घरी आलेल्या पाहुण्‍यांचे स्‍वागत आणि आदरातिथ्‍य करावे !

१. घरी पाहुणे किंवा अतिथी आल्यावर कसे वागणे टाळले पाहिजे ?

          आपल्याकडे बर्‍याचदा आई-बाबांच्या ओळखीच्या व्यक्ती घरी भेटायला येतात. सध्या घरी भेटायला कोणी आले, तरी मुले सोफ्यावर बसून दूरदर्शन बघत असतात. त्यांचे अधिक लक्ष दूरदर्शनकडे असल्याने पाहुण्यांकडे नसते. पाहुणे उभे असले, तरी मुले बसून असतात, अजिबात उठत नाहीत. दूरदर्शनच्या मोठ्या आवाजामुळे पाहुणे आणि आई-बाबा यांना बोलतांना अडथळा येत असतो. त्यामुळे आई-बाबा आपल्याला दूरदर्शन बंद करून आत जाण्यास सांगतात किंवा दूरदर्शनचा आवाज हळू करण्यास सांगतात. तेव्हाही काही मुले ‘काय आहे’, असे उद्धटपणे खेकसतात.

२. घरी आलेल्या पाहुण्यांविषयी भाव कसा असावा ?

          संस्कृतमध्ये ‘अतिथी देवो भव ।’ असे म्हटले आहे. याचा अर्थ अतिथी हे देवाचेच रूप आहे. ‘अतिथीच्या रूपाने देवच आपल्याकडे आलेला असतो’, अशी हिंदु धर्माची शिकवण आहे. धर्माच्या शिकवणीनुसार पाहुण्यांचा आदर आपण केला पाहिजे. त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य चांगल्या पद्धतीने केले पाहिजे.

३. घरी पाहुणे किंवा अतिथी आल्यावर त्यांचे स्वागत आणि आदरातिथ्य कसे करावे?

१. घरी आलेल्या पाहुण्यांना लगेच उठून नमस्कार करून स्वागत करावे.

२. पाहुणे उभे असतांना त्यांच्यासमोर बसू नये.

३. त्यांना बसायला जागा करून द्यावी.

४. पाहुणे बसल्यावरच आपण बसावे, तोपर्यंत उभे राहावे. यातून आपली नम्रता वाढते आणि त्यांच्याप्रतीचा आदर व्यक्त होतो.

५. पाहुणे बाहेरून दमून आलेले असतात, त्यामुळे त्यांना लगेच पाणी द्यावे.

६. त्यांच्याशी हसतमुखाने आणि प्रेमाने वागावे.

७. आई-बाबांनी त्यांच्यासाठी चहा, कॉफी किंवा सरबत बनवायला सांगितले, तर ते लगेच बनवावे.

८. आई-बाबा पाहुण्यांशी बोलत असतांना आपण मधेच वेगळ्या विषयावर बोलून त्यांच्या चाललेल्या विषयात व्यत्यय आणू नये.

९. पाहुणे जाण्यासाठी उभे राहिले की, आपणही लगेच उभे राहावे.

१०. पाहुण्यांना निरोप देतांना त्यांच्यासोबत दोन पावले चालून बाहेर जावे.

         अशा प्रकारे अतिथींमध्ये देवाचे रूप पाहून त्यांचे आदरातिथ्य करावे. अतिथींचे आदरातिथ्य करतांना त्यांच्यातील देवासाठीच सर्व करत आहोत, असा भाव ठेवून करावे, त्यामुळे आपल्याला त्यांच्यातील देवत्वाचे आशीर्वाद मिळतात. हिंदु धर्मामध्ये सांगितलेल्या ‘अतिथी देवो भव ।’ या शिकवणीचे आचरण करून आनंद मिळवावा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

Leave a Comment