Menu Close

हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने कोल्हापूर शहरातून भव्य वाहन फेरी !

हिंदु धर्मजागृती सभेला मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन 

Kolhapur_vahan_feri
धर्मजागृती सभेच्या निमित्ताने शहरातून अशी भव्य वाहन फेरी काढण्यात आली.

 कोल्हापूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गुरुवार, ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ५.३० वाजता राजारामपुरीतील लकी बाजाराशेजारी असलेल्या महापालिका शाळा क्रमांक ९ च्या मैदानावर हिंदु धर्मजागृती सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हिंदु धर्मजागृती सभेच्या निमित्ताने प्रचार आणि प्रसारासाठी १ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता सभेच्या ठिकाणापासून भव्य वाहन फेरी काढण्यात आली. फेरीच्या प्रारंभी भगव्या धर्मध्वजाचे पूजन बांधकाम व्यावसायिक श्री. भैय्या शेटके यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पुरोहित श्री. आण्णी गेरी यांनी मंत्रपठण केले. या फेरीत १२५ दुचाकी आणि ३ चारचाकी वाहने सहभागी झाली होती. शिस्तबद्ध पद्धतीने चाललेल्या या फेरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. फेरी काढतांना कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रथमपासून पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. फेरी चालू असतांना ध्वनीक्षेपकावर उद्घोषणा करून सर्वांना ४ फेब्रुवारी या दिवशी येथे होणार्‍या हिंदु धर्मजागृती सभेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले. याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उपस्थित मान्यवर…

या फेरीत शिवसेनेच्या नगरसेविका सौ. प्रतिज्ञा उत्तुरे, त्यांचे पती श्री. महेश उत्तुरे, शिवसेनेचे सर्वश्री कमलाकर जगदाळे, भीमराव पाटील, नंदकिशार आहिर, उपशहरप्रमुख रघुनाथ टिपुगडे, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, हिंदु एकता आंदोलनाचे कमलाकर किलकिले, शिवाजीराव ससे, हिंदुस्थान नागरी एकता संघटनेचे संजय वसे, धर्माभिमानी उत्तम कांबळे, काका पाटील, हिंदु जनजागृती समितीचे मधुकर नाझरे, राजन बुणगे, सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या सौ. शिल्पा कोठावळे, सौ. संगीता कडूकर, सौ. विजया वेसणेकर आदी मान्यवर आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

वाहन फेरीचा मार्ग…

ही वाहनफेरी शाहूपुरी, व्हिनस कॉर्नर, बिंदू चौक, आझाद चौक, मिरजकर तिकटी, खरी कॉर्नर, महाद्वार रोड, पापाची तिकटी, महापालिका, लक्ष्मी रोड, फोर्ड कॉर्नर, उमा चित्रपटगृह, आझाद चौक या मार्गाने पुन्हा राजारामपुरी येथे आली. या ठिकाणी फेरीची कोपरा सभा घेऊन सांगता झाली. सर्व वाहनांवर भगवे ध्वज लावण्यात आले होते. फेरीतील सर्वांनी भगव्या टोप्या आणि फेटे घातले होते. या वेळी ‘हर हर महादेव’, ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ अशा घोषणा धर्माभिमान्यांनी देऊन सर्व परिसर दणाणून सोडला. राजारामपुरीतील पाचवी गल्ली, मिरजकर तिकटी आणि महाद्वार रोड येथे सौ. संगीता टिपुगडे, सौ. प्रतिभा घाटगे आणि श्री. अमर काकडे यांनी फुले वाहून आणि धर्मध्वजाचे पूजन करून वाहन फेरीचे स्वागत केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *