भक्ती

एक सुंदर तरुण स्त्री मोठ्या काळजीत बसली आहे. तिच्या काळजात भयंकर कालवाकालवा चालू आहे. तिच्या पुढ्यात दोन वृध्द पुरुष पडलेले आहेत. ते बेशुध्द झालेले आहेत. त्या तरुणीच्या दासी त्या वृध्द पुरुषांना सावध करीत आहेत.

इतक्यता “नारायण, नारायण” असे म्हणत नारदमुनींची स्वारी तेथे आली आहे. त्यांना पाहताच त्या तरुण स्त्रीला अतिशय आनंद झाला आहे. तिला आता मोठा आनंद वाटत आहे.

नारदांना वंदन करुन ती करुणवाणीने म्हणाली, “मुनीवर्य, आपणासारख्या भगवत्भक्ताचं दर्शन झालं. मी धन्य झाले. माझ्या या संकटप्रसंगी आपली कृपा झाली तर सगळं दु:खं नाहीसं होईल. आणि आम्हाला पुन: चांगले दिवस येतील अशी खात्री वाटत आहे !”

आश्चर्याने नारदमुनींनी विचारले, “बाई, तू कोण आहेस? हे वृध्द पुरुष कोण? यांना काय झालंय. मी तुला ह्या वेळी कोणतं सहाय्य करु? सगळं सांग!”

त्या तरुण सुंदर स्त्रीने आपली माहिती दिली, “माझं नाव भक्ती. सनातन काळापासून मी या पृथ्वीवर राहते. पुढं पडलेले हे दोन पुरुष म्हणजे ज्ञान आणि वैराग्य. हे माझे सेवक आहेत. पण मी त्यांच्यावर अगदी मुलांसारख प्रेम करते. यांचा मी प्रतिपाळ करते.

आम्ही द्रविड देशात रहात होतो आणि कर्नाटक प्रदेशातही फिरत होतो. हे कलियुग सुरू झालं ना, तेव्हापासून लोक आम्हाला विचारीनासे झाले बघा. आमची आबाळ सुरु झाली. लोक स्वार्थाच्या मागं लागले. आमची म्हणजेच भक्ती, ज्ञान, वैराग्य यांची त्यांना पर्वाच राहिली नाही. खरं ज्ञान सोडून नकली ज्ञानाला लोक भुलले.

माझी एक सखी होती. मुक्ती तिचं नाव होतं. लोक तिच्यासाठी पूर्वी वाटेल तो त्याग करीत, अतिशय कष्ट सोशीत; पण ह्या कलियुगात लोकांनी त्या थोर मुक्तीलाच वैकुंठात पाठवून दिलं आपण मुक्तीऐवजी शक्ती, युक्ती आणि आसक्ती यांच्याच भजनी लागले. मी म्हणजे भक्ती तर त्या प्रदेशातून पळून गेले. खरं ज्ञान हे जराजर्जर झालं. माझ्या पाठीमागं वासरासारखं आलं आणि वैराग्यनंही आमची संगत सोडली नाही.

नंतर आम्ही महाराष्ट्र प्रांतात फिरलो. तिथं मात्र आमचे दिवस बरे गेले. लोकांनी त्या जुन्या ज्ञानाला नव तेज दिलं. वैराग्याचा थोडा विकास केला आणि माझा- भक्तीचा छंद घेतला. आम्हांला आनंद झाला. महाराष्ट्र हे खरचं महान् राष्ट्र वाटलं आम्हाला !

पण कलियुगाचा जोर जसजसा वाढत गेला तसतसा आमचाही काळ फिरला. लोक पाखंडी बनले. ज्ञानाचा त्यांना गर्व झाला. ढोंगी वैराग्याचं स्तोम त्यांनी माजविलं आणि दांभिक भक्तीच्या अवडंबराचं प्रदर्शन सुरू झालं.

मग आम्ही गुर्जर प्रांतात निवास केला. तिथं तर काय ! त्या लोकांना अर्थ हाच परमार्थ वाटत होता. द्रव्यार्जनात गर्व झालेले लोक ते! त्यांना भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचं महत्व काय! आमचे प्रयत्न तिथे पूर्णपणे फसले.

नंतर या यमुनाकाठी गोकुळवृंदावनात आम्ही आलो. भगवान श्रीकृष्णाच्या वास्तव्यानं पवित्र झालेला हा प्रदेश. पण इथही तोच प्रकार.

ज्ञान आणि वैराग्य हे माझ्यापेक्षा वृध्द! पण माझे ते दास आहेत. ईश्वरकृपेनं मी सदा तरुण आहे. पण मला सर्वजण माता मानतात. ह्या माझ्या बाळांची दुर्दशा मला पहावत नाही. हे मूच्र्छेतून सावध व्हावेत आणि जगाला पुन: यांचा लाभ व्हावा अशी माझी इच्छा आहे.

नारदमुने, आपण आलात. छान झालं! आता तुम्हीच मला मार्ग दाखवा. आमचं संकट निवारण करा आणि ह्या मायामोहानं मूढ झालेल्या जगाला पुन: भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच महत्त्व पटवून लोककल्याण साधा. कलियुगाच्या फेर्‍यात राहूनही लोकांच कल्याण कसं होईल याचा मार्ग सांगून सर्वांना सुखी करा.”

त्या स्त्रीने सांगितलेली ही हकिगत नारदांनी ऐकली.

नारदमुनी म्हणाले, “भक्तीदेवी, कलियुगाच्या प्रभावानं तुम्हा तिघांची ही दुर्दशा झाली आहे, हे खरं आहे. भगवान श्रीकृष्णांनी द्वापारयुगात भागवत धर्माची जी घडी बसविली होती, ती आता विस्कटून गेली आहे. मी तर सगळीकडं फिरुन उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहतो आहे. पण आज तुम्हाला पाहिलं आणि माझे डोळे पूर्णपणे उघडले.

आता ह्याला एक उपाय आहे. तो असा की, भागवत धर्माचं आचरण पुन: या जगानं केलं पाहिजे. तसा प्रयत्न पुन: संतसज्जनांनी केला पाहिजे.

बदरीकाश्रमात सनक, सनातन, सनंदन आणि सनत्कुमार वगैरे भागवतधर्माचे पुरस्कर्ते जमले आहेत. त्यांच्याकडं जाऊन मी तुमची हकीगत सांगतो आणि जगाला भागवत धर्माचं महत्त्व पटविण्यासाठी उपाय करण्याची विनंती करतो. त्यांच्या कृपाप्रयत्नानं तुम्हा भक्ती, ज्ञान, वैराग्य यांना पुन: सुखाचे दिवस येतील आणि जगाचं कल्याण होऊन सर्व सुखी होतील.

अशाप्रकारे नारदांनी भक्तीला शांत राहण्याचा उपदेश केला पण भक्ती म्हणाली, मी शांत राहते, पण हे ज्ञान आणि वैराग्य मृत्युपंथाला लागले आहेत. त्यांचं काय? कृपा करुन यांच्यात चैतन्य आणा. यांना संजीवन द्या.

त्या दोन वृध्दांजवळ नारदमुनी बसले. त्यांनी त्यांच्या अंगावरुन हात फिरवले, त्यांना शीतोपचार केले. आणि त्यांच्या कानाशी मोठ्याने ओरडून ते म्हणाले, “गीता ! वेदांचं सार ! भगवद्गीता पठन करा. उठा !”

“गीता” शब्द उच्चारताच ते वृध्द ताडकन उठले. त्यांनी नारदांचे पाय धरले. भक्तीला आनंद झाला. तिने नारदांचे आभार मानले.

नंतर “नारायण नारायण” म्हणत नारदमुनी थेट बदरिकाश्रमात गेले. तेथे त्यांनी ऋषिमुनींच्या सभेत तो प्रश्न मांडला. भागवत धर्माच्या प्रसाराची आणि प्रचाराची योजना सर्वांनी विचार करुन ठरविली. त्या योजनेप्रमाणे सर्व धर्मनिष्ठांना आचरण करण्याच्या आज्ञा सोडल्या. त्यायोगाने भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांना पुन: संजीवन मिळाले.

त्यांच्या आज्ञेप्रमाणे भगवत्भक्तांनी, सज्जन संतांनी जगावर सर्वत्र कथा-कीर्तने करणे, भजने म्हणणे, पुराण सांगणे, प्रवचने देणे, पारायणे करणे इ. कार्यक्रम सुरू केले. तसेच गंगाद्वाराजवळ आनंद नावाच्या उपवनात स्वत: नारदमुनींनी पहिला भागवतसप्ताह केला. त्या उत्सवाला अनेक ऋषिमुनी हजर होते. पूर्वी वैकुठांत गेलेली मुक्तिसुध्दा नारदमुनींनी त्या थोर कार्यक्रमाला तेथे आणली.

अशाप्रकारे नंतर नारद वगैरे पुण्यशील ऋषींनी नंतर त्या भागवत धर्माचा महिमा वाढविला. अनेक उपाय करुन भक्ती, मुक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या कथा सांगून त्यांचे महत्त्व वाढविले. भक्तीची कथा पावन झाली आणि पृथ्वीवर सर्वत्र भागवतसप्ताह होऊ लागले.