अहंकार आणि गुरुद्रोह यांमुळे रसातळाला गेलेला बैजू बावरा यांचा शिष्य गोपाल !

१. बैजू गुरूंची कृपा आत्मसात करण्यात यशस्वी होणे आणि गुरूंकडून संगीत-विद्या शिकून एकांतात निघून जाणे : हरिदास महाराजांचे बैजू बावरा आणि तानसेन, असे दोन शिष्य होते. दोन्ही गुरुबंधू महान संगीततज्ञ होऊन गेले. बैजू बावरा यांचा जन्म १५४२ मध्ये चंदेरी (ग्वाल्हेर क्षेत्र, मध्य प्रदेश) येथे झाला होता. बैजूचे संगीत आणि व्यवहार अत्यंत सुखद होता. तो गुरूंची कृपा आत्मसात करण्यात यशस्वी झाला. गुरूंकडून संगीत-विद्या शिकून बैजू एकांतात निघून गेला आणि झोपडी तयार करून संयमी जीवन जगत संगीताचा अभ्यास करू लागला.

२. गोपालने बैजूची प्रसन्नता मिळवणे आणि कित्येक वर्षे अभ्यास करून संगीत-विद्येत नैपुण्य मिळवणे : बैजू अभ्यासात असा एकाग्र झाला की, संगीताची कला शिकणारे कित्येक जण त्याचे शिष्य बनले. त्यांच्यापैकी गोपाल नायक नावाचा एक शिष्य अत्यंत प्रतिभावान होता. जसे बैजूने आपले गुरु हरिदास महाराज यांना प्रसन्न केले होते, तसेच गोपालनेही बैजूला प्रसन्न केले होते. सप्ताह, मास होता होता कित्येक वर्षे अभ्यास करून गोपालने संगीत-विद्येत नैपुण्य मिळवले.

३. गोपाल निघतांना बैजूचा कंठ दाटून डोळ्यांत अश्रू तरळणे आणि संगीताच्या विद्येचा लाभ पैसे कमवण्यासाठी किंवा अहंकार पोसण्यासाठी करू नकोस, असा उपदेश करणे : आता गुरूंचा निरोप घेण्याची वेळ आली. गोपालने गुरूंना नमस्कार केला. निरोप देतांना बैजूचे हृदय भरून आले. हा शिष्य माझ्या सावलीप्रमाणे होता. माझी विद्या आत्मसात करण्यात यशस्वी झाला आहे; पण याला जाण्यापासून तर रोखता येणार नाही. शिष्याला निरोप देतांना बैजूचा कंठ दाटून डोळ्यांत अश्रू तरळले. तो म्हणाला, वत्स ! तुला संगीताची जी विद्या दिली आहे, ती मनुष्यजातीचा शोक, मोह, दुःख, चिंता निवारण्यासाठी आहे. हिचा लाभ पैसे कमवण्यासाठी किंवा अहंकार पोसण्यासाठी करू नकोस. निरोप घेऊन गोपाल नायक निघाला.

४. सत्तेच्या लालसेत मनुष्य वाट चुकतो आणि न करण्यासारखे कर्म करून त्याची दुर्दशा होते ! : गोपाल नायकचा त्याच्या गीत-संगीताच्या प्रभावाने चोहीकडून जयजयकार होत होता. जसा तानसेन अकबरचा विशेष राजगायक होता, तसा गोपाल काश्मीरनरेशाचा विशेष राजगायक झाला.

५. गोपालने गायकांना आव्हान देणे आणि पराभूत झालेल्या गायकांचा शिरच्छेद करणे : आता गोपालला चोहीकडून यश मिळू लागले. त्यामुळे त्याचा अहंकार असा फुलला की, तो गायकांचे संमेलन भरवू लागला आणि त्यांच्याशी गीत-संगीताचा शास्त्रार्थ करू लागला. गायकांना तो आव्हान द्यायचा, माझ्यासमोर या ! जर मला कोणी पराभूत केले, तर मी आपला शिरच्छेद करीन आणि जो माझ्याकडून पराभूत होईल, त्याला आपला शिरच्छेद करून घ्यावा लागेल.

जो पराभूत व्हायचा, त्याचा तो शिरच्छेद करायचा. पराभूत झालेल्या गायकांचा शिरच्छेद झाल्यावर त्यांच्या पत्नी विधवा आणि मुले अनाथ, लाचार, दीन-हीन व्हायची; पण अहंकार अधिक होऊन गोपालला आनंद होत असे. त्याला वाटे की, मी किती जणांचे शीर धडावेगळे केले. मला आव्हान देणारा तर मृत्यूच्याच मुखात पडतो. बैजूचा सत्शिष्य कुशिष्य बनला.

६. बैजूला गोपालच्या कुकर्मांविषयी कळल्यावर अतिशय दुःख होणे आणि शिष्याची समजूत घालण्यासाठी त्याच्याकडे जाणे : बैजूला गोपालच्या या कुकर्मांविषयी लवकर कळले नाही. कित्येक गायकांचे शिर धडावेगळे झाले, कित्येक अबला विधवा झाल्या, त्यांची मुले दारोदारच्या ठोकरा खाण्यासाठी विवश झाली, त्या वेळी कोठे फिरत फिरत ही वार्ता बैजूच्या कानावर पडली. त्याला अतिशय दुःख झाले की, या दुष्टाने माझ्या विद्येचा उपयोग अहंकार पोसण्यासाठी केला ! मी सांगितले होते की, ही संगीताची विद्या अहंकार पोसण्यासाठी मुळीच नाही. शेवटी तो आपल्या शिष्याची समजूत घालण्यासाठी कित्येक मैलांचा प्रवास करत पायीपायी चालत, जिथे गोपाल नायक मोठ्या थाटामाटाने रहात होता, तिथे पोहोचला.

७. बैजूने पुष्कळ विनवण्या केल्यावर पहारेकर्‍यांनी त्याला आत सोडणे आणि गुरूंना पाहूनही गोपाल तसाच बसून रहाणे : गोपाल राजांचा विशेष माणूस होता; म्हणून त्याला अंगरक्षक, सेवक, पहारेकरी यांनी घेरले होते. बैजूने त्याला संदेश पाठवला की, तुमचे गुरु तुम्हाला भेटण्यासाठी आले आहेत. गोपालने गुरूंची भेट घेणे, हा आपला अपमान समजला. बैजूने पुष्कळ विनवण्या केल्यावर पहारेकर्‍यांनी त्याला आत सोडले. वृद्ध गुरु आले आहेत, हे पाहूनही गोपाल तसाच बसून राहिला. उठून उभे रहाणे त्याच्या अहंकाराला पसंत नव्हते. तो मोठ्याने ओरडला, अरे, काय आहे म्हातार्‍या ! बैजू म्हणाला, बाळ ! विसरलास का ? मी अश्रूपूर्ण डोळ्यांनी, गद्गद हृदयाने तुला निरोप दिला होता. मी तोच बैजू आहे गोपाल ! तू का अहंकारात पडला आहेस ! मी ऐकले आहे की, तू कित्येकांचे शिर धडावेगळे केले आहे. बाळ ! यासाठी मी तुला विद्या दिली नव्हती. मुला, मी तर तुझ्या कल्याणाचीच इच्छा करतो !

८. गोपालने बैजूला आव्हान देणे : गोपाल म्हणाला, वेडा कुठला ! काय बरळतोस ! जर तू गायक असशील अथवा गुरु असशील, तर उद्या ये राजदरबारात आणि दाखव आपल्या गायनकलेचे शौर्य. जर पराभूत झालास, तर शिर धडावेगळे केले जाईल. वेडा कुठला ! मोठा आला गुरु होण्यासाठी ! नोकरांनी धक्के मारून त्याला बाहेर काढले.

९. बैजूने उद्या राजगायकासह गीत-संगिताचा शास्त्रार्थ करणार असल्याची घोषणा करणे : अहंकार कसा आंधळे करतो; परंतु गुरूंचा महिमा असा आहे की, ते एखाद-दुसरा डाव आपल्याजवळ राखून ठेवतात. त्या लाचार दिसणार्‍या वृद्धाने राजदरबारात घोषणा केली की, उद्या मी राजगायकासह गीत-संगीताचा शास्त्रार्थ करीन. जर मी पराभूत झालोे, तर राजा माझे डोके उडवू शकतो. जर तो पराभूत झाला, तर त्याने आपले शिर कापावे कि कापू नये, याविषयी तो स्वतंत्र आहे. शेवटी गुरूंचे हृदय आहे, ते उदारच असणार !

१०. बैजूच्या गायनाने गोपालने गाजवलेला प्रभाव फिका पडणे : गुरूंची अनुमती मिळाली की, शिष्य अहंकार वाढवून कोणाला तुच्छ लेखण्यासाठी नव्हे, तर धर्मरक्षणासाठी आपल्या विद्येचा उपयोग करू शकतो. बैजू बावराने तोडी राग गायला. असा राग आळवला की, राजा भावसमाधीत बुडाला. राण्या आणि प्रजा सर्व स्तब्ध झाले. आजपर्यंत गोपालने जो प्रभाव गाजवला होता, तो सर्व फिका पडला. पळून गेलेले जंगलातून हरिण पुन्हा परत आले. बैजू उभ्या उभ्या गीत गात गेला आणि त्याच्या गळ्यात घातलेले हार बाजूला ठेवल्यावर त्यांचा ढीग लागला. गीत-संगीताच्या प्रभावाने सर्वजण इतके तन्मय झाले की, त्यांना आपली शुद्धच राहिली नाही. नंतर भीमपलासी राग गाता-गाता बैजूने एका दगडावर नजर टाकली, तर तो दगड मेणासारखा वितळू लागला. वितळलेल्या दगडावर त्याने आपला तंबोरा फेकला आणि गीत बंद केले. तो दगड पुन्हा कडक बनला आणि तंबोरा त्यातच अडकून राहिला.

११. बैजूने गोपालला दगडाला वितळवून तंबोरा काढून दाखवण्यास सांगणे; पण सर्व प्रयत्न निष्फळ रहाणे आणि शेवटी तो पराभूत होणे : बैजू बावरा म्हणाला, हे गुणचोर, गुरुद्रोही गोपाल नायक ! जर तुझ्याकडे एखादी विद्या, सामर्थ्य किंवा आपली योग्यता असेल, तर या दगडाला वितळवून माझा तंबोरा काढून दाखव. ज्याने अहंकारामुळे कित्येकांचा जीव घेतला होता आणि गुरुद्रोह केला होता, त्याच्या रागात आता दम होताच कुठे ? गोपालने गीत गाता-गाता कित्येकदा पाण्याचे घोट घशाखाली उतरवले, सर्व प्रयत्न केले; पण सर्व निष्फळ राहिले. तो गाता-गाता थकून गेला, ना दगड वितळला कि तंबोरा निघाला. शेवटी तो पराभूत झाला.

१२. गोपालने बैजूलाच दोषी ठरवणे आणि त्याला मृत्यूदंड देण्यास सांगणे : राजाचे डोळे क्रोधाने चमकू लागले. बैजू म्हणाला, महाराज ! याला क्षमा करा. शेवटी हा माझा शिष्य आहे, बालक आहे. याला मृत्यूदंड देऊ नका. गोपाल म्हणाला, मृत्यूदंड या म्हातार्‍याला द्या. हा माझा गुरु होता आणि याने ही विद्या माझ्यापासून लपवून ठेवली. जर याने ही विद्या मला शिकवली असती, तर आज मी पराभूत झालो नसतो.

१३. राजाने विश्‍वासघातकी, अहंकारी गोपालचा शिरच्छेद करण्यास सांगणे : बैजू म्हणाला, होय महाराज ! मलाच मृत्यूदंड द्या; कारण मी अशा कुपात्र शिष्याला विद्या शिकवली. ज्याने लोकांचे मनोरंजन न करता, लोकेश्‍वराच्या भक्तीचा प्रचार न करता आपला अहंकार जपला आणि कर्माला विकर्म केले. यामुळे कित्येक अबलांचे सौभाग्य हिरावले, तसेच कित्येक निर्दोष मुलांचे पितृछत्र हिरावले गेले आणि तुमच्यासारख्या कित्येक राजांचे राज्य, धन-वैभव याच्या अहंकाराला पोसण्यात लागले. मी अपराधी आहे. मला क्षमा करा.

राजा म्हणाला, गायकराज ! तुमच्या गीतांनी दगड वितळू शकतो; पण न्यायाच्या या सिंहासनावर बसलेल्या राजाचे कठोर हृदय तुम्ही द्रवीभूत करू शकणार नाही. या विश्‍वासघातक्याला मृत्यूदंड दिला जाईल ! क्रोधाने लालबुंद झालेल्या डोळ्यांनी आणि उग्र हाताने राजाने इशारा केला, या विश्‍वासघातकी, अहंकारी माणसाचा शिरच्छेद करा.

१४. बैजूला दुःख सहन न होणे : मारेकर्‍यांनी गोपालचे शिर धडावेगळे केले. ही घटना बैजू बावरा सहन करू शकला नाही. जसे कुपुत्राच्या जाण्यानेही आई-वडिलांचे हृदय दुःखाने भरते, तसेच बैजू बावराला दुःख झाले.

१५. पतीच्या अस्थींच्या दर्शनाची इच्छा व्यक्त करणे : सतलज नदीच्या काठावर गोपालचा अंत्यविधी झाला. त्याच्या पत्नीने प्रार्थना केली, हे गुरुदेव ! माझ्या पतीने तर अनर्थ केला; पण तुम्ही तर करुणामूर्ती आहात. त्यांना क्षमा करा. मला माझ्या पतीच्या अस्थींच्या दर्शनाची इच्छा आहे. अस्थी नदीत प्रवाहित केल्या आहेत. तुम्ही मला साहाय्य करा.

१६. बैजूने गोपालच्या मुलीला राग शिकवणे आणि त्याप्रमाणे भगवंताला प्रार्थना करून राग आळवल्यावर सर्व अस्थी काठाला लागणे : बैजू बावराने तिला धीर दिला आणि एक राग रचून तो राग तिची मुलगी मीरा हिला शिकवला. ते मीराला म्हणालेे, मुली ! तू हा राग गा आणि भगवंताला प्रार्थना कर की, तुझ्या वडिलांच्या ज्या अस्थी नदीच्या तळाशी पोहोचल्या आहेत, त्या सर्व एकत्रित होऊन काठाला लागाव्या. मीराने राग आळवला आणि सर्व अस्थी काठाला लागल्या. आजच्या विज्ञानाच्या थोबाडीत मारणारे गायक आपल्या भारतात होते, आजही असतील.

– (मासिक ऋषी प्रसाद, जुलै २०१०)

Leave a Comment