
सातारा – राज्यात मुली, महिला आणि लहान बालकांवरील अत्याचारांच्या अत्यंत संतापजनक घटना उघडकीस येत आहेत. पुणे जिल्ह्यातील नसरापूर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर तिची निर्घृण हत्या करण्यात आली. त्याचप्रमाणे चाकण परिसरातही एका लहान बालकावर अनैसर्गिक अत्याचार करून त्याची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनांमुळे संपूर्ण समाजात भीती, असुरक्षितता आणि तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा गंभीर गुन्ह्यांनंतर प्रशासनाकडून ‘जलद गती न्यायालयात खटला चालवू’ किंवा ‘कठोर शिक्षा देऊ’ अशा घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्षात न्यायप्रक्रिया दीर्घकाळ चालत रहाते. यामुळे गुन्हेगारांच्या मनात कायद्याची भीती निर्माण होत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत कडक अन् प्रभावी होती. स्त्रियांवरील अत्याचारांना तात्काळ कठोर शिक्षा देऊन समाजात कायद्याचा धाक निर्माण केला जात होता. आजच्या परिस्थितीतही शासनाने गुन्हेगारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
या वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका प्रमुख शिवराज तलवार, प्रशांत जाधव, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे, हेमंत सोनवणे, ‘धर्मसेतू सेवा संस्थान’च्या गीतांजली गोंधळेकर, समर्थभक्त शहाजीबुवा रामदासी, अखिल भारतीय हिंदु महासभेचे उमेश गांधी, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता गुरुराज रसाळ, विश्व हिंदु परिषदेचे राजीव दीक्षित, हिंदु राष्ट्र गोशाळेचे गोसेवक, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे, तसेच सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.







