Menu Close

महाराष्ट्रात विविध ठिकाणी हिंदु राष्ट्र-जागृती सभेला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दैठणे गुंजाळ (अहिल्यानगर)

दैठणे गुंजाळ (जिल्हा अहिल्यानगर) – येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि ‘धर्म रक्षक संघ’ यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेली ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ उत्साहात पार पडली. या सभेला १०० हून अधिक धर्माभिमानी उपस्थित होते. या सभेच्या प्रमुख वक्त्या सनातन संस्थेच्या सौ. मनीषा कावरे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात प्रभु श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महान कार्याचा गौरव केला. त्याचप्रमाणे समाजाला धर्माचरणाचे महत्त्व पटवून दिले. पूर्वीचा समाज धर्माभिमानी असल्याने घरोघरी ‘रामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र यांचे संस्कार होते. आजच्या पिढीला धर्मशिक्षणाची नितांत आवश्यकता आहे’, असे त्यांनी सांगितले.

हिंदु जनजागृती समितीचे अहिल्यानगर जिल्हा समन्वयक श्री. रामेश्वर भुकन यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्याप्रमाणे प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्याप्रमाणे वर्तमानकाळातील ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर, गोहत्या, मंदिरांवरील आघात या सर्व घटना पहाता आपल्याला हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी संघटित होण्याला पर्याय नाही. सभेच्या शेवटी हिंदु राष्ट्रासाठी प्रयत्न करण्याची शपथ घेण्यात आली. सर्व उपस्थितांनी धर्मजागृतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. सभेच्या शेवटी लाठी-काठी प्रात्यक्षिक दाखवून स्वसंरक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची माहिती श्री. संतोष गवळी यांनी दिली. सभा स्थानिक कार्यकर्त्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडली.


रायपाटण (राजापूर)

हिंदु राष्ट्र निर्मितीसाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा निश्चय करा ! – श्री. दामोदर लिंगायत, हिंदु जनजागृती समिती

 

रायपाटण (राजापूर) – हिंदवी स्वराज्यासम हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी मावळ्यांप्रमाणे योगदान देण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याचा निश्चय करा , असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. दामोदर लिंगायत यांनी केले. श्री. लिंगायत होळीचा मांड, रायपाटण येथे तिथीनुसार नुकत्याच साजर्‍या झालेल्या शिवजयंतीनिमित्त आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याकडून हिंदु राष्ट्राकडे’ या विषयावरील व्याख्यानात बोलत होते.

श्री. लिंगायत पुढे म्हणाले की, ज्यांची हिंदु राष्ट्रासाठी काहीतरी करायची इच्छा आहे, त्यांच्यासाठी समितीच्या वतीने आरंभी धर्मशिक्षण वर्ग किंवा स्वसंरक्षण प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. आपल्या भागातील अशाप्रकारे साप्ताहिक वर्ग चालू करायचे असतील, तर आम्हाला अवश्य सांगा. या कार्यक्रमाच्या प्रारंभी जिजामाता विद्यामंदिर रायपाटणचे माजी मुख्याध्यापक श्री. विनोद करंदीकर यांनी प्रस्तावना करतांना शिवकार्याचा थोडक्यात आढावा घेतला.


जालगाव (दापोली)

दापोली – हिंदु धर्म आणि हिंदूंवरील आघातांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लव्ह जिहाद, धर्मांतर, हिंदूंच्या मिरवणुकांवर धर्मांधांची आक्रमणे होत आहेत. या विविध आक्रमणांना सामोरे जाण्यासाठी आणि हिंदूंच्या रक्षणासाठी प्रत्येक गावातून हिंदूंची इकोसिस्टम (यंत्रणा) सिद्ध होणे आवश्यक आहे, असे  आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय जोशी यांनी केले. जालगाव (दापोली) येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या पटांगणात २१ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र जागृती सभेत ते बोलत होते. या सभेला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु सत्यवान कदम यांनीही संबोधित केले.

श्री. संजय जोशी म्हणाले की,

भारतातील ९ राज्यांमध्ये हिंदू अल्पसंख्यांक झाले आहेत. देशभरातून प्रतिवर्षी ३.५ लाख मुली, महिला गायब होत आहेत. देशाच्या सीमा काही ठिकाणी उघड्या राहिल्याने घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. संजीवनी बुटी आणायला जाणार्‍या हनुमंताला फसवून मारण्यासाठी कालनेमी राक्षसाने साधूचा वेश धारण केला, त्याप्रमाणे धर्मांध नाव पालटून हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यासाठी फेसबुकसारखी सामाजिक माध्यमांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. समाजात वावरणार्‍या या कालनेमींपासून हिंदूंनी सावध रहायला हवे. हिंदूंनी स्वरक्षणासाठी तात्काळ एकत्र येण्याचा सराव करणे, कराटे लाठी-काठी यांचे प्रशिक्षण घेणे, कायद्याने संमत साधने वापरणे आवश्यक आहे. हिंदुस्थानचा रंग भगवा आहे आणि भविष्यातही भगवाच राहील, हे धर्मांधांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे.

कलियुगात नामस्मरण ही साधना आहे !- सद्गुरु सत्यवान कदम

सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या जीवनात ८० टक्के समस्या आध्यात्मिक कारणामुळे निर्माण होतात. त्यामुळे त्यावर आध्यात्मिक उपाय म्हणजे साधना करणे आवश्यक असते. साधनेमुळे या आध्यात्मिक समस्या सुटतात किंवा त्या सहन करण्याची म्हणजेच प्रारब्ध भोगण्याची शक्ती मिळते. भगवंतप्राप्तीसाठी म्हणजेच आनंद प्राप्तीसाठी युगपरत्वे वेगवेगळी साधना सांगितली आहे. कलियुगात नामस्मरण ही साधना आहे. ‘कलियुगी नामची आधार’ असे संतांनी सांगितले आहे. श्रीमद् भगवतगीतेत स्वतः भगवान श्रीकृष्णाने ‘यज्ञानां जपयज्ञोस्मि’ असे म्हटले आहे. नामजप साधनेला स्थळ -काळाचे बंधन नाही. कलियुगात नामजप हीच सर्वश्रेष्ठ साधना आहे.

या सभेला रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री. केदार साठे,  महालक्ष्मी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष श्री. गजानन कांबळे, जालगावचे सरपंच श्री. अक्षय फाटक, जिल्हा परिषद सदस्य श्री. किशोर देसाई, जालगावचे गाव अध्यक्ष श्री. अशोक जालगावकर, तंटामुक्त अध्यक्ष श्री. सुरेश मिसाळ, भाजप मंडल अध्यक्षा सौ. जया साळवी यांच्यासह २५० हून अधिक धर्मप्रेमी-हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.


नागपुर

राष्ट्ररक्षण-धर्मजागृतीसाठी मंदिरांनी प्रयत्न करावेत ! – दिलीप कुकडे, अध्यक्ष, श्री संकटमोचन हनुमान मंदिर, बेल्लोरी

नागपूर – समाजात हिंदु देवता आणि हिंदु धर्म यांच्याविषयी पसरवण्यात येणारे नॅरेटिव्ह (खोटे कथानक) नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्र-जागृती सभांची आवश्यकता आहे. यात मंदिरांची भूमिका महत्त्वाची आहे. मंदिरांनी आपल्या परिसरात शौर्यजागृती करणारे पारंपरिक खेळ, उदा. तलवारबाजी, दांडपट्टा यांचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. गुरुकुल पद्धतीची शिक्षणव्यवस्था पुन्हा निर्माण होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मंदिरात येणार्‍या भाविकांना धर्मशिक्षण देण्यासाठी धर्मशिक्षणवर्ग, बालसंस्कारवर्ग यांचे आयोजन करायला हवे. प्रत्येकाने केवळ अन्न, वस्त्र, निवारा इतकाच विचार न करता सनातन धर्माला मजबूत, सशक्त आणि समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे मार्गदर्शन बेल्लोरी श्री संकटमोचन हनुमान मंदिराचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाचे श्री. दिलीप कुकडे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते.

सभेत अनेक हिंदूंनी हिंदु राष्ट्र स्थापनेचा उद्घोष केला. मान्यवर वक्त्यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे होण्याचे आवाहन केले आणि उपस्थित धर्माभिमानी हिंदूंनी धर्मकार्यात योगदान देण्याची प्रतिज्ञा करत आवाहनाला प्रतिसाद दिला. धर्माभिमानी हिंदू आणि मंदिर महासंघाचे पदाधिकारी यांच्या सहभागाने येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली. सभेच्या प्रारंभी श्री. प्रदीप पांडेगुरुजी यांनी शंखनाद आणि मंत्रपठण केले. सनातन संस्थेच्या सौ. गौरी जोशी आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. हेमंत खत्री यांनीही त्यांचे विचार मांडले.

Latest News