मंदिरांवरील आघात रोखण्यासाठी मंदिरांचे संघटन होणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
म्हार्दाेळ (गोवा) – मंदिरांच्या प्रतिनिधींनी त्यांचे दायित्व समजून घेतले पाहिजे. आज मंदिर विश्वस्तांना संघटित होण्यासाठी सातत्याने का सांगावे लागत आहे ? गोमंतकात पूर्वजांनी प्राणपणाने लढून येथील देवतांच्या मूर्ती आणि मंदिरे यांचे रक्षण केले. या इतिहासाची पुनरावृत्ती होऊच शकत नाही, असे नाही. संभल, उत्तरप्रदेश येथे श्री हरिहर मंदिरात हिंदू प्रवेश करू शकत नाहीत आणि हा विषय न्यायप्रविष्ट आहे, तसेच बंगालमधील १५ वर्षे बंद असलेले श्री दुर्गामंदिर नवीन सरकारने नुकतेच खुले केले आहे. स्वतंत्र भारतात सर्वांना समान अधिकार असतांना मंदिरांची ही स्थिती आहे. अशी स्थिती गोव्यासह देशात अन्य ठिकाणीही निर्माण होऊ शकते. यासाठी मंदिरांचे प्रतिनिधी आणि हिंदू यांनी संघटित होणे आवश्यक आहे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी केले.

श्री. शिंदे पुढे म्हणाले, ‘‘मंदिराचे विश्वस्त किंवा महाजन यांनी ‘आपण देवाचे राज्य चालवतो’, असा भाव ठेवून मंदिराचे कार्य केले पाहिजे.
अयोध्येत श्रीराममंदिराची उभारणी केल्यानंतर आतापर्यंत २३ कोटी ८२ लाख भाविकांनी श्रीरामाचे दर्शन घेतले आहे. यातून मंदिराला १२ सहस्र कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. यामधून मंदिराची क्षमता सर्वांनी लक्षात घ्यावी. महाराष्ट्रात ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूूलन अधिनियम -२०२६’ येऊ घातला आहे. या कायद्यामुळे मंदिरांची भूमी नाहीशी होणार आहे. मंदिराच्या रक्षणासाठी सरकार आमचे असले, तरीही कायदा रहित होईपर्यंत आम्ही लढणार आहोत. देवाच्या नावावरची भूमी कुठल्याही सरकारला काढून घेण्याचा अधिकार नाही. असा कायदा भविष्यात गोव्यातही येऊ शकतो आणि यासाठी मंदिर प्रतिनिधींनी आताच भक्तांचे संघटन करावे. मंदिरांचे संघटन झाल्यास सरकार असे कायदे करण्यास धजावणार नाही.’’
असे झाले मंदिर परिषदेचे सकाळचे सत्र !
१. सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव, ह.भ.प. सुहास बुवा वझे, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे आणि श्री महालसा नारायणी देवस्थानाचे अध्यक्ष श्री. प्रेमानंद कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अन् शंखनादाने परिषदेला प्रारंभ झाला.
२. पुरोहित श्री. दामोदर वझे यांनी वेदमंत्रपठण केले.
३. सूत्रसंचालिका सौ. गौरी नायक यांनी या वेळी सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा मंदिर परिषदेसाठीच्या ‘राष्ट्र आणि धर्म रक्षण यांच्यासाठी मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन अपरिहार्य’ या विषयावरील संदेशाचे वाचन केले.
४. श्रीक्षेत्र तपोभूमी येथील श्री दत्त पद्मनाभ पीठाचे पीठाधिपती (पद्मश्री पुरस्कारप्राप्त) विभूषित धर्मभूषण सद्गुरु ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी यांचे मंदिर न्यास परिषदेसाठीच्या संदेशाचे ‘स्वामी ब्रह्मानंद वैदिक गुरुकुल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठा’चे प्रधानाचार्य वेदमूर्ती अनुप शांताराम शेलार यांनी वाचन केले.
परिषदेच्या सकाळच्या सत्रात मान्यवरांचे उद्बोधक मार्गदर्शन
परिषदेत सकाळच्या उद्घाटन सत्रात ह.भ.प. सुहास बुवा वझे यांनी ‘भक्तांनी मंदिराशी जोडण्यासाठी करायचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन केले. सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘मंदिर विश्वस्तांसाठी काळानुसार साधना’ या विषयावर मार्गदर्शन केले. श्री. रमेश शिंदे यांनी ‘हिंदूंच्या संघटनाच्या दृष्टीने मंदिरांचे संघटन, ही काळाची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले. सनातन संस्थेच्या सौ. शुभा सावंत यांनी ‘मंदिर : धर्मप्रसाराचे काळानुसार केंद्रबिंदू’ याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. रोहन देसाई आणि सौ. गौरी नायक यांनी केले.
परिषदेत संमत झालेले ठराव
१. मंदिरांचे पावित्र्य राखण्यासाठी मंदिर परिसरात १०० मीटर अंतरात मद्य आणि मांस विक्री केंद्रांवर बंदी आहे. या कायद्याची त्वरित कार्यवाही करावी आणि यामध्ये कोणत्याही प्रकारची सवलत देऊ नये.
२. मद्यालयांना हिंदु देवतांची नावे देण्यास प्रतिबंध करणारा कायदा पारित करावा.
३. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी करण्यासाठी सरकारने लवकरात लवकर पुढाकार घ्यावा.
४. गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा द्यावा.
५. हिंदूंचे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी धर्मांतरविरोधी कायदा पारित करावा.
६. जत्रोत्सवात मंदिर परिसरात अन्य धर्मियांना स्टॉल लावण्यास प्रतिबंध करावा.
७. मंदिर समितीमध्ये महिलांनाही प्रतिनिधी म्हणून स्थान द्यावे.
८. मंदिराचे पावित्र्य टिकवण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करावी.
९. मंदिरातील धार्मिक उत्सवाच्या वेळी धर्महानी करणारे कार्यक्रम ठेवू नयेत.
‘हिंदु युवा शक्ती’च्या कार्यकर्त्यांचा सत्कार
गोमंतकियांसाठी दिशादर्शक असलेल्या आणि देव, देश अन् धर्म रक्षण यांसाठी कार्यरत असलेल्या म्हापसा येथील ‘हिंदु युवा शक्ती’च्या कार्याचा मंदिर परिषदेमध्ये गौरव करण्यात आला. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी ‘हिंदु युवा शक्ती’च्या कार्याची उपस्थितांना माहिती दिली आणि त्यानंतर सनातनचे संत सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी ‘हिंदु युवा शक्ती’च्या कार्यकर्त्यांचा श्री गणपतीची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी ‘श्री संप्रदाया’चे श्री. राजीव कुडके यांचा श्री. अशोक नाईक यांनी सत्कार केला. गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित यांचा सत्कार श्री. अशोक नाईक यांनी केला. ‘श्री संप्रदाया’चे श्री. राजीव कुडके यांनी या वेळी जुने गोवे येथे श्री संप्रदायाने उभारलेल्या भव्य श्री गोवेश्वर मंदिराची माहिती उपस्थितांना दिली. गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांनी मंदिर महासंघाच्या कार्याची माहिती दिली.
परिषदेच्या सायंकाळच्या सत्रात ‘मंदिर विश्वस्तांना येणार्या कायदेशीर आणि अन्य अडचणी’, या विषयावर उच्च न्यायालयाचे अधिवक्ता संतोष रिवणकर आणि अधिवक्ता सुनील सिरसाट यांनी मार्गदर्शन केले. या वेळी अनेक मंदिर विश्वस्तांनी प्रश्न विचारून स्वतःचे शंकानिरसन करून घेतले. परिषदेत सायंकाळच्या सत्रात ‘मंदिर महासंघ संघटन दिशा’, ‘मंदिरे धर्मशिक्षणाची केंद्रे कशी करावीत ?’, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली, तसेच उपस्थित मान्यवरांनी या विषयावर मार्गदर्शन केले. परिषदेच्या समारोप समारंभात मंदिराच्या रक्षणासाठी विविध ठराव घेण्यात आले.
परिषदेची फलनिष्पत्ती
१. ३९ मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू करण्याचे निश्चित केले.
२. २९ मंदिरांनी तालुकास्तरावर बैठका आयोजित करण्याचे ठरवले.
३. ३० मंदिरांमध्ये धर्मशिक्षणाचे फलक लावण्याचे ठरले.
४. २६ मंदिरांमध्ये धर्मजागृतीपर व्याख्यानांचे आयोजन करण्याचे निश्चित झाले.
५. २८ मंदिरांमध्ये धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याचे ठरले.
६. २१ मंदिरांमध्ये सामूहिक आरती चालू करण्याचे ठरवण्यात आले.
७. परिषदेत उपस्थित सर्वांनी मंदिराच्या १०० मीटर परिसरात मद्य आणि मांस विक्री बंद करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले.








