
पुणे – हिंदुत्वनिष्ठांच्या संघटित मागणीनंतर सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यान २८ आणि २९ मे या दिवशी बंद ठेवण्यात येणार आहे. येथील ऐतिहासिक सारसबाग परिसरात ९ मार्चला झालेल्या ‘रमझान ईद’च्या दुसर्या दिवशी मोठ्या प्रमाणात मुसलमानांचा जमाव जमला होता. या पार्श्वभूमीवर विश्व हिंदु परिषद, सकल हिंदु समाज, पतित पावन संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच, महाराष्ट्र मंदिर महासंघ, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ केले होते. याविषयीचे निवेदनही पुणे पोलीस, पुणे मनपा आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांना देण्यात आले होते. सारसबाग उद्यान परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या विश्वस्तांनीही प्रशासनाला सारसबाग उद्यान बकरी ईदनंतर बंद ठेवण्यासाठी निवेदन दिले. त्यानंतर ‘सध्या शहरात प्रतिबंधात्मक आदेश लागू असून याच पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव सारसबाग उद्यानही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे’, अशी माहिती महापौर सौ. मंजुषा नागपुरे यांनी २६ मे या दिवशी सामाजिक माध्यमांवर दिली.
सारसबागेत नमाजपठण आणि मांसाहार झाल्यामुळे प्रतिबंधात्मक आदेश काढण्याची हिंदुत्वनिष्ठांनी केली होती मागणी

पुणे – आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सारसबाग आणि श्री सिद्धिविनायक मंदिर परिसराचे पावित्र्य जपण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश काढण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलनाद्वारे केली होती; मात्र या अत्यंत संवेदनशील अन् न्याय्य मागणीला पुणे महापालिका प्रशासन आणि पुणे पोलीस प्रशासन यांकडून पूर्णपणे ‘केराची टोपली’ दाखवण्यात आली आहे. १८ मेच्या दुपारपर्यंत तरी प्रशासनाकडून या संदर्भात कोणताही प्रतिबंधात्मक आदेश अथवा परिपत्रक काढण्यात आलेले नाही, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि प्रशासनाच्या ढीम्म भूमिकेवर ज्येष्ठ पत्रकार शेखर जोशी यांनी फेसबुक पोस्टद्वारे तीव्र आक्षेप नोंदवत प्रशासन आणि सत्ताधारी यांना धारेवर धरले आहे.
बकरी ईदच्या काळात सारसबागेत प्रतिबंधात्मक आदेश काढण्याची मागणी !
गेल्या काही दिवसांपूर्वी रमझानच्या काळात सारसबाग परिसरात सहस्रोच्या संख्येने मुसलमान धर्मियांचा जमाव एकत्र आला होता. पेशवेकालीन वारसा लाभलेल्या या पवित्रस्थळाची सुरक्षा आणि पावित्र्य राखण्यात प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरले होते. यापूर्वी शनिवारवाड्याच्या परिसरातही उघडपणे नमाजपठण करण्याचा प्रकार घडला होता.
या पार्श्वभूमीवर २७ एप्रिलला विश्व हिंदु परिषद, पतित पावन संघटना, स्वातंत्र्यवीर सावरकर विचार मंच, महाराष्ट्र मंदिर महासंघ, स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंच आणि हिंदु जनजागृती समिती यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येत ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ केले होते. या आंदोलनाद्वारे बकरी ईदच्या काळात सारसबागेत गर्दी, मांसाहार किंवा कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी त्वरित प्रतिबंधात्मक आदेश काढावेत आणि बिगर-हिंदु सामूहिक कार्यक्रमांना कायमस्वरूपी बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.
पत्रकार शेखर जोशी यांनी फेसबुक पोस्टमधून विचारले गंभीर प्रश्न !
१. पुणे महापालिकेत आणि राज्यात भाजपची सत्ता असतांनाही हिंदुत्वनिष्ठांच्या मागणीकडे दुर्लक्ष का केले जात आहे ? शनिवारवाड्यातील नमाजपठणाच्या प्रकाराविरोधात खासदार, प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांनी जाहीर भूमिका घेतली, त्या रस्त्यावर उतरल्या. मग पुण्याचे इतर भाजप आमदार, खासदार आणि माजी नगरसेवक यांची या विषयात ‘अळी मिळी गुप चिळी’ कशासाठी ? महापौर या विषयावर गप्प का ?
२. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत रस्त्यावर नमाज पढू दिला जाणार नाही, अशी ठोस आणि कायदेशीर भूमिका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाहीरपणे घेतात. मग महिनाभर आधी निवेदन देऊन आणि आंदोलन करूनही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सारसबाग प्रकरणी अद्याप कोणतीही कठोर भूमिका का घेत नाहीत ?
३. हिंदूंच्या पवित्र तीर्थक्षेत्रांचे रक्षण करण्याच्या बाबतीत जर महाराष्ट्राचे प्रशासन आणि शासन ढीम्म रहाणार असेल, तर जनतेने योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीशी महाराष्ट्राच्या नेतृत्वाची तुलना केली, तर त्यात चुकीचे ते काय ?


