गणपतीचे मारक रूप

        बालमित्रांनो, आज आपण आपल्या सर्वांच्या आवडत्या गणपतिबाप्पाची गोष्ट पहाणार आहोत. आपल्याला गणपतिबाप्पाचा सदैव आशीर्वाद देणारा हात, करुणामय दृष्टी, असे तारक रूप ठाऊक आहे. त्याच्या मारक रूपासंबंधीच्या या कथेत गणपतीने असुरांचा वध करून देवतांना त्यांच्या त्रासापासून कसे वाचवले ते आपण पाहूया.

        सिंधुरासुर नावाचा एक राक्षस होता. तो अतिशय शक्तीशाली होता. त्याचे सैन्यही अफाट होते. इतरांना त्याच्यापुढे नेहमीच पराभव पत्करावा लागे. तो देवतांना त्रास देत असे. ऋषीमुनींच्या यज्ञयागात, तपात तो नेहमी अडथळे आणत असे. त्याच्या जाचाला कंटाळून देवता आणि ऋषीमुनी यांनी मिळून त्याला ठार मारण्याचा निर्णय घेतला; पण अशा शक्तीशाली असुराला मारणार कोण, असा सर्वांना प्रश्न पडला. तेव्हा पराशरऋषी गणपतीकडे गेले आणि त्यांनी त्याला सिंधुरासुराचा वध करण्याची विनंती केली.

        गणपति उंदरावर आरूढ झाला आणि आपले सैन्य घेऊन स्वारी युद्धाला निघाली. दुरून गणपति येत आहे, हे सिंधुरासुराच्या पहारेकऱ्यांनी पाहिले. त्यांनी ही गोष्ट जाऊन सिंधुरासुराला सांगितली. सिंधुरासुराला त्याच्याशी कोणीतरी लढायला येत आहे, हे ऐकून फार आश्चर्य वाटले. गणपतीसारखा छोटासा बालक माझ्याशी लढणार, या विचाराने त्याला हसू आले.

        एवढ्यात गणपति त्याच्यासमोर येऊन उभा ठाकला. त्याने सिंधुरासुराला युद्धासाठी पुकारले. सिंधुरासुर त्याला धरून चिरडणार एवढ्यात गणपतीने आपला चमत्कार दाखवला. त्याचे रूप राक्षसाच्या दुपटी-तिपटीने वाढले. गणपतीने त्याला उचलले आणि मारायला प्रारंभ केला. राक्षस रक्तबंबाळ झाला. हे पाहून सिंधुरासुराच्या सैन्याने तेथून धूम ठोकली. सिंधुरासुराच्या लाल रक्ताने गणपतीचे अंग भिजले. तो लाल-शेंदरी दिसत होता. अखेर सिंधुरासुराचा अंत झाला आणि गणपतीचा राग शांत झाला. शक्तीशाली सिंधुरासुरावर बालगणपतीने विजय मिळवला, हे पाहून सर्व देवतांना त्याचे कौतुक वाटले. त्यांनी त्याचा जयजयकार केला.

        असाच एक अंगलासुर नावाचा दुष्ट राक्षस होता. तोही सिंधुरासुराप्रमाणे सर्वांना त्रास देत असे. अंगलासुर तोंडातून आग फेकत असे. त्याच्या दृष्टीस जे जे पडे, तो ते जाळून टाके. त्याच्या डोळयांतून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत. तोंडातून धुराचे लोट उसळत. सर्वांना त्याची फार भीती वाटत असे.

        अंगलासुराने अशी अनेक जंगले जाळली होती. शेतातली पिके, जनावरे, पशुपक्षी, माणसे यांना जाळून तो त्यांची राख करी. अनेक राक्षसांना गणपतीने मारले आहे, हे अंगलासुराला ठाऊक होते. त्याला गणपतीचा सूड घ्यायचा होता. गणेशाचा वध करायचा होता; म्हणून तो त्याच्या शोधात होता; पण गणपति त्याच्या हाती लागत नव्हता.

        एके दिवशी श्री गणेशाने आपले छोटे रूप पालटले. तो अंगलासुराच्या तिप्पट उंच झाला. हे पाहून राक्षस घाबरला. श्री गणेशाने त्या राक्षसाला हातात उचलले आणि सुपारीसारखे खाऊन टाकले. त्यामुळे गणेशाच्या अंगाची भयंकर आग होऊ लागली. ती आग न्यून करण्यासाठी सर्व देवता आणि ऋषीमुनी यांनी त्याला दूर्वा वाहिल्या. दुर्वांनी आग थांबली आणि गणपति शांत झाला.

        पुढे गणेशाने विघ्नासुर या राक्षसाचाही नाश केला; म्हणून त्याचे विघ्नेश्वर हे नाव पडले.

        मुलांनो, गणपति ही विद्येची देवता आहे. अभ्यासाच्या आरंभी आपण जर त्याचे स्मरण केले, तर अभ्यासातल्या अडचणी दूर होऊन आपल्याला त्याचे साहाय्य मिळेल.

Leave a Comment