येत असलेल्या शिष्याच्या अंगावर झाडूने धूळ उडवायला सांगणे आणि तिने तसे केल्यावर त्याने क्रोधाने पेटून तिला मारायला धावणे :
एक वर्ष पूर्ण झाले. गुरूंनी एका महारणीला सांगितले, ‘‘आज माझा शिष्य मला भेटायला येईल, तेव्हा तू त्याच्यावर झाडूने पुष्कळ धूळ उडव.’’ महारणीने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले. धुळीने त्या शिष्याचे सर्व अंग माखले. त्यामुळे क्रोधाने पेटून तो त्या महारणीला मारण्यासाठी तिच्या अंगावर धावून गेला; पण ती पळून गेली.

४. शिष्य क्रोधाने पेटून उठल्याने गुरूंनी त्याला तो सापाप्रमाणे चावत असल्याचे सांगून अजून एक वर्ष साधना करण्यास सांगणे :
स्नान करून तो शिष्य गुरूंच्या सेवेला उपस्थित झाला. गुरु म्हणाले, ‘‘वत्सा, तू तर अजून सापाप्रमाणे चावतोस. त्यामुळे पूर्वीप्रमाणे अजून एक वर्ष साधना कर.’’ त्या साधकाला आतून राग आला; पण आत्मतत्त्व जाणण्याची तीव्र जिज्ञासा असल्याने तो पुन्हा साधना करू लागला. साधनेचे दुसरे वर्षही पूर्ण झाले.

५. गुरूंनी महारणीला साधना पूर्ण करून आश्रमात येत असलेल्या शिष्याच्या शरिराला झाडूने स्पर्श करायला सांगणे आणि तिने तशी कृती केल्यावर राग येऊन त्याने तिला शिव्या देणे :
वर्ष पूर्ण झाल्यावर गुरूंनी महारणीला सांगितले, ‘‘आज माझा शिष्य या मार्गाने येईल. तेव्हा तू त्याच्या शरिराला झाडूचा स्पर्श कर.’’ महारणीने गुरूंच्या आदेशाप्रमाणे शिष्याला झाडूचा स्पर्श केला. त्यामुळे त्याला राग आला. त्याने त्या महारणीला शिव्या दिल्या आणि तो पुन्हा स्नान करण्यासाठी गेला.

६. शिष्याला राग आल्याने गुरूंनी त्याला तो सापाप्रमाणे चावत नसून फुत्कारत असल्याचे सांगून अजून एक वर्ष साधनेची आवश्यकता असल्याचे सांगणे :
स्नान करून तो गुरूंकडे आला आणि त्यांना म्हणाला, ‘‘गुरुदेव, आता आत्मसाक्षात्काराचा मार्ग सांगावा.’’ गुरुदेव म्हणाले, ‘‘वत्सा, तू आता सापाप्रमाणे चावत तर नाहीस; मात्र सापाप्रमाणे अवश्य फुत्कारतोस. त्यामुळे अजून एक वर्ष साधना कर.’’ शिष्य तिसर्‍या वर्षाची साधना करण्यासाठी गेला.

७. गुरूंनी महारणीला साधना पूर्ण करून आश्रमात येत असलेल्या शिष्याच्या डोक्यावर घाणीने भरलेली टोपली टाकायला सांगणे, शिष्याने न रागावता तिला नमस्कार करून स्वतःचे दुर्गुण घालवण्यासाठी तिने प्रयत्न केले असल्याचे सांगून तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे :
तिसरे वर्षही पूर्ण झाले. गुरूंनी महारणीला सांगितले, ‘‘आज माझा शिष्य येईल. तू घाणीने भरलेली टोपली त्याच्या डोक्यावर टाक.’’ तिने गुरूंच्या आदेशाप्रमाणे केले; पण त्या वेळी शिष्याला राग आला नाही. तो महारणीला नमस्कार करून म्हणाला, ‘‘माते, तू महान आहेस. तीन वर्षांपासून माझ्यातील दुर्गुण घालवण्यासाठी प्रयत्न करत आहेस. मी तुझ्या या उपकारांना कधीही विसरू शकत नाही. तू नेहमी माझ्या उद्धारासाठी प्रयत्न कर.’’ असे म्हणून तो स्नान करायला गेला.

८. शिष्याने साधनेने दुर्गुणांवर विजय मिळवल्याने गुरूंनी त्याला तो आत्मसाक्षात्कारासाठी योग्य झाला असल्याचे सांगून त्याला मार्गदर्शन करणे :
स्नान करून गुरूंच्या चरणांपाशी पोहोचला. त्याने गुरूंना नमस्कार करून आत्मसाक्षात्कारासाठी निवेदन केले. गुरु म्हणाले, ‘‘तू आता आत्मसाक्षात्कारासाठी योग्य झाला आहेस.’’ त्यानंतर गुरूंनी त्याला आत्मसाक्षात्काराची रहस्ये सांगितली.

– साहित्य वाचस्पती श्री देवेंद्र मुनी शास्त्री (‘जिन खोजा तिन पाइयां’)

Leave a Comment