Menu Close

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण !

  • काही जिल्ह्यांत भोंग्यांविना मशिदींत अजान दिली !

  • राज्यभरात मनसेच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड !

संभाजीनगर – तीन मे नंतर महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे न उतरवल्यास, ४ मेपासून मशिदींसमोर ध्वनीक्षेपकावरून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावली जाईल, अशी चेतावणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे झालेल्या सभेत दिली होती. त्याप्रमाणे मशिदींवरील भोंग्यांवरून राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांकडूनही ठिकठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली. राज्यात काही अपवाद वगळता बहुतांश भागांतील मशिदींनी आवाजाच्या मर्यादेचे पालन केल्याचे समोर येत आहे. मनसेच्या वतीने राज्यात अनेक ठिकाणी मशिदींसमोर हनुमान चालिसाचे पठण करण्यात आले, तर अनेक ठिकाणी मशिदींवर भोंग्याविना अजान देण्यात आली.

कल्याण, पनवेल आणि मुंब्रा या भागांत पहाटेची अजान भोंग्याविना देण्यात आली. तणाव निर्माण होण्याच्या शक्यतेमुळे या भागांत मशिदींनी ध्वनीक्षेपकावर अजान लावली नव्हती. संभाजीनगर, नागपूर आणि कोल्हापूर येथेही बहुतांश मशिदींनीही आवाजाची मर्यादा पाळली. राज्यभरातील अनेक मशिदींना पोलिसांनी संरक्षण पुरवले होते.

१. मुंबई – मुंबादेवी येथे ३ मे या दिवशी अक्षय तृतीयेच्या निमित्त हनुमान चालिसाचे पठण करण्यात आल्याने पोलिसांनी काही मनसैनिकांना कह्यात घेतले. कांदिवली, नवी मुंबई आणि नेरूळ येथे अजान चालू असतांना हनुमान चालिसा पठण करण्यात आले.

२. पुणे – पुणे येथे खालकर मंदिरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसाचे पठण केले. हनुमान चालिसाचे पठण होताच काही मनसैनिकांना पोलिसांनी कह्यात घेतले.

३. धुळे – येथील मशिदींसमोर भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्याविषयी मनसैनिक आक्रमक झाले होते. त्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मनसेच्या १० ते १२ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.

४. ठाणे – येथील चारकोप परिसरात पहाटे ५ वाजता मनसेच्या कार्यकर्त्यांनी अजानच्या वेळी ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावली. मुंब्रा परिसरातील दारूफाला, त्याचसमवेत भिवंडी येथेही पडघा, वांद्रे येथील जामा मशिदीमध्ये विनाभोंग्याची अजान देण्यात आली.

५. नाशिक – अजानच्या वेळी येथील मारुति रस्त्यावरील हनुमान मंदिरात ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावल्याप्रकरणी पोलिसांनी मनसेच्या ७ महिला पदाधिकार्‍यांसह १४ जणांना नोटीस दिली, तर २९ कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.

संभाजीनगर येथे जामा मशिदीसह इतर मशिदींकडून आवाजाच्या मर्यादेचे पालन !

संभाजीनगर शहरातील प्रमुख जामा मशिदीसह इतर मशिदींनी आवाजाच्या मर्यादेचे पालन केले. त्यामुळे शहरात मनसैनिकही शांत राहिल्याने कोणताही तणाव निर्माण झाला नाही. याविषयी जामा मशिदीच्या मौलवींनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, आमच्याकडून नेहमीच नमाजपठणाच्या वेळी आवाजाच्या मर्यादेचे पालन केले जाते. (नागरिकांना अजानच्या आवाजाचा त्रास होत असल्याखेरीज ते तक्रार करणार का ? – संपादक दैनिक सनातन प्रभात) यापुढेही या नियमांचे पालन केले जाईल. पोलिसांनी संभाजीनगर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. यानंतर कार्यकर्ते भूमीगत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरे यांच्या वक्तव्याला धार्मिक रंग देण्याचे सरकारचा प्रयत्न ! – संदीप देशपांडे, मनसेचे नेते

भोंग्यांविषयी राज ठाकरे यांच्या वक्तव्याला महाविकास आघाडी सरकारकडून धार्मिक रंग दिला जात आहे; मात्र हा विषय सामाजिक असून सर्वच स्तरांतील नागरिकांना याचा त्रास होतो. मुसलमान बांधवांनी याची नोंद घेतल्यामुळे त्यांचे आभार मानतो. मुसलमान बांधवांनीच राज्य सरकारचा अपप्रचार खोडून काढला आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केली.

नागपूर, कोल्हापूर आणि बुलढाणा येथेही भोंग्यांविना नमाजपठण !

नागपूर, कोल्हापूर आणि बुलढाणा येथेही अनेक मशिदींमध्ये भोंग्यांविना नमाजपठण झाले.

परभणी येथे प्रत्येक मशिदीत ध्वनीक्षेपकावर अजान लावण्यात आली !

धाराशिव आणि नांदेड येथे मोठा पोलीस बंदोबस्त होता. परभणी येथे प्रत्येक मशिदीत ध्वनीक्षेपकावर अजान लावण्यात आली आणि नमाजपठण करण्यात आले.

बीड येथील मशिदींवर अल्प आवाजात अजान लावली !

बीड येथे अनेक भागांतील मशिदींवर अल्प आवाजात अजान लावण्यात आली आणि नमाजपठण करण्यात आले. या वेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ध्वनीक्षेपक न लावता हनुमान चालिसाचे पठण केले.

कल्याण येथे अजानसाठी ध्वनीक्षेपक लावले नाहीत !

कल्याण परिसरातील मशिदींमध्ये पहाटेची अजान भोंग्याविना झाली. कल्याणमधील मशिदींसमोर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून कल्याण आणि डोंबिवली येथे मनसेच्या ५० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या. ३ मेच्या रात्रीच मनसेचे २० -२५ कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना पोलिसांनी कह्यात घेतले होते. (सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पालनासाठी आग्रही असणार्‍यांवर कारवाई करणार्‍या पोलिसांचा कधी समाजाला आधार वाटेल का ? – संपादकदैनिक सनातन प्रभात)

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *