करमणूक गीतांपेक्षा देवभक्‍ती अन् राष्‍ट्रभक्‍ती वाढवणारी गीते ऐकावीत आणि म्‍हणावीत !

१. करमणूक गाणी आणि त्‍यांच्‍या स्‍पर्धा यांमुळे होणारे दुष्‍परिणाम

सध्‍याची मुले चित्रपट आणि ‘अल्‍बम्‍स्’ यांतील गाणी ऐकतात. काही मुले ही गाणी पाठ करून म्‍हणतही असतात. विविध दूरचित्रवाहिन्‍यांवर मुलांसाठी अशा गाण्‍यांच्‍या मोठमोठ्या स्‍पर्धा आयोजित करण्‍यात येतात आणि त्‍यांत विजेत्‍यांना मोठमोठी पारितोषिकेही दिली जातात. या स्‍पर्धांमध्‍ये भाग घेतला किंवा पारितोषिके मिळाली की, भरपूर प्रसिद्धी  मिळते. सगळ्‍यांकडून कौतुक होते. त्‍यामुळे अशा गाण्‍यांच्‍या स्‍पर्धेत भाग घेण्‍याकडे मुलांचा कल होतो; परंतु यामुळे मुलांची कोणती हानी होते ?

१. या स्‍पर्धांमुळे मुले पैसा आणि पारितोषिके यांच्‍या मागे लागतात. यामुळे मुले नकळतपणे चंगळवादाकडे झुकतात.

२. स्‍पर्धांमधील चढाओढीमुळे मुलांची वृत्ती तामसिक होते, उदा. त्‍यांच्‍यात मत्‍सर, द्वेष, तुलना करणे इत्‍यादी दोष आणि अहंभाव वाढीस लागतो.

३. बहुतांश करमणूक गीतांमुळे मुलांच्‍या मनावर कुसंस्‍कार झाल्‍याने त्‍यांच्‍यातील नीतीमत्ता घटते.

४. करमणूक गीतांचा साधना, तसेच राष्‍ट्र अन् धर्म यांच्‍या कार्याच्‍या दृष्‍टीने काहीच उपयोग नसल्‍याने मुलांचा जीवनातील अमूल्‍य वेळ फुकट जातो.

२. गायनकला किंवा संगीतकला यांचा उपयोग कसा करावा ?

कला ही ‘कलेसाठी कला’ नसावी. केवळ पैसा आणि मिळवण्‍यासाठी कलागुणांचा वापर करू नये. ‘कलेसाठी कला नसून, ईश्‍वर आणि राष्‍ट्र अन् धर्म यांच्‍या कल्‍याणासाठी कला’, अशा उदात्त विचारसरणीचा मुलांनी पुरस्‍कार करावा. मुलांना गायनाची किंवा संगीताची आवड असेल, तर त्‍यांनी भक्‍तीगीते, भजने, आरत्‍या, देवतेचा पाळणा, देशभक्‍तीपर गीते, क्षात्रगीते, पोवाडे इत्‍यादी म्‍हणावेत.

१. भजने आणि भक्‍तीगीते : देवते प्रती  भक्‍तीभाव निर्माण व्‍हावा, यासाठी संतांनी रचलेली भजने म्‍हणण्‍यास शिकावीत. संतांनी लिहिलेल्‍या भजनांमध्‍ये भाव आणि चैतन्‍य असल्‍याने ती भजने मनापासून म्‍हटल्‍यास त्‍यातून सर्वांनाच आनंद आणि शांती यांची अनुभूती घेता येईल. ‘भक्‍तीगीते किंवा भजने म्‍हणत असतांना ती देवासाठीच म्‍हणत आहोत आणि देव समोर उभा आहे’, असा भाव ठेवावा.

२. आरत्‍या : सध्‍या देवतांच्‍या आरत्‍या कोणत्‍याही चालीत आणि नादात (आवाजात) म्‍हटल्‍या जातात. आरती योग्‍य चालीत, योग्‍य उच्‍चारांसहित आणि भावपूर्ण म्‍हटल्‍याने ती म्‍हणणार्‍याला अधिक लाभ होतो. आरत्‍या म्‍हणत असतांना देवतांची स्‍तुती झाल्‍याने त्‍या त्‍या देवतेचा आशीर्वाद मिळतो.

३. श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांचा पाळणा : श्रीरामनवमी आणि श्रीकृष्‍ण जन्‍माष्‍टमी यांच्‍या निमित्ताने देवळांमध्‍ये त्‍या त्‍या देवतेची मूर्ती पाळण्‍यात ठेवून तो हलवला जातो. त्‍या वेळी त्‍या त्‍या देवतेचा पाळणाही म्‍हटला जातो. देवाचा पाळणा म्‍हणणे, हे देवाचे स्‍तुतीगायनच असल्‍याने त्‍यामुळे देवाचा आशीर्वाद मिळतो. यासाठी मुलांनी देवाचा पाळणा म्‍हणण्‍याचा सराव करावा आणि देवळांमध्‍ये होणार्‍या पाळण्‍याच्‍या कार्यक्रमातही तो म्‍हणावा.

४. देशभक्‍तीपर गीते : मुलांनी स्‍वतःमध्‍ये राष्‍ट्र अन् राष्‍ट्राभिमान निर्माण होण्‍याच्‍या उद्देशाने विविध देशभक्‍तीपर गीते म्‍हणण्‍यास शिकावे.

अ. देशाला स्‍वातंत्र्य मिळण्‍यासाठी फाशी जाणार्‍या क्रांतीकारकांच्‍या तोंडी ‘वन्‍दे मातरम्’ हेच शब्‍द असायचे. त्‍यामुळे ‘वन्‍दे मातरम्’ हे गीत म्‍हणतांना क्रांतीकारकांच्‍या बलीदानाची आठवण होते. हे गीत संस्‍कृत असल्‍याने त्‍यातील चैतन्‍याचा म्‍हणणार्‍याला आणि ऐकणार्‍याला लाभ होतो. मुलांनी या गीताची सर्व कडवी तोंडपाठ करून ते गीत चालीत म्‍हणण्‍यास शिकावे.

आ. ‘शिवकल्‍याण राजा’, ‘माझे राष्‍ट्र महान’ यांसारख्‍या ध्‍वनी- चकत्‍या (सीडी) / ध्‍वनीफीती (कॅसेट) यांतील राष्‍ट्रभक्‍तीपर गीते ऐकावीत आणि पाठ करून म्‍हणावीत. शाळेत किंवा इतर ठिकाणी समूहगीतांच्‍या स्‍पर्धा असतील, तेव्‍हा ‘वन्‍दे मातरम्’ हे गीत, तसेच अन्‍य देशभक्‍तीपर गीतेच ‘समूहगीते’ म्‍हणून सादर करावीत. एकत्रित येऊन देशभक्‍तीपर गीते म्‍हटल्‍याने मुलांमध्‍ये संघटितपणा निर्माण होतो. अशी काही गीते ऐकण्‍यासाठी येथे क्लिक करा.

५. क्षात्रगीते : अन्‍यायाविरुद्ध चीड निर्माण होऊन अंगी क्षात्रवृत्ती निर्माण व्‍हावी, यासाठी सनातनच्‍या साधकांनी विविध क्षात्रगीते लिहिली आहेत. ही क्षात्रगीते म्‍हटल्‍यास राष्‍ट्र आणि धर्म यां प्रती जागरूकता अन् क्षात्रभाव निर्माण होतो. यासाठी मुलांनी ही क्षात्रगीते शिकावीत. तसेच ही गीते जनसमुदायासमोर सादर करावीत.

६. पोवाडे : छत्रपती शिवाजी महाराजांसह अन्‍य शूरांच्‍या स्‍फूर्तीदायी चरित्रांची माहिती होण्‍यासाठी आणि त्‍यांच्‍या पराक्रमी इतिहासाचे स्‍मरण होण्‍यासाठी पोवाडे म्‍हणण्‍यास शिकावेत. पोवाड्यांमुळे क्षात्रवृत्ती निर्माण होऊन राष्‍ट्रभक्‍तीचा संस्‍कारही होतो.

३. विविध गीते म्‍हणतांना ठेवावयाचा भाव आणि त्‍या भावामुळे जनमानसावर होणारा परिणाम

१. भजने, आरत्‍या, पाळणा, देशभक्‍तीपर गीते, क्षात्रगीते, पोवाडे इत्‍यादी शिकत किंवा म्‍हणत असतांना त्‍यांचा अर्थ समजून घ्‍यावा.

२. देवते प्रती  भाव असणार्‍या विद्यार्थ्‍याने भक्‍तीगीत म्‍हटले, तर ते ऐकणार्‍यांमधील भाव जागृत करते. देशाविषयी असलेल्‍या विद्यार्थ्‍याने देशभक्‍तीपर गीत म्‍हटले, तर ते ऐकणार्‍यांमधील देश जागृत करते. तसेच अन्‍यायाविरुद्ध चीड असणार्‍या विद्यार्थ्‍याने क्षात्रगीत म्‍हटले, तर ते इतरांमधील क्षात्रवृत्ती जागृत करते.

४. स्‍पर्धा, स्नेहसंमेलन आणि अन्‍य कार्यक्रम यांमधून देवभक्‍ती अन् राष्‍ट्रभक्‍ती वाढवणारी गीतेच म्‍हणावीत

मुलांनो, ठिकठिकाणच्‍या गाण्‍यांच्‍या स्‍पर्धा, शाळेचे स्नेहसंमेलन किंवा अन्‍य कार्यक्रम यांमध्‍ये भजने, भक्‍तीगीते, देशभक्‍तीपर गीते, क्षात्रगीते किंवा पोवाडे म्‍हणावेत. ‘ऑर्केस्‍ट्रा’सारखे कार्यक्रम ठेवणारी सार्वजनिक गणेशोत्‍सव मंडळे आणि नवरात्रोत्‍सव मंडळे यांचे करावे अन् त्‍यांना देवभक्‍ती अन् राष्‍ट्रभक्‍ती वाढवणारी गीते सादर करण्‍याची विनंती करावी. सार्वजनिक ठिकाणीही देवभक्‍ती अन् राष्‍ट्रभक्‍ती वाढवणारी गीत सादर केल्‍याने तुमचा राष्‍ट्राभिमान आणि धर्माभिमान वाढेल अन् वृत्ती सात्त्विक होईलच; पण समाजासमोरही नीतीमत्ताहीन नट-नट्यांचा आदर्श रहाण्‍यापेक्षा संत, राष्‍ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांचा आदर्श राहील.

श्रीराम आणि श्रीकृष्‍ण यांचा पाळणा, वन्‍दे मातरम् आणि काही प्रसिद्ध आरत्‍या ‘सनातन चैतन्यवाणी’ अँप वर ऐकण्‍यास मिळतील.

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘सुसंस्कार आणि चांगल्या सवयी

Leave a Comment