सकाळी लवकर उठून स्नान करावे !

१. ब्राह्ममुहुर्ताच्‍या वेळी किंवा पहाटे स्नान करावे

ती स्नान करण्‍याची आदर्श वेळ आहे. सूर्योदयापूर्वी मंगलस्नान केल्‍याने जीव अंतर्-बाह्य शुद्ध होऊन त्‍या काळातील सात्त्विक लहरी ग्रहण करू शकतो. आता त्‍या वेळी स्नान करणे बहुतेकांना शक्‍य नसते. असे स्नान करणे शक्‍य नसल्‍यास सूर्योदय झाल्‍यावर जितक्‍या लवकर शक्‍य होईल तितक्‍या लवकर स्नान करावे.

२. दुपारी किंवा रात्री स्नान करण्‍यापेक्षा सकाळच्‍याच वेळी स्नान करावे

सकाळची वेळ सात्त्विक असल्‍यामुळे सकाळी स्नान केल्‍यावर स्‍थूल आणि सूक्ष्म या देहांची सात्त्विकता जास्‍त वाढते आणि ती दीर्घकाळ टिकून रहाते. दुपारची आणि रात्रीची वेळ रज-तमोगुणी असल्‍यामुळे त्‍या वेळी स्नान केल्‍यामुळे स्‍थूल आणि सूक्ष्म या देहांची सात्त्विकता विशेष वाढत नाही आणि वाढल्‍यास ती अल्‍पकाळ टिकते. त्‍यामुळे त्‍या व्‍यक्‍तीला स्नानाचा लाभ फार अल्‍प होतो.

३. पहाटे उठून डोक्‍याला आणि शरिराला तेल लावून नंतर कोमट पाण्‍याने स्नान करावे

शरिराला तेल लावल्याने देहात सत्त्वगुणाचे संवर्धन होण्‍यास साहाय्‍य होते आणि जिवाचा उत्‍कर्ष होतो.

४. स्नानापूर्वी जलदेवतेला ही प्रार्थना करावी

हे जलदेवते, तुझ्‍या पवित्र जलाने माझ्‍या स्‍थूलदेहाभोवती आलेले रज-तम यांचे त्रासदायक शक्‍तीचे आवरण नष्‍ट होऊ दे. बाह्यशुद्धी माझे अंतर्मनही स्‍वच्‍छ आणि निर्मळ होऊ दे.

५. नामजप करत किंवा श्‍लोक म्‍हणत स्नान करावे

नामजप करत किंवा श्‍लोक म्‍हणत स्नान करावे. असे केल्‍याने पाण्‍यातील अंगीभूत चैतन्‍य जागृत होऊन त्‍याचा देहाला स्‍पर्श होऊन चैतन्‍याचे संक्रमण पेशीपेशींपर्यंत होते आणि त्‍यामुळे देहाला देवत्‍व होऊन दिवसभरातील कृती चैतन्‍याच्‍या स्‍तरावर करण्‍यास देह सक्षम बनतो.

स्नान करतांना म्‍हणावयाचे श्‍लोक

गङ्‍गे च यमुने चैव गोदावरि सरस्‍वति ।
नर्मदे सिन्‍धुकावेरी जलेऽस्‍मिन् सन्‍निधिं कुरु ॥

– नारदपुराण, पूर्वभाग, पाद १, अध्याय २७, श्लोक ३३

अर्थ : हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधु आणि कावेरी, तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.

गङ्‍गा सिन्‍धु सरस्‍वती च यमुना गोदावरी नर्मदा
कावेरी शरयू महेन्‍द्रतनया चर्मण्‍वती वेदिका ।
क्षिप्रा वेत्रवती महासुरनदी ख्‍याता जया गण्‍डकी
पूर्णाः पूर्णजलैः समुद्रसहिताः कुर्वन्‍तु मे मङ्‍गलम् ॥

अर्थ : गंगा, सिंधु, सरस्वती, यमुना, गोदावरी, नर्मदा, कावेरी, शरयू, महेन्द्रतनया, चंबळा, वेदिका, क्षिप्रा , वेत्रवती (माळव्यातील बेतवा नदी), प्रख्यात महासुरनदी, जया अन् गण्डकी या नद्या, पवित्र आणि परिपूर्ण होऊन समुद्रासहित माझे कल्याण करोत.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘स्नानापासून दिवे लागणी पर्यंतच्या आचारांमागील शास्त्र

Leave a Comment