हा सूर्य आणि हा जयद्रथ

कुरुक्षेत्रावर कौरव-पांडव यांच्यामध्ये युद्ध चालू होते. अर्जुनाच्या अनुपस्थितीत कौरवांनी चक्रव्यूह रचला. त्यामध्ये अर्जुनपुत्र वीर अभिमन्यू सहजगत्या शिरला; परंतु तेवढ्याच सहजतेने तो बाहेर मात्र पडू शकला नाही. शेवटी त्यातच त्याला वीरमरण आले. त्याच्या मृत्यूनंतर कौरव सैन्यातील द्वेषाने पछाडलेल्या जयद्रथाने अभिमन्यूच्या मस्तकावर लाथ मारली.

अभिमन्यूच्या मृत्यूची वार्ता ऐकून अर्जुन पुत्रशोकाने व्याकुळ झाला. त्याहीपेक्षा त्याला संताप आला, तो जयद्रथाच्या घृणास्पद कृत्याचा! अर्जुनाने तात्काळ प्रतिज्ञा केली, ‘उद्या सूर्यास्तापूर्वी जयद्रथाचा वध करीन, नाहीतर स्वत: अग्नीभक्षण करीन!’ हे ऐकताच कौरवसेना आणि जयद्रथ फारच घाबरले. जयद्रथाला वाचवण्यासाठी कौरवांनी त्याच्या भोवती महान योद्ध्यांचे कवच उभारले. दुपार टळत आली, सूर्यास्ताला फारसा अवधी उरला नाही आणि जयद्रथाचा तर कुठे पत्ता नव्हता.

इकडे श्रीकृष्णाला आपल्या भक्ताची काळजी वाटू लागली. त्यामुळे त्याने आपले सुदर्शनचक्र सिद्ध करून त्याच्या साहाय्याने सूर्यालाच झाकून टाकले. सर्वांना वाटले संध्याकाळ झाली, सूर्य मावळला. अर्जुन अग्नीभक्षण करण्याच्या सिद्धतेला लागला. त्याने लाकडे जमा केली. चिता पेटवली. त्यामुळे कौरवगण त्याची फजिती पहाण्यास जमले. जयद्रथही येऊन उभा राहिला. अर्जुनाने धनुष्य-बाण उचलले. नमस्कार केला आणि चितेत उडी घेणार, तेवढ्यात श्रीकृष्णाने आपले सुदर्शनचक्र काढून घेतले. त्यामुळे सर्वत्र सूर्याचा प्रकाश पसरला. ते पाहून कौरव सैन्याचा गोंधळ उडाला. जयद्रथ तर पुरता भांबावून गेला. इतक्यात कृष्ण अर्जुनाला म्हणाला, ”अर्जुना, पहातोस काय, लाव बाण तुझ्या धनुष्याला! हा बघ सूर्य आणि हा जयद्रथ!” कृष्णाचे ते शब्द आसमंतात घुमले. अर्जुनाने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या बाणांनी जयद्रथाचा शिरच्छेद केला.

मुलांनो, अर्जुन हा श्रीकृष्णाचा निस्सिम भक्त होता. तो श्रीकृष्णाचे अखंड नामस्मरण करत असे. अर्जुनाने जसे नामस्मरण करून श्रीकृष्णाचे मन जिंकले, त्याचा आवडता भक्त बनून दुष्ट आणि दुर्जन अशा जयद्रथाचा वध केला, तसेच आपणही नामस्मरण करून ईश्वराचे आवडते भक्त बनूया.

Leave a Comment