गणपति

        बालमित्रांनो, गणपति ही विद्येची देवता होय. हा आपल्याला चांगली बुद्धी देतो. सर्व विघ्ने दूर करणारा देव म्हणून त्याला ‘विघ्नहर्ता’ असेही म्हणतात. त्याच्या इतर नावांपैकी ‘चिंतामणी‘ हे नाव त्याला कसे मिळाले, ते आज आपण पाहू.

        कण नावाचा एक दुष्ट राजपुत्र होता. तो दीनदुबळयांना त्रास देत होता. ऋषीमुनींच्या तपात अडचणी निर्माण करत होता. एकदा तो आपल्या साथीदारांसह रानात शिकारीस गेला. त्याच रानात कपिलमुनींचा आश्रम होता. त्यांनी कणाचे स्वागत केले आणि त्याला आपल्या साथीदारांसह जेवायला येण्याचे निमंत्रण दिले. कपिलमुनींची झोपडी (आश्रम) पाहून कणाला हसू आले. तो म्हणाला, ”तुमच्यासारखा गरीब साधू एवढ्या लोकांना काय जेवू घालणार ?” त्यावर कपिलमुनींनी आपल्या गळयात साखळीला लावलेला ‘चिंतामणी’ काढून तो एका चौरंगावर ठेवला. त्या मण्याला नमस्कार करून त्यांनी प्रार्थना केली. त्यामुळे तेथे एक जेवणघर निर्माण झाले. सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाट आणि चौरंग मांडलेले होते. चांदीच्या ताटवाट्यांमध्ये अनेक प्रकारची पक्वान्ने वाढलेली होती. कण आणि त्याचे साथीदार ते स्वर्गीय जेवण जेवून संतुष्ट झाले.

        कणाला तो मणी प्राप्त करण्याची आशा झाली. त्याने आपली इच्छा कपिलमुनींकडे व्यक्त केली; परंतु कणाचा स्वभाव ठाऊक असलेल्या कपिलमुनींनी त्यास नकार दिला. त्यावर त्याने अत्याचाराने तो मणी हिरावून घेतला.

        त्यानंतर कपिलमुनींनी गणपतीची उपासना केली. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन गणपतीने कणाला शिक्षा करायचे ठरवले. इकडे त्या मण्यासाठी कपिलमुनी आपल्याशी युद्ध करतील, असा ग्रह करून कण कपिलमुनींवर चाल करून गेला. गणपतीच्या कृपेने त्या रानात फार मोठे सैन्य निर्माण झाले. त्यांनी कणाच्या जवळजवळ सर्व सैनिकांना मारले. तेव्हा गणपति स्वत: रणांगणावर आला. त्यावर कणाने भराभर गणपतीवर बाण सोडायला प्रारंभ केला; पण गणपतीने ते हवेतच आपल्या बाणांनी अडवले. मग गणपतीने आपला परशू कणावर फेकला. तो लागताच कण मरून पडला. कणाचे वडील राजा अभिजीतने रणांगणावर येऊन गणपतीला नमस्कार केला. कपिलमुनींचा ‘चिंतामणी’ त्यांना परत दिला. आपल्या मुलाला क्षमा करून सदगती द्यावी, अशी अभिजीतने गणपतीला विनवणी केली. दयाळू गणपतीने त्याचे म्हणणे मान्य केले.

        गणपतीने कपिलमुनींना चिंतामणी परत मिळवून दिला; म्हणून गणपतीला ‘चिंतामणी’ असे नाव पडले.

        मुलांनो, गणपति ही विद्येची देवता असल्याचे समजले ना ! अभ्यासाला बसण्यापूर्वी गणपतीला प्रार्थना करून ‘गणेशाय नम: ।’ हा नामजप केल्यास आपल्याला कठीण वाटणारा विषय सोपा वाटून अभ्यासाची गोडी लागेल. तर मग आजपासूनच नामजपाला प्रारंभ करणार ना !


 श्री गणपतीची आरती ऐकण्यासाठी येथे क्लिक करा !