‘व्‍हीडीओ गेम्‍स’ खेळण्यापेक्षा पटांगणावर खेळायला जा !

दिवसेंदिवस शहरातील रहात्या जागेचे वाढणारे भाव लक्षात घेऊन मुबलक प्रमाणात उपलब्ध असणार्‍या मैदानांना दुय्यम महत्त्व प्राप्त होऊन त्यांचे प्रमाण अल्प झाले. साहजिकच मैदानी खेळांची जागा बैठ्या खेळांनी घेतली. बैठ्या खेळांतही विविध तंत्रज्ञानाच्या उपलब्धतेमुळे ‘व्‍हीडीओ गेम्‍स’चा जास्त प्रमाणात वापर होऊ लागला. त्याचा शरीर आणि मनोधारणा यांवर अर्थातच विपरीत परिणाम झाला आहे.

‘मला स्‍वतःचं राज्‍य निर्माण करायचंय… कसं करू ?… लाइफच उरली नाही माझ्‍याकडे… आता काहीतरी करायला हवं… अपोनंटवर काऊंटर अ‍ॅटॅक करावा लागेल…’ रात्री राजूच्‍या अशा झोपेत बडबडण्‍यामुळे त्‍याची आई वैतागली होती. हे असं का होतंय, याचा तिला काहीच अंदाज लागत नव्‍हता. राजू संगणकावर (‘कॉम्‍प्‍युटर’वर) ‘गेम’ खेळत असतांना एकदा तिनं लक्ष देऊन पाहिलं, तर ते सगळेच खेळ शर्यत (रेसिंग), मारामारी इत्‍यादींचे होते. ते सगळे ‘गेम्‍स’ पाहून ती हैराण झाली.’ – श्री. चिन्‍मय पाटणकर (दैनिक ‘महाराष्‍ट्र टाईम्‍स’, ३.७.२०११)

मुलांनो, वरील लिखाणातील राजू हा तुम्‍हाला ओळखीचा किंवा जवळचा वाटतोय ना ? तुम्‍हालाही आवडतात ना ‘व्‍हीडीओ गेम्‍स’ ? तुम्‍हीही खेळता ना ‘व्‍हीडीओ गेम्‍स’ ? परंतु सावधान ! हे ‘व्‍हीडीओ गेम्‍स’ मनाचे रंजन करत नाहीत, तर मनाला विकृत करतात, हे लक्षात घ्‍या !

१. ‘व्‍हीडीओ गेम्‍स’चे प्रकार

‘व्‍हीडीओ गेम्‍स’चे ‘कॉम्‍प्‍युटर गेम्‍स’, ‘कन्‍सोल गेम्‍स’, ‘मोबाईल गेम्‍स’ असे माध्‍यमानुसार (यंत्रानुसार), तर खेळानुसार अ‍ॅक्‍शन गेम्‍स, ऑर्किड गेम्‍स (उदा. ‘रेसिंग’), टेरर गेम्‍स असे विविध आहेत. मुलांचा सर्वांत आवडता व्‍हीडीओ गेम म्‍हणजे टेरर गेम; म्‍हणून टेरर गेमविषयी येथे माहिती देत आहोत. टेरर गेम्‍सचे स्‍वरूप आणि त्‍यांचे दुष्‍परिणाम वाचून टेरर गेम्‍स अन्‍य गेम्‍ससुद्धा कसे हानीकारक आहेत, याची कल्‍पना येईल.

२. टेरर गेम्‍स

अ. ‘टेरर गेम्‍स’चे स्‍वरूप

विध्‍वंसक स्‍वरूपाच्‍या वा हिंसाचाराने भरलेल्‍या गेम्‍सना ‘टेरर गेम्‍स’ म्‍हणतात. हा खेळ किती विध्‍वंसक स्‍वरूपाचा असतो, हे कळायला पुढील दोन उदाहरणे पुरेशी आहेत.

१. अधिक क्रूरपणे वागण्‍यास शिकवणारा खेळ !

‘टेरर गेम्‍समध्‍ये जास्‍तीतजास्‍त क्रूरपणे वागणार्‍याला जास्‍त गुण (पॉइंट्‍स) मिळतात, म्‍हणजे गाडीतल्‍या बाईला गेममधील हिरोने नुसते मारले, तर अल्‍प पॉइंट्‍स मिळतात; पण तेच जर का त्‍याने त्‍या खाली पडलेल्‍या बाईला परत जाऊन लाथाबुक्‍क्‍यांनी तुडवले, तर त्‍याला पुष्‍कळ पॉइंट्‍स मिळतात. हे पॉइंट्‍स गेममधील हिरोला नाही, तर तो गेम खेळणार्‍या आणि तो हिरो म्‍हणजे स्‍वतःच असे समजू लागलेल्‍या खेळणार्‍या मुलाला मिळतात !

२. शासकीय यंत्रणा नष्‍ट करण्‍यास शिकवणारा खेळ !

शासकीय यंत्रणा नष्‍ट करण्‍यासाठी करणे, हे या खेळातील एक उद्दिष्‍ट असते, तर जास्‍तीतजास्‍त क्रूरपणे वागणे, हे या गेम्‍सचे अंतिम ध्‍येय असते. साधी गाडी उडवली, तर अल्‍प (कमी) पॉइंट्‍स. फायर बिग्रेडची गाडी उडवली, तर पुष्‍कळ पॉइंट्‍स. अम्‍ब्‍युलन्‍स शोधून काढून ती उडवून दिली, तर खेळणार्‍या मुलाला भारीतले शस्‍त्र मिळते.

आ. ‘टेरर गेम्‍स’चे दुष्‍परिणाम

विध्‍वंसक गेम्‍स खेळणार्‍या मुलांविषयी अमेरिका आणि युरोपीय देश यांमध्‍ये पुष्‍कळ संशोधन झाले आहे. त्‍या संशोधनात हा खेळ खेळणार्‍या मुलांवर होणारे पुढील काही दुष्‍परिणाम आढळून आले आहेत.

१. शारीरिक दुष्‍परिणाम

अ. विध्‍वंसक गेम्‍स खेळणार्‍या मुलांमध्‍ये पोटदुखीसारखे विकार उद़्‍भवण्‍याचे पुष्‍कळ जास्‍त असते.

आ. एखादा व्‍यसनी माणूस जेव्‍हा व्‍यसन करतो, तेव्‍हा त्‍याच्‍या मेंदूत ‘डोपामिन’ नावाचे रसायन बनते अन् त्‍यामुळे तो उत्तेजित होतो. विध्‍वंसक गेम्‍स खेळणार्‍या मुलांच्‍या मेंदूतही हेच रसायन आढळून आले आहे.

२. मानसिक दुष्‍परिणाम

अ. विध्‍वंसक गेम्‍स खेळणारी मुले गेम खेळून झाल्‍यावर पुढच्‍या २४ घंट्यांतही (तासांतही) विध्‍वंसक वागतात.

आ. विध्‍वंसक गेम्‍स खेळणार्‍या मुलांमध्‍ये वाईट स्‍वप्‍ने पडून भीतीने थरथरत उठण्‍याचे पुष्‍कळ जास्‍त असते.

इ. राक्षसी मानसिकता बनण्‍यास पूरक ठरणारा खेळ : ‘विध्‍वंसक गेम्‍स खेळणार्‍या मुलांची मानसिकता राक्षसासारखी का बनते, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.

  • ‘निष्‍कारण निरपराध माणसांना मारण्‍यासाठी आवश्‍यक असलेली निगरगट्ट मानसिकता तयार होते.
  • दुसर्‍याला वेदना देण्‍याचे काही वाटेनासे होते. वेदनेच्‍या किंकाळ्‍या सवयीच्‍या वाटायला लागतात.
  • रक्‍त बघण्‍याची सवय होते.
  • ‘हे गेम्‍स मुलांची मने आणि त्‍यांची विचारशक्‍तीच ‘करप्‍ट’ (भ्रष्‍ट) करायच्‍या मागे आहेत. हे गेम्‍स मुलांना जे जे सुरळीत चाललेलं असेल, ते ते नष्‍ट करायला शिकवत आहेत. जे आनंदी असेल, तिथे दुःख निर्माण करण्‍यास देत आहेत.

३. सामाजिक दुष्‍परिणाम

‘हे गेम्‍स म्‍हणजे गुन्‍हेगार बनण्‍याचे बाळकडू पाजणार्‍या शाळा का आहेत, हे पुढील सूत्रांवरून लक्षात येईल.

अ. नियोजन करून अपराध (गुन्‍हे) करण्‍याची सवय होते.

आ. पोलिसांपासून लपण्‍याच्‍या पद्धती शिकता येतात.

३. सर्वच व्‍हीडीओ गेम्‍समुळे होणारे काही तोटे

मुलांनो, एखादा गेम जिंकल्‍यावर खेळणारा क्षणिक सुखावतो; पण त्‍याला त्‍या गेमचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाच्‍या दृष्‍टीने कोणताच लाभ होत नाही, उलट पुढील तोटेच होतात.

अ. हे खेळ केवळ २५-३० मिनिटेच नव्‍हे, तर कित्‍येक घंटे खेळावेसे वाटतात. त्‍यामुळे वेळेचा अपव्‍यय होतो, तसेच अभ्‍यासाची हानी होते.

आ. या खेळांमुळे डोळ्‍यांवर ताण पडणे, पाठ दुखणे, डोके दुखणे आदी त्रास होऊ शकतात.

इ. या खेळांमुळे मानसिक दुर्बलता येऊ शकते.

ई. या खेळांमधून बाहेर पडणार्‍या त्रासदायक (रज-तमोगुणी) स्‍पंदनांचा मन आणि बुद्धी यांवरही वाईट परिणाम होतो.

उ. पुढे पुढे हे खेळ खेळण्‍याचे व्‍यसन लागू शकते.

४. व्‍हीडीओ गेम्‍सची सवय मोडण्‍यासाठी काय करावे ?

व्‍हीडीओ गेम्‍स खेळणार्‍या मुलांनो, या गेम्‍समुळे होणारे तोटे तुम्‍ही समजून घेतले. आता ही सवय मोडणार ना तुम्‍ही ?… तर मग पुढील कृती करा.

अ. गेम्‍स खेळणे सोडणं, हे इतर कुठलाही वाईट संस्‍कार घालवण्‍याइतकेच कठीण आहे. त्‍यामुळे वाईट संस्‍कार घालवतांना मनाचा होणारा संघर्ष हा गेम्‍स खेळणे सोडतांनाही होईल, हे लक्षात घ्‍या. त्‍यासाठी मनाची सिद्धता ठेवा.

आ. भ्रमणभाष, संगणक, ध्‍वनीचकत्‍या (सीडी) आदींमध्‍ये असणारे गेम्‍स पुसून टाका (डीलीट करा).

इ. मित्रांकडे गेम्‍स मागू नका वा मित्र देत असलेले गेम्‍स स्‍वीकारू नका.

ई. ‘मी यापुढे व्‍हीडीओ गेम्‍स खेळणार नाही’, असे घरच्‍यांनाही सांगा.

उ. घरातला संगणक अशा ठिकाणी ठेवा की, त्‍या संगणकाचा पडदा (मॉनिटर) घरातल्‍या सगळ्‍यांना सहज दिसेल.

ऊ. पटांगणावर खेळायला जा. तेथे कबड्डी, खो-खो, हत्तीची सोंड आदी देशी सांघिक खेळ खेळा. सांघिक खेळ खेळल्‍यामुळे एकलकोंडेपणा जाईल, तसेच मनाचा उत्‍साहही वाढेल.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘टी.व्ही., मोबाईल आणि इंटरनेट यांचे तोटे टाळून लाभ मिळवा !