Menu Close

महाराष्ट्र मंदिर महासंघाचे मंडणगड तालुका मंदिर-न्यास अधिवेशन

मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटित होण्याचा मंदिर विश्वस्तांचा निर्धार !

डावीकडून दीपप्रज्वलन करतांना सर्वश्री संजय जोशी, संतोष चव्हाण, ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, रमेश कडू आणि विनय पानवळकर

 

मंडणगड – महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मंडणगड येथील तालुकास्तरीय मंदिर-न्यास अधिवेशनाला तालुक्यातील १२० मंदिर विश्वस्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी संघटित होण्याचा निर्धार मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केला. मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करणे, धर्मशिक्षणवर्ग चालू करणे, सामूहिक आरती करणे आदी विविध उपक्रम मंदिरांमधून चालू करण्यासह मंदिर विश्वस्तांच्या संघटनासाठी वेळ देणार असल्याचेही मत उपस्थित मंदिर विश्वस्तांनी व्यक्त केले. १० ऑगस्ट या दिवशी लोकनेते गोपीनाथजी मुंडे महाविद्यालयात आयोजित मंडणगड मंदिर विश्वस्त अधिवेशन प्रेरणादायी आणि भावपूर्ण वातावरणात पार पडले.

देवस्थानांच्या देवराई भूमी वाचवण्यासाठी संघटितपणे लढा देणे आवश्यक ! – संजय जोशी, राज्य संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ

हिंदुस्थानावर राज्य करण्यासाठी मोगल आक्रमकांनी हिंदूंचे श्रद्धास्थान असलेली मंदिरे आणि देवतांच्या मूर्ती तोडल्या. त्यानंतर आलेल्या इंग्रजांनी हिंदूंच्या मंदिरांच्या जागा कह्यात घेणे, मंदिरांचा पैसा हडपणे, असे आघात केले. भारतात निधर्मी राज्यकर्त्यांनीही देशभरातील साडेचार लाख मंदिरांचे सरकारीकरण करून मंदिरांचा पैसा अन्य पंथीयांना वाटण्याचे चालू केले. सरकारीकरण झालेल्या शनि मंदिरात केक कापण्याची कुप्रथा मंदिर महासंघाच्या विरोधानंतर बंद झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर देवराई भूमींच्या सात-बारा वरून देवस्थानांचे नाव काढून तेथे शासनाचे नाव लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या भूमी देवस्थानांच्या कह्यात दिल्या जाव्यात, यासाठी मंदिर महासंघ प्रयत्नरत आहे. यासाठी ‘अँटी लँड ग्रॅबिंग ॲक्ट’ (भूमी बळकावणे विरोधी कायदा) महाराष्ट्र शासनाने लागू करावा, यासाठी मंदिर महासंघ पाठपुरावा करत आहे.

मंदिरे ही धर्मशिक्षणाची केंद्रे व्हावीत ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

मंदिरे ही हिंदूंसाठी सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारी चैतन्याचे स्रोत आहेत. समाजाची सात्त्विकता टिकून ठेवण्यामध्ये मंदिरांचे योगदान महत्त्वाचे आहे. समाजात वाढलेला भ्रष्टाचार, घसरलेली नीतीमत्ता हा समाजात न्यून झालेल्या सात्त्विकतेचा गंभीर परिणाम आहे. मंदिरे ही समाजाला धर्माविषयी दिशा देणारी केंद्रे बनल्यास ती खर्‍या अर्थाने समाजाची श्रद्धाकेंद्रे बनू शकतात. यासाठी मंदिरामध्ये नियमित धर्मिशक्षणवर्ग चालू करणे आवश्यक आहे. या वर्गातील शिकवणुकीमुळे समाज धर्माचरणी आणि सात्त्विक बनेल.

मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करणे आवश्यक ! – डॉ. ह.भ.प. अभय महाराज सहस्रबुद्धे, जिल्हा संयोजक, महाराष्ट्र मंदिर महासंघ, विश्वस्त भगवान परशुराम देवस्थान.

मंदिरांचे पावित्र्य राखण्याचा एक भाग म्हणून मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता (ड्रेसकोड) लागू करणे आवश्यक आहे. मंदिरा सभोवतालची जागा देवरहाटीमध्ये कोणत्याही सुविधा निर्माण करायच्या असतील, तर शासकीय अडचणी येतात. देवरहाटीमध्ये देवाचे अस्तित्व आपण मानत असल्याने, तेथील पावित्र्य आपण जपतो, मग यावर सरकारचे नाव का ? याविषयी आपल्याला कायदेशीर लढाही द्यावा लागेल.

मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे ! – रमेश कडू, महाराष्ट्र मंदिर महासंघ, दापोली संयोजक

हिंदूंसमोर अनेक समस्या आहेत, त्याचे मूळ कारण धर्मशिक्षणाचा अभाव आहे.  हिंदु अधिवेशनातून आम्हाला प्रेरणा मिळाली. धर्मशिक्षणाचे महत्त्व लक्षात आल्याने आम्ही मंदिरातून धर्मशिक्षणवर्ग चालू केले, धर्मशास्त्र आणि साधनेचे महत्त्व धर्मशिक्षणवर्गातून लक्षात आले. धर्म जागृत ठेवायचा असेल, तर मंदिरांची भूमिका महत्त्वाची आहे. मंदिरांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र येणे महत्त्वाचे आहे.

हिंदु धर्मासाठी मंदिर विश्वस्तांनी एकवटले पाहिजे ! – संतोष चव्हाण, सचिव, श्री भैरी-जोगेश्वरी देवस्थान, मंडणगड

या अधिवेशनात ‘विश्वस्तांच्या रूपात सर्व देवता एकवटलेल्या आहेत !’, असे जाणवत आहे. मंदिरांच्या समस्या ऐकून घेणे आणि त्याचे निराकरण करणे, हे महासंघाचे चांगले कार्य चालू आहे, आपल्या तालुक्याने या अभियानात चांगला सहभाग घेतला आहे. गोप-गोपींनी जसे गोवर्धन पर्वताला स्वतःच्या काठ्या लावल्या, तसे आपण संघटितपणे हिंदु धर्माचे कार्य करायचे आहे, संघटनामध्ये शक्ती आहे. हिंदु धर्मासाठी मंदिर विश्वस्तांनी एकवटले पाहिजे.

Latest News