Menu Close

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गेल्या दीड वर्षात शेकडो पशूवधगृहांना दिले कायदाद्रोही परवाने !

  • ‘भारतीय प्राणी कल्याण मंडळा’ची तक्रार

  • विमानतळांच्या १० किमी परिघात पशूवधगृहांना अनुमती नाही !

  • हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’कडून केंद्र सरकारकडे तक्रार !

मुंबई – प्रमुख भारतीय विमानतळांजवळ पक्ष्यांच्या धडकेच्या वाढत्या घटना आणि कर्णावतीत नुकत्याच झालेल्या विमान अपघातात पक्षी धडकेचा समावेश असल्याचा संशय पहाता हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने सरकारकडे निवेदन दिले आहे. पंतप्रधान आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री यांना दिलेल्या निवेदनात ‘विमान नियम १९३७’च्या ‘नियम ९१’ची कठोर कार्यवाही (अंमलबजावणी) करण्याची तात्काळ मागणी करण्यात आली आहे. ‘भारतीय प्राणी कल्याण मंडळ’ या सरकारी संस्थेने नुकतीच माहिती दिली होती की, बृहन्मुंबई महानगरपालिकेने ‘नियम ९१’चे उल्लंघन करून वर्ष २०२४ आणि २०२५ मध्ये शेकडो पशूवधगृहांना परवाने दिले आहेत. मंडळाने नमूद केले होते की, ही अनधिकृत मांस दुकाने पक्ष्यांसाठी आकर्षण ठरतात, ज्यामुळे हवेत विमानांना पक्षी धडकण्याचा धोका वाढतो.

काय सांगतो ‘विमान नियम १९३७’चा ‘नियम ९१’ ?

‘नियम ९१’नुसार कोणत्याही विमानतळाच्या १० किलोमीटरच्या परिघात पशूवधगृहे, मांस दुकाने आणि कचरा टाकणे, यांस मनाई आहे.

सुराज्य अभियानाने दिलेल्या निवेदनासंदर्भात महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. सुराज्य अभियानाने हे निवेदन नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण, महाराष्ट्र सरकार, सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, अन्न आणि औषध प्रशासन, नवी मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राचे नगरविकास, गृह आणि पर्यावरण विभाग यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पाठवले.

२. यामध्ये नियमांच्या उल्लंघनांवर प्रकाश टाकण्याची मागणी करून विमान वाहतूक सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आणि सार्वजनिक जीवनाचे रक्षण करण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली आहे.

३. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आकडेवारीनुसार, विमानाला पक्षी धडकण्याच्या घटना वर्ष २०२० मध्ये १ सहस्र १५२ वरून वर्ष २०२१ मध्ये १ सहस्र ४६६ वर पोचल्या.

४. आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेने पक्ष्यांच्या धडकेमुळे विमान आस्थापनांना प्रतिवर्षी १ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक हानी झाल्याचा अनुमान वर्तवला आहे. पक्ष्यांच्या धडकेमुळे वर्ष १९८८ पासून जगभरात २०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

‘भारतीय प्राणी कल्याण मंडळा’च्या तक्रारीतील महत्त्वपूर्ण सूत्र !

‘मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालया’च्या अंतर्गत असलेल्या ‘भारतीय प्राणी कल्याण मंडळा’ने नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि अन्न आणि औषध प्रशासन या खात्यांना चेतावणी दिला की, अन्न सुरक्षा अधिकार्‍यांकडून आवश्यकता असूनही पशूवधगृहांची तपासणी केली नाही. यासह मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या वर्ष २०१५ च्या निर्णयाचा उल्लेख केला. यांतर्गत उच्च न्यायालयाने विमान वाहतूक सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणारे परवाने रहित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच एका मानद प्राणी कल्याण अधिकार्‍याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अलीकडेच मुंबई विमानतळापासून केवळ ६ ते ७.५ किमी अंतरावर असलेल्या शेळी कापण्याच्या ठिकाणावर धाड घातली होती.

सुराज्य अभियानाने सरकारकडे केलेल्या मागण्या !

१. नवी मुंबईपासून आरंभ करून विमानतळांच्या १० किलोमीटरच्या परिघात सर्व मांस दुकाने, पशूवधगृहे आणि पक्ष्यांना आकर्षित करणार्‍या क्रियाकलाप त्वरित हटवा.

२. देशव्यापी अनुपालनावर देखरेख करण्यासाठी आणि नियतकालिक अहवाल सादर करण्यासाठी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत केंद्रीय देखरेख समितीची स्थापना करा.

३. भारताच्या विमान वाहतूक सुरक्षा नियमांवर जनतेचा विश्वास पुनर्संचयित करण्यासाठी विमानतळ संचालकांकडून अनुपालन स्थिती अहवालांचे सार्वजनिक प्रकाशन करा.

४. टाळता येण्याजोग्या आपत्ती टाळण्यासाठी ‘नियम ९१’ची कठोर कार्यवाही करा.

Latest News