चतुःश्लोकी भागवत – तपाचें महिमान

नवल तपाचें कौतुक । तापसां भिती ब्रह्मादिक ।
तपस्वियाचें नवल देख । दशावतारादिक विष्णूसी ॥९१॥

तपाचेनि नेटपाटी । सूर्यमंडळ तपे सृष्टी ।
तयाच्या बळें निजनेटीं । दर्भाग्रीं सृष्टी धरिती ऋषि ॥९२॥

तपोबळें समुद्रा क्षार केलें । यादवकुळ निर्दाळिलें ।
शिवाचें लिंगपतन झालें । क्षोभलेनी बोलें तपोधनी ॥९३॥

जे सत्यवादी संत सज्जन । जे वासनात्यागी अकिंचन ।
तप हें त्यांचें निजधन । सत्य जाण नृपनाथा ॥९४॥

तप तें परम निधान । साधकांचें निजसाधन ।
ब्रह्मप्राप्तीचें दिव्यांजन । ऐकोनी चतुरानन विचारी ॥९५॥

तप तप ऐसें बोलिला । तो प्रत्यक्ष नाहीं देखिला ।
पाहतां अदृश्य जाहला । तो पांगेला दशदिशा ॥९६॥

तप या अक्षरांचा उच्चारी । पाहतां न दिसे देहधारी ।
अवलोकितां दिशा चारी । वक्ता शरीरी दिसेना ॥९७॥

तप या अक्षरांचा वक्ता । नातुडे दृष्टीचिया पंथा ।
मग तप या वचनार्था । होय विचारिता निजहदयीं ॥९८॥

Leave a Comment