विनाशकारी फटाक्यांवर बंदी आणा !

दिवाळी खरे पाहता दिव्यांचा उत्सव ! दिवाळीतील अमावास्येचा अंधार कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांनी दूर होत नाहीच; पण डोळ्यांसमोर काजवे मात्र चमकून सर्वत्र आणखी अंधार झाल्याचाच भास होतो. कानाचे पडदे फाडणारे, हृदयरोग्यांचे मरण जवळ आणणारे, बालकांचा थरकाप उडवणारे आणि आवाजाबरोबर प्रचंड प्रदूषण वाढवणारे फटाके, हा केवळ दिवाळीचाच नव्हे, तर लग्नाची मिरवणूक, क्रिकेटच्या सामन्यातील विजय आणि धार्मिक वा राजकीय मिरवणुका यांचा अविभाज्य भाग झाला आहे. फटाक्यांमुळे होणारा विनाश स्वतःहून ओढवून घेण्याचा अट्टाहास आपण कशासाठी करतो ?

१. हिंदूंच्या सणांत शिरलेल्या विकृती !

१ अ. हिंदूंच्या सणांतून वाढत असलेले उपद्रवमूल्य : ‘एकेकाळी मराठी समाजाचा अभिमानास्पद सांस्कृतिक वारसा समजल्या जाणार्‍या सार्वजनिक गणेशोत्सवाचे लाजिरवाणे अवमूल्यन झाले आहे. न्यायालयांचे निकाल आणि दंडविधान (कायदे) धाब्यावर बसवून रात्री उशिरापर्यंत टिपर्‍या बडवणार्‍यांनी दसर्‍याच्या आधीच्या नवरात्री नकोशा केल्या आहेत. कर्णकटू आवाजाच्या फटाक्यांची गल्लोगल्ली आतषबाजी करणार्‍यांनी दिवाळीच्या काळात भयनिर्मिती केली आहे.

१ आ. दिवाळीच्या सणाला उपद्रवकारक स्वरूप येणे, ही धनदांडग्यांच्या काळ्या पैशांमुळे निर्माण झालेली विकृती : आपण म्हणजे समाज’, असे मानणार्‍या धनदांडग्यांच्या काळ्या पैशांच्या संस्कृतीसमोर मध्यमवर्गाने शरणागती पत्करल्याने अलीकडे ‘अधिकाधिक लोकांना उपद्रव देऊन सण साजरे करणे’, ही रीतच बनली आहे. अवैध संपत्तीची उणीव नसलेल्यांनी दिवाळी अधिकाधिक लोकांच्या डोळ्यांत भरेल, अशा प्रकारे साजरी करण्याची स्पर्धा आरंभली. सहाजिकच दिवाळीच्या आनंदाचे आविष्कार अधिक उपद्रवकारक स्वरूप घेऊ लागले.

२. दिवाळीत उडवल्या जाणार्‍या फटाक्यांचे दुष्परिणाम !

२ अ. फटाक्यांमुळे होणारे अपघात !

१. खिस्ताब्द १९९७ मध्ये दिल्लीत केलेल्या एका पाहणीत फटाक्यांमुळे केवळ त्या शहरात ३८३ जणांचे मृत्यू, तसेच ४४२ जणांना दुखापतग्रस्त झाल्याचे आढळून आले होते.

२. खिस्ताब्द १९९९ मध्ये हरियाणातील सोनपथ येथे फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत ४४ जणांचे बळी गेले.

३. खिस्ताब्द १९९९ मध्ये महाराष्ट्रातील जळगाव शहरात फटाक्यांमुळे आग लागून बाजारपेठच भस्मसात झाली आणि लक्षावधी रुपयांची हानी झाली.

४. फटाक्यांमुळे दुसर्‍यांच्या घरात जळका बाण जाऊन अपघात होतो.

२ आ. भौतिकदृष्ट्या

फटाक्यांमुळे आगी लागून अपघात तर होतातच; पण याच कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांचे याहूनही आणखी दुष्परिणाम आहेत.

‘कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे जुन्या इमारतींना तडे जाण्याची शक्यता असते. घराचे ‘प्लास्टरिंग’ सैल होतो. विजेचे बल्ब जळतात वा पडतात.

२ इ. आरोग्यदृष्टया

फटाक्यांमुळे होणार्‍या रुग्णाइतात ६० टक्के प्रमाण १२ वर्षांखालील बालकांचे असते.

२ इ १. ध्वनीप्रदूषणामुळे होणारी आरोग्याची हानी !

२ इ १ अ. रुग्णालयातील नवजात बालके, तसेच रुग्ण यांना फटाक्यांच्या आवाजाचा विलक्षण उपसर्ग होतो.

२ इ १ आ. ‘कानठळ्या बसवणार्‍या फटाक्यांमुळे सदाचा बहिरेपणा येण्याचीही शक्यता असते. फटाक्यांमुळे कान बधीर होतात. श्रवणयंत्रणातील पेशी एकदा मृत झाल्या की, पुन्हा निर्माण होत नाहीत.

२ इ १ इ. फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणामुळे डोकेदुखी, रक्तदाब, हृदयविकार यांसारखे विकार वाढतात.

२ इ १ ई. फटाक्यांच्या आवाजामुळे श्वसनमार्गाचे आणि फुफ्फुसाचे विकार बळावतात.

२ इ १ उ. गर्भवती महिलांना फटाक्यांच्या ध्वनीप्रदूषणाचा अपाय होतो.

२ इ २. वायूप्रदूषणामुळे होणारी आरोग्याची हानी !

२ इ २ अ. फटाके फोडले जातात, तेव्हा त्यातून मोठ्या प्रमाणात विषारी धूरही होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या दिवसांत दम्याच्या रुग्णांत वाढ होते.

२ इ २ आ. फटाक्यांमुळे वातावरणात पसरणारा विषारी वायू सर्वच नागरिकांच्या आरोग्याला हानीकारक असतो.

२ ई. पर्यावरणदृष्ट्या

१. फटाक्यांमुळे केवळ पैशांचा अपव्यय होतो, असे नाही, तर पुष्कळ प्रमाणात कचरा, धूळ आणि धूर या अनिष्टकारक गोष्टी विनाकारण निर्माण होतात.

२ उ. आर्थिकदृष्ट्या

१. कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे अयोग्य : एकट्या महाराष्ट्रात दिवाळीत १२ कोटींचे फटाके वाजवले जातात, हा आकडा खिस्ताब्द १९९९ चा आहे. आजची फटाक्यांची उलाढाल सहजच १०० कोटी रुपयांहून अधिक आणि भारतभरातील सहस्रो कोटी रुपये असेल ! दिवाळीच्या सणाचा आनंद साजरा करण्यासाठी कोट्यवधींच्या रुपयांच्या फटाक्यांचा धूर हवेत सोडणे, हे उचित आहे का ?

२. फटाके उडवणे म्हणजे दिवाळीत स्वतःचे आर्थिक दिवाळे काढणे : खरी दिवाळी फटाके विकणार्‍यांची असते; कारण पाच रुपयांचा फटाका विक्रेता वीस रुपयांना विकत असतो. तरीही पाच-पाच, दहा-दहा सहस्र रुपयांचे फटाके उडवणारे लोक आपल्याकडे अल्प नसतात. खरी दिवाळी त्यांचीच असते, बाकीच्यांचे म्हणजेच दुष्परिणाम सहन करण्यार्‍यांचे दिवाळी दिवाळे काढून जाते.

२ ऊ. मानसिकदृष्ट्या !

फटाक्यांमुळे लहान मुलांमध्ये निर्माण होणारी विकृती : दारात भिकार्‍याच्या झोळीत एखादी करंजी टाकण्यापेक्षा त्याच्या पायाजवळ ‘अ‍ॅटमबाँब’ फोडून त्याला पळवून लावण्यात हल्लीची लहान मुले धन्यता मानतात. फटाक्यांनी निर्माण केलेली ही विकृती आहे.

हे सर्व दुष्परिणाम पाहिले, तर फटाके न उडवणेच श्रेयस्कर !

३. फटाक्यांविषयीचे परराष्ट्रांचे स्तुत्य धोरण !

३ अ. अमेरिका : अमेरिकेसारख्या सुधारलेल्या विकसित देशात आवाज करणार्‍या धोकादायक फटाक्यांवर बंदी घालण्यात आले आहे. तेथे केवळ शोभेची, उदा. आवाज न करता केवळ प्रकाश देणारी फटाके उडवण्यास अनुमती आहे. त्यासाठी परवाना घ्यावा लागतो. प्रसंगोपात्र आवाज करणारे फटाके वाजवायचे असल्यास विशेष अनुमती घ्यावी लागते. अशी अनुमती देतांना कुणासही धोका होणार नाही, अशा ठिकाणी वस्तीपासून दूर हे फटाके उडवण्याची अनुमती दिली जाते. शिवाय ही अनुमती देतांनाच ‘तिथे अग्नीशामक दलाची व्यवस्था आहे कि नाही’, हे आधी पाहिले पाहिजे. आपणाकडे असे किती दक्षतेचे उपाय योजले जातात ?

३ आ. न्यूझीलंड, इटली, फ्रांस, बेल्जियम या देशांत केवळ प्रौढ व्यक्तींनाच फटाके विकत घेण्यास अनुमती आहे. या धर्तीवर भारतातही असे दंडविधान होणे आवश्यक आहे.

४. फटाक्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उपाय !

फटाक्यांमुळे होणारी एवढी हानी आपणास थांबवता येणार नाहीत का ? फटाक्यांचा मोह टाळला, तर हे सहज शक्य आहे. यासाठी हे करा ! –

४ अ. मुलांनो, फटाके वाजवणार नाही, अशी शपथ शाळाशाळांमधून घ्या : मुंबईतील काही शाळांमधून दिवाळीची सुट्टी पडण्याआधी तेथील मुलांनी ‘दिवाळीत आम्ही फटाके उडवणार नाही’, अशी शपथा घेतली होती.

४ आ. पालकांनो, फटाक्यांच्या निर्मितीसाठी बालकामगार वापरले जात असल्याने ते न वाजवण्याविषयी पाल्यांचे प्रबोधन करा : भारतातील फटाक्यांच्या नगरीत म्हणजेच तामिळनाडूतील शिवकाशीत हे फटाके निर्मिण्यासाठी मुख्यत्वेकरून बालकामगारांचा उपयोग केला जातो. या फटाक्यांच्या कारखान्यातील अविरत कष्ट, तसेच तेथील विषारी वायूंचे प्रदूषण यांमुळे या बालकांचे जीवन अकाली उखडलेल्या कळीप्रमाणे कोमेजून जाते. ही सर्व वस्तूस्थिती लक्षात घेऊन आपल्या मुलांना दिवाळीत फटाक्यांवर बहिष्कार घालण्यासाठी पालकांनी प्रबोधन केले पाहिजे.

४ इ. लोकहो, फटाके उडवतांना ही दक्षता घ्या : खिस्ताब्द २००५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोंगाटबंदीच्या संदर्भात दिलेल्या निकालासंदर्भात रात्री १० ते सकाळी ६ या काळात फटाके वाजवणे, हा अपराध ठरवला गेला आहे. तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी, धर्मदाय विश्वस्त संस्थांची रुग्णालये आणि नागरिक यांना त्रास होईल, अशा ठिकाणी फटाके वाजवण्यास बंदी घातली आहे.

४ ई. फटाक्यांचे पैसा राष्ट्रकारणी लावा : तोफा आणि खरे बाँब यांच्या धडधडाटीची देशाच्या सीमारेषांवर नितांत आवश्यकता आहे. इथे फुकटचे बार काढण्यापेक्षा, ते पैसे संरक्षण खात्याकडे वळवल्यास सत्कारणी लागतील.

४ उ. फटाक्यांचे दुष्परिणाम रोखण्यासाठी पावले उचला !

१. इमारतीजवळ वा भर वस्तीत कानठळ्या बसवणारे फटाके उडवण्यावर कडक कायदेशीर कार्यवाही असली पाहिजे.

२. ध्वनीप्रदूषण आणि वायूप्रदूषण यांना आळा घालण्यासाठी फटाक्यांवर पूर्णतः बंदी आणली पाहिजे.

३. ‘फटाक्यांचे उत्पादन हाच अपराध ठरवण्याचे पाऊल तातडीने उचलले गेले पाहिजे ! हे काम शासनाचे आणि लोकप्रतिनिधी यांचे आहे.