Menu Close

श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘एम्.टी.डी.सी.’चे मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवा !

‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’ आणि ‘हिंदु जनजागृती समिती’चे कार्यकर्ते

रत्नागिरी (महाराष्ट्र) – तीर्थक्षेत्रे, मंदिरे, धार्मिक स्थळे आदींचे पावित्र्य जपण्यासाठी त्यांचे परिसर मद्य आणि मांस मुक्त करावेत. श्रीक्षेत्र गणपतीपुळे देवस्थान परिसरातील ‘महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एम्.टी.डी.सी.चे) मद्य आणि मांस विक्री करणारे ‘रेस्टॉरंट’ हटवावे’, अशी मागणी करणारे निवेदन ३१ मे या दिवशी येथील महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे की,

भारतीय संविधानाचे कलम २५ सर्व नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार देते. त्यानुसार हिंदूंच्या धार्मिक स्थळी मद्य आणि मांस विक्री करण्यासाठी अनुमती देणे, हे हिंदूंच्या धार्मिक अधिकारांवर बंधन आणणारे आणि हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. मंदिर परिसरातील कायदा अन् सुव्यवस्था राखण्यासाठी मंदिर परिसर मद्यमांस मुक्त होणेही आवश्यक आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात श्रीक्षेत्र गणपतीपुळे मंदिर परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या ‘रेस्टॉरंट’मध्ये मद्य-मांस विक्री चालू असते, असे स्थानिक भाविकांकडून समजते. त्यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य भंग पावत असून गणेशभक्तांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने एम्.टी.डी.सी.चे बार रेस्टॉरंट त्वरित हटवावे.

हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या झाकीर नाईकवर कठोर कारवाई करा !

झाकीर नाईक

‘मंदिर आणि चर्च यांमध्ये जाण्यापेक्षा हजारोंना मारणार्‍या शस्त्रे बनवणार्‍या कारखान्यात जाणे चांगले’, असे धार्मिक भावना दुखावणारे विधान करणार्‍या झाकीर नाईक याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करणारे निवेदनही केंद्रीय गृहमंत्री भारत सरकार नवी देहली यांच्या करिता, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्याकडे देण्यात आले. जगभरात झालेली आतंकवादी आक्रमणे  झाकीर नाईकच्या भाषणांनी प्रेरित होऊन केल्याची स्वीकृती पकडलेल्या धर्मांधानी दिली आहे. झाकीर नाईकला भारताच्या स्वाधीन करावे, अथवा मलेशियामध्ये त्याच्यावर कठोर कारवाई करावी, यासाठी केंद्रशासनाने मलेशिया सरकारवर दबाव आणावा. संयुक्त राष्ट्र संघात झाकीर नाईकला आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित करण्यासाठी मागणी करावी. पसार आतंकवादी म्हणून घोषित करून झाकीर नाईकच्या संघटनेवर बंदी आणली गेली असूनही त्याच्या भाषणांचा प्रसार करणारी ५० हून अधिक फेसबुक अकाउंटट्स, ट्वीटर अकाउंटट्स आजही भारतात राजरोसपणे चालू आहेत. या सर्वांवर त्वरित बंदी घालावी, अशा आशयाची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

यावेळी जय हनुमान मंदिर, मजगाव रोडचे श्री. किशोर भुते; श्री विठ्ठल-रखुमाई मंदिर कुवारबावचे श्री. मंगेश राऊत; श्री सोमेश्वर सूंकाई एंडोव्हमेंट ट्रस्ट, सडये-पिरंदवणे-वाडाजूनचे श्री. प्रवीण धुमक; श्री सांब मंदिर, पेठकिल्ल्याचे श्री. रमेश सुर्वे; श्री मारुति मंदिर कसोप-बनचे श्री. भालचंद्र साळवी; श्री भगवती मंदिर, किल्ल्याचे श्री. तन्मय जाधव; महाराष्ट्र मंदिर महासंघाचे रत्नागिरी विभाग समन्वयक श्री. सुनील सहस्रबुद्धे; तालुका समन्वयक श्री. सुनीत भावे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी  उपस्थित होते.

Related News