भगवंताच्या नामातच खरे सुख

        बालमित्रांनो, एकदा एक साधू तीर्थाटन करत एका गावामध्ये आले. गावाबाहेर एक मारुतीचे देऊळ होते, तेथे ते राहू लागले. एक-दोन दिवस झाल्यावर हळूहळू गावातील मंडळी साधूमहाराजांकडे येऊ लागली. प्रतिदिन येण्या-जाण्यामुळे गावातील लोकांची त्यांच्याशी बरीच जवळीक निर्माण झाली. लोक त्यांना अध्यात्मविषयक शंका विचारू लागले. प्रपंचातील अडचणी सांगू लागले. तेही त्या सर्वांना योग्य उत्तरे देऊन त्यांचे समाधान करू लागले. काही वेळा ते एखाद्या विषयावर प्रवचनही करत.

        एके दिवशी गावातील मंडळी जमली असता साधू त्यांना म्हणाले, ”बाबांनो, प्रपंचामध्ये कधीच कोणाला पूर्ण सुख मिळाले नाही; म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधान टिकवण्याचा प्रयत्न करावा आणि भगवंताचे नाम घ्यावे, भगवंताची निरपेक्ष सेवा करावी. यातच खरा आनंद आहे.” त्यांचे हे बोलणे ऐकून साठ वर्षांचे एक गृहस्थ एकदम चिडून साधू महाराजांना म्हणाले, ”प्रपंचामध्ये समाधानी रहावे, असे सांगायला काय जाते; पण ते शक्य आहे का ? माझंच बघा, माझा एक मुलगा बारा वर्षांचा आहे, त्याची अजून मुंज व्हायची आहे. दुसरा मुलगा अठरा वर्षांचा आहे, त्याचे शिक्षण अर्धवट झालेले आहे. सर्वांत मोठी मुलगी आहे तिला वीस वर्षे पूर्ण झाली, तरी तिचे लग्न जमत नाही. मुलांच्या काळजीने बायको खंगत चालली आहे. तिला औषधपाणी करावे लागते. या सर्वांसाठी माझी मिळकत अपुरी पडते. अशा परिस्थितीत काळजी करू नको तर काय करू ?”

        साधू महाराजांनी त्या गृहस्थाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. नंतर ते हसून त्यांना म्हणाले, ”काळजी करून प्रपंचातील प्रश्न सुटतात का ? आजपर्यंत आपण काळजी करत आलात, तरी कोणतीही गोष्ट केवळ काळजीने सुटली नाही. हे कळूनसुद्धा आपल्याला असे वाटत नाही की, आतापर्यंत केली तेवढी काळजी पुरे. काळजी करण्यापेक्षा मनाचे समाधान जर टिकवले आणि चित्त भगवंताच्या नामावर केंद्रित केले, तर मार्ग सापडण्याची शक्यता जास्त असते. भगवंत सर्वशक्तीमान असल्यामुळे त्याला सर्व गोष्टी शक्य आहेत. यासाठी जास्तीतजास्त वेळ भगवंताचे स्मरण करण्यात घालवावा.” हे सर्व ऐकल्यावर त्या गृहस्थाला आपली चूक समजली.

        मुलांनो, मनाचे समाधान जर टिकवायचे असेल, तर नामावर मन केंद्रित केले पाहिजे. काळजी केल्याने कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. यासाठी जास्तीतजास्त वेळ नामस्मरणात घालवावा.

Leave a Comment